नाशिक, गोदावरी, रिलायंस आणि मनसे: अज्ञानातून उर्मटपणाकडे…….


नाशिक, गोदावरी, रिलायंस आणि मनसे ,
अज्ञानातून उर्मटपणाकडे……………

धार्मिक गोदावरी, पवित्र नाशिक......

धार्मिक गोदावरी,
पवित्र नाशिक……

नाशिक मधील गोदावरी नदीला महाराष्ट्रात ‘गोदामाता’ असे म्हणतात. ह्या गोदावरी नदीचे पात्र केवळ नाशिकच नव्हे तर भारतामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अर्थाने अत्यंत महत्वाचे पीठ मानले जाते. २०१५ मध्ये ह्या गोदावरीच्या काठावर कुंभ मेळा भरणार आहे.  प्रदूषण थांबवण्याच्या दृष्टीने हि फार आनंदायक बाब नसली तरी धार्मिक दृष्टीने त्याचे फार मोठे महत्व आहे.

गोदावरी नाशिक महानगर पालिकेच्या अखत्यारीत येते. इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आहे आणि महापौर पण त्यांचाच आहे. मनसे चे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनेत असल्यापासून त्यांचे नाशिकवर विशेष प्रेम आहे ( असे म्हंटले जाते). महाराष्ट्राची ब्लू प्रिंट जाहीर करण्याची घोषणा काही वर्षांपूर्वी राज ठाकरे ह्यांनी केली होती. त्याच्याही अगोदर शिवसेनेत असल्यापासून नाशिक येथील गोदावरी नदीच्या काठावर ‘गोदा-पार्क’ नावाचे स्वप्न उभे करण्याचे राज ठाकरे ह्यांनी पहिले आणि वारंवार लोकांसमवेत शेअर केले.

राज ठाकरे शिवसेनेत असताना, शिवसेनेची यंत्रणा आणि महानगर पालिका राज ठाकरे ह्यांच्या स्वप्नांना साथ देईना झाली. पुढे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, स्वत:चा मनसे हा पक्ष स्थापन केला. नाशिकनेही त्यांच्या स्वप्नांची जाण ठेवली आणि त्यांच्या पक्षाला भरभरून मते दिली. एकट्या नाशिकात, मनसे चे तीन आमदार निवडून आले. शिवाय महानगरपालिकाही मनसे’च्या ताब्यात गेली.

हे सर्व होऊन ‘युगा मागुनी युगे’ लोटली. ‘गोदा-पार्क’ चे स्वप्न उभे होते ते आडवे काही होईना. आमदारांच्या फंडातून किंवा महानगर पालिकेच्या निधीतून ‘गोदा-पार्क’ उभा व्हावा ही गोष्ट काही कल्पनातीत नव्हती. पण तसे अजिबात झाले नाही. ह्या उलट ‘गोदा-पार्क’ तर दूरच राहो, गोदावरी नदीचे एका भयंकर गटारात रुपांतर झाले.

गोदावरी किमान स्वच्छ ठेवणे तरी नाशिक महानगरपालिकेला शक्य आहे का ?

गोदावरी किमान स्वच्छ ठेवणे तरी नाशिक महानगरपालिकेला शक्य आहे का ?

संपूर्ण नाशिक शहराचा मलबा, मल-मुत्र आणि प्रदूषित द्रव्य थेट गोदावरी नदीत विसर्जित होतात. पुण्यप्रद जल म्हणून देशभरच्या धार्मिक कार्यासाठी, बाटलीतले गोदावरीचे पाणी देशभर आपण वापरतो ते दुसरे तिसरे काही नसून रसायने, संपूर्ण शहराचे मलमूत्र, मलबा ह्याचे मिश्रण असते हे धक्कादायक पण कटू सत्य आहे.

किमान हे थांबवण्यासाठी तरी रिलायंस ची गरज लागते का ?

नाशिक मधील मल-मुत्र विसर्जनाचा आणि सांडपाण्याचा मलबा गटार फुटून , अनवधानाने का होईना, थेट गोदावरीत मिसळला जातो….
किमान हे थांबवण्यासाठी तरी रिलायंस ची गरज लागते का ?

खर तर हे ठीक करणे, गोदावरी नदी पूर्वीसारखी आणि निर्मळ बनवणे हे अजिबात अवघड नाही आणि अशक्य तर नाहीच नाही. गोदावरी स्वच्छ  केल्यानंतर गोदाघाट आणि त्यानंतर ‘गोदा-पार्क’ ही तर्क शुद्ध आणि सुसूत्र मांडणी आहे. नाशिककरांनी दिलेल्या करातून आणि महाराष्ट्रातील कराच्या आमदार फंडातून जाणाऱ्या पैशातून ह्या गोष्टी होणे हे नाशिककरांच्या आणि महाराष्ट्राच्या हक्काची बाब आहे.

गोदावरी नदीचे निर्मळ आणि प्रदूषणरहित पात्र निर्माण करणे मनसेला सत्तेत आल्यापासून आजपर्यंत सहज शक्य होते. ‘गोदा-पार्क’ वगैरे फार पुढच्या गोष्टी झाल्या. गोदावरी नदीत मनसोक्त डुंबता येणे एवढी माफक गोष्ट सुद्धा मनसे’ला महानगरपालिकेत सत्तेत येऊन जमली नाही. लोक आडून-आडून ह्याबाबत बोलू लागले. हायकोर्टात केस उभी राहिली. तिथे ही मनसे संचालित नाशिक महानगरपालीकेला काही ठोस भूमिका मांडता आली नाही. कारण काही भूमिकाच नव्हती तर मांडणार कशी?
लोक कल्याणाचा विचारच केला नव्हता तर तो मांडणार कसा?

राज ठाकरेंच्या आडून ह्या चर्चांना नाशिक आणि नाशिक बाहेरून सुद्धा उधाण आले. राज ठाकरेंच्या समोर हा प्रश्न उपस्थित करणे किंवा त्यांना उघडपणे असे विचारणे धोकादायक कारण मागे महापालिका निवडणुकांअगोदर  एका पत्रकाराने त्यांना त्यांच्या ‘ब्लू प्रिंट’ चे काय झाले असे विचारण्याचे दु:साह्स केले असता राज ठाकरे ह्यांनी त्याचा सगळ्यां समोर इतका अपमान केला कि त्याने ते आपल्या फेसबुक पेज वर लिहिले आणि नंतर ते सर्वत्र बराच काळ शेयरही होत राहिले.
शिवाय एका ‘बड्या’ पण ‘पोकळ’ टेलीव्हिजन पत्रकाराला हिंदीत मुलाखत देताना राज ठाकरे ह्यांनी सांगितल आहे कि पत्रकारांनी काय करावं हे जर मी सांगत नसेन तर राजकारणात मी काय करावं हे पत्रकारांनी सांगू नये. ह्यावर तो बडा इंग्रजी पत्रकार ओशाळून हसला त्यामुळे ह्या मुद्द्यावर शिक्का मोर्तब झाले असे महाराष्ट्रातल्या लोकांना वाटू लागले.

वास्तवात जनता आपली धनसंपत्ती कर’रूपाने लोक प्रतिनिधींच्या आणि नेत्यांच्या हातात त्यांना विश्वस्त समजून देत असते त्यामुळे नेत्यांना आणि लोक प्रतिनिधींना हासडून आणि खडसून ‘तुमच हे काय चाललय?’ असं विचारण्याचा सामान्यातल्या सामान्य नागरिकाला सुद्धा हक्क आहे. लेखन आणि वक्तृत्व ह्यांद्वारे लेखक आणि पत्रकार हे अधिक कुशलपणे राजकारणी माणसांकडे सोपवलेल्या आपल्या संपत्तीची चोरी उघड करू शकतात. तो त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या संविधानाने हक्क दिलेला आहे. लेखक आणि पत्रकार ह्यांच्याकडे कररूपाने येणारी अब्जावधीची संपत्ती विश्वस्त म्हणून जनता सोपवत नाही. त्यामुळे लोकशाही मध्ये नेत्यांना पुन्हा पुन्हा उलट प्रश्न विचारणे आणि सत्य शोधून काढणे हे लेखक आणि पत्रकारांचे जनतेच्या वतीने कर्तव्य आहे आणि त्यांचे समाधान होईपर्यंत उत्तर देणे अन्यथा चूक कबूल करणे हे राजकारण्यांचे कर्तव्य आहे. आपल्यावर झालेल्या टीकेला उलट उत्तर देऊन किंवा अपमान करून लेखक आणि पत्रकाराला गप्प बसवण्याची परवानगी ना भारतीय घटनेने दिलेली आहे ना लोकशाहीने. जनतेचा निधी ज्यांच्या हातात आहे ते जनतेचे सेवक आहेत मालक नव्हेत.

तर बराच काळ गोदावरी समबंधात काही होत नाही हे पाहुन काही मंडळी हायकोर्टात दाद मागण्यास गेली. प्रत्येक सुनावणीच्या वेळेला महानगरपालिकेचा अधिकाधीक पचका होत गेला. आत्तापर्यंत राज ठाकरेंना लोकांना स्वप्नांचे लॉलीपॉप देण्याची सवय होती पण ते लॉलीपॉप मनसेच्या शिलेदारांकडे नाही ह्याची तीव्रतेने त्यांना जाणीव व्हायला लागली. राज ठाकरेंनी नाशिक आणि गोदावरी च्या संदर्भात ‘गोदा-पार्क’ हे नवीनच लॉलीपॉपपास्त्र बाहेर काढले. लवकरच गोदावरी नदी आणि नदी काठचे ‘गोदा-पार्क’ भव्य आणि अंतराष्ट्रीय पातळीचे करण्यासाठी मुकेश अंबानी आणि त्यांचे रिलायंस फौंडेशन पुढाकार घेणार आहे आणि खर्च ही करणार आहे असे काही निवडक लोकांच्या उपस्थितीत नाशिक मध्ये राज ठाकरे ह्यांनी जाहीर केले. आश्चर्य म्हणजे त्यांच्या ह्या नवीन लॉलीपॉप’ला कोणी म्हणावा तसा आक्षेप घेतला नाही किंवा शंकाही उपस्थित केल्या नाहीत. कदाचित ह्याचे कारण हे ही असू शकेल कि त्यांच्या इतर घोषणानप्रमाणे ही सुद्धा एक घोषणा असेल असा धोरणी विचार लोक ही करू लागले असावेत.

राज ठाकरे ह्यांनी केलेल्या घोषणेमध्ये काही गंभीर स्वरूपाच्या चुका आहेत आणि काही गंभीर स्वरूपाचे प्रमाद आहेत.

१. सार्वजनिक जल, जंगल आणि जमीन ह्यावर तिथल्या प्रत्येक व्यक्तीचा आणि समुदायाचा हक्क आहे त्यामुळे ग्राम सभा, पंचायती, सम्बन्धित धार्मिक संस्थाने आणि सामान्य नागरिक ह्यांच्या कौल घेतल्याशिवाय नदी किंवा नदी परिसर किंवा दोन्ही कोणत्याही खासगी  profit मेकिंग कॉरपोरेट ला देणे हे जनद्रोही कृत्य आहे.

२. लोक सहभागाशिवाय नदी आणि नदी-परीसर ह्यांचा विकास बलाढ्य अशी कॉरपोरेट संस्था करू शकत नाही कारण ह्या प्रकारचा विकास केल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या अटी, तिकिटे किंवा लोकांकडून पैसे कोणत्याही स्वरुपात वसूल करायला तत्सम संस्थेने सुरुवात केली तर त्या संस्थेला आपण कसे थांबवू शकणार? जल, जंगल आणि जमीन ह्या बाबत लोक सहभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या मंडळीच्या मतमतांतराचे पडसाद घेतल्याशीवाय साक्षात गोदामाता असे आपण ज्या नदीला म्हणतो तिच्या सम्बन्धी एका सभारंभात राज ठाकरे, श्री. मुकेश अंबानींना भेटून परस्पर ठरवून टाकतात ह्याचा अर्थ नाशिक महानगर पालिका आहे, गोदावरी नदी आहे कि ही दोन्ही राज ठाकरे व त्यांच्या पक्षाची खेळणी आहेत?

३. नाशिक महानगरपालिकेला म्हणजेच सत्ताधारी मनसे’ला गोदावरी नदीमध्ये अत्यंत बकाल व बीभत्सपणे सर्व शहराचे सांडपाणी आणि मलमूत्र स्त्रोत विसर्जित होतात ते थांबवता येत नाही तर मग नाशिककर ‘कर’ कशासाठी भरतात. मग नाशिक महानगरपालिकेत सत्तेवर असलेल्या आपल्या पक्षाचा आणि तीन आमदारांचा ‘भार’ कमी करण्या करता रिलायंस फौंडेशनला मध्ये घातले जाते, हे सारे येते कुठून? हा सुस्त सरंजामीपणा जुन्या भ्रष्टाचाराची जागा नवा भ्रष्टाचार घेऊ पाहतो ह्याची खूण आहे.

४. नाशिक महानगरपालिकेतील सत्ताधारी मनसे वेगाने आणि त्वरेने काम करणे जाणत नाही असे नव्हे. ६ जुलै, २०१३ रोजी एकाच दिवसात स्थायी कमिटीचे चेयरमन आर. दि. धोंगडे ह्यांना हाताशी धरून सर्व किचकट प्रशासनीय बाबींची एकाच दिवसात पूर्तता करून रुपये नऊ कोटींचा चेक एकाच दिवसात काढण्यात येतो. हा चेक नेवासकर नावाच्या गृहस्थासाठी काढला जातो. नाशिक महानगर पालिकेने अनेकांच्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहे. त्यांचा TDR (transfer of devlopmental rights) अनेक माणसे रांगेत असताना अचानक ६ जुलैला एकाच दिवसात श्री. नेवासकर ह्यांचा चेक निघतो. हे नेवासकर माजी महापौर विनायक पांडे (शिवसेना) ह्यांचे मेव्हणे. हिच कार्यक्षमता मनसे’ला साध गोदावरीच प्रदूषण थांबवण्याकरता वापरता येत नाही, ह्याचे गौड बंगाल राज ठाकरे ह्यांनी, स्थानिक शिलेदारानकडून मुकेश अंबानींशी बोलण्यापूर्वी जाणून घेतले होते काय?

५. नद्यांचे सुशोभिकरण करण्याला RRZ नावाची पौलिसी नाशिक महानगरपालिकेतील मनसेच्या कुणाही प्रतिनिधिने वाचली आहे काय? ती पौलिसी सोबत देत आहे. (सर्व वाचकांनी इथे क्लिक करून जरूर वाचावी RRZ Revised Policy).

६. नद्यांसंदर्भात आणि नदी परीसरा संदर्भात कोणत्याही प्रकारचे सुशोभिकरण करणे हे कॉर्पोरेट चे काम नव्हे. ज्या थेम्स, ऱ्हाईन, danube नद्यांची नावे राज ह्यांनी घेतली त्या नद्यांची सुधारणा, सुशोभिकरण सरकारने केलेले आहे, कॉरर्पोरेटसची जल, जंगल आणि जमीन ह्या बाबतची धोरणे आणि कल्याणकारी राज्याची जल, जंगल, जमीन ह्या बाबतची धोरणे ही परस्पर विरोधी असल्यामुळे जगात नद्यांबाबतचे धोरण सरकारे ठरवतात, कॉर्पोरेटस नाही. लोकच त्याला मान्यता देत नाहीत .

DENUBE नदी, बुडापेस्ट, हंगेरी. आपली गोदावरी आणि परिसर इतका पवित्र, इतका छान दिसण्याचे भाग्य आपल्याला कधी लाभेल का?

DENUBE नदी, बुडापेस्ट, हंगेरी.
आपली गोदावरी आणि परिसर इतका पवित्र, इतका छान दिसण्याचे भाग्य आपल्याला कधी लाभेल का?

danube ही हंगेरीतील माझी आवडती नदी. ती पूर्व युरोपीय देशातून जाते. हंगेरीमधील danube आणि तिच्यावरचा पूल हा दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बवर्षावात पूर्णपणे उध्वस्त झाला होता. बुडापेस्ट मधील तेव्हा बॉम्बवर्षावात उधवस्त झालेल्या या danube नदीच्या तीरावर आत्ता उभं राहिलं तर सर्वांगसुंदर danube नदी आणि तिच्यावरचा पूल यावर उडी मारून डुबकी मारावे असे वाटते कारण दुसऱ्या महायुद्धातील संव्हारानंतर , danube नदी, तिच्यावरचा तो सुंदर पूल, danube  चा काठ हा जुने ध्वस्त रूप टाकून आता पुन्हा नव्या अभूतपूर्व सौंदर्याने नटलेला आहे.

हे सारे तेथील सरकारने, लोकांच्या दिलेल्या करा मधून नीटपणे साकारले आहे.

या पार्श्वभूमीवर आपल्या गोदावरीची आज नाशिक मध्ये काय अवस्था आहे?

हे दृश्य किमान ठीकठाक करणे नाशिक महानगरपालिकेला शक्य आहे का ?

हे दृश्य किमान ठीकठाक करणे नाशिक महानगरपालिकेला शक्य आहे का ?

आज गोदावरी मध्ये आपण उडी मारली तर विषबाधेने मरणारच नाही ह्याची खात्री नाही.

सांडपाणी छोट्यामोठ्या मुखांमधून थेट गोदावरीमध्ये सोडले जाते हे दृश्य नाशिकमध्ये सगळीकडे दिसते.

सांडपाणी छोट्यामोठ्या मुखांमधून थेट गोदावरीमध्ये सोडले जाते हे दृश्य नाशिकमध्ये सगळीकडे दिसते.

हे सर्व फोटो पाहताना मला काय म्हणायचे आहे हे आपल्या लक्षात येईलच.

माझा मनसेला विरोध नाही.
माझा रिलायंसला विरोध नाही.
राज ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाला विरोध नाही.
श्री. मुकेश अंबानी ह्यांच्याशी त्यांचे जे बोलणे झाले त्याला माझा आक्षेप नाही.

माझा विरोध लोकांना गृहीत धरून सुस्तसरंजामी पद्धतीने जनतंत्राचा गळा आवळण्याला आहे.

गोदावरी निर्मळ आणि स्वछ करणे हे नाशिक महानगरपालिकेचेच प्रथम कर्तव्य आहे. कोर्टामध्ये हे न करण्याला जी थिल्लर कारणे महानगरपालिकेतर्फे दिली जातात त्याच्या मागे सरळ सरळ भ्रष्ट मनोवृत्ती दडलेली आहे. ह्याचा विरोध नाशिककर करत नाहीत ह्याची दोनच कारणे असू शकतात:

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे.

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे.

एक तर ते राज ठाकरे आणि त्यांच्या शिलेदारांना गंभीरपणे घेत नसावेत किंवा राज ठाकरे ह्यांच्यासाठी प्रीतीची जागा लोकांच्या मनात भीतीने घेतलेली आहे. अंततः या दोन्ही गोष्टी मनसेची नाशिकमध्ये सत्ता असेपर्यंत गोदावरी आणि तिच्या परिसराला घातकच.

थेम्स, ऱ्हाईन, danube वगैरे नद्यांच्या स्वच्छ आणि सौंदर्याची राज ह्यांनी स्तुती केली त्यातल्या किती नद्या ह्या तेथील कॉरपोरेट्सनी सुशोभित केल्या आहेत, का तेथील सरकारने कॉरपोरेट्सच्या हाती दिल्या आहेत असे राज ह्यांना कोणी का नाही विचारले? ठीक आहे कोणी नाही विचारले तर मी आज विचारतो.

माझ्या वरील लेखाचे संपूर्ण उत्तर कुणी देईल का?

हा लेख लिहिताना मला नाशिकच्या अनेक मित्र-मैत्रिणींची मदत झाली. मला हवे असलेले फोटो, हवे तसे मिळणे आणि कोर्टाच्या प्रगतीची इत्यंभूत माहिती देणे हे काम श्री. राजेश पंडीत ह्यांनी केलं. इतरांनी त्यांची नावे मी लिहू नये अशी विनंती केली. त्यामुळे त्यांचे मी ऋण लक्षात ठेऊन आभार मानतो. ह्या गोदावरी प्रकरणासंबंधात  माहितीचा ढीग जमलेला आहे, जो ज्यातील प्रत्येक पान, प्रत्येक आकडा, प्रत्येक चित्र नाशिक येथील राज ह्यांच्या चरणदास शिलेदारांच्या भ्रष्ट कारभारावर झगझगीत प्रकाश टाकणारा आहे.

पण कुठेतरी थांबायला हवं म्हणून इथे थांबतो.

इतकच म्हणावसं वाटत. कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना हे अतीभ्रष्ट  आहेत त्यामुळे आम्हाला तरी काय पर्याय उरतो, असे जर मनसेला आणि त्यांच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांची गणना इतरांच्यात करायला आमची तयारी आहे. पण मग आपण ही इतरांसारखे ‘लॉलीपॉप’स्टार आहोत हे त्यांनी मान्य करावयास हवे!

शेवटी काय , तर देवळात हरवलेली चप्पल आणि राज्यासंदर्भातली व्हिजन ही ‘गुगल’ वरून डाऊनलोड  करून कट-पेस्ट करता येत नाही ही ‘नवनिर्माणा’ची आधुनिक ‘गोची’ आहे.

Same blog following here in a couple of days in English.

Raju Parulekar
raju.parulekar@gmail.com
(M) 9820124419

.

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Post In Marathi. Bookmark the permalink.

7 Responses to नाशिक, गोदावरी, रिलायंस आणि मनसे: अज्ञानातून उर्मटपणाकडे…….

 1. hingmire nitin says:

  Thank you for your Support and your comments to our Clean Godavari Movement .

 2. Tushar Rane says:

  Dear Rajuji,

  I think you are a good friend of Raj Thackeray.
  Why don’t you ask this questions straight to him??

 3. A very good subject for debate and for natural and ecological balance. The situation at Godavari is very bad. So start crusading against this but without any political bias.

 4. abhaysonak says:

  चांगला लेख आहे. अतिशय मेहनत घेऊन आणि विचार पूर्वक कथन केला आहे. आज बहुतांश लोकं (या मध्ये मी स्वतः सुद्धा आहे) निष्क्रीय झालेले आहेत आणि यामुळेच राजकारण्यांचे फावते. असे लेख हल्ली पहावयास मिळत नाहीत. राजू परुळेकर सर कौतुकास निश्चितच पात्र आहेत.

  या लेखातील विवरण व photo व्यथित करणारे आहेत कारण थोडी का असेना राज यांच्या कडून अपेक्षा होती आणि अजूनही आहे. खरोखरच MNS ला एक दीड वर्षाच्या कालावधीत अगदी हे सुद्धा का करता येऊ शकले नाही हा प्रश्नच आहे. येणाऱ्या काळात कुठल्या पक्षा कडून अपेक्षा कराव्यात?..

  राज MNS float करत असतांना राजू परुळेकर सरांनी राज यांची तारीफ करणारा लेख मी एका साप्ताहिकात (नाव आठवत नाही, कदाचित लोकप्रभा किंवा चित्रलेखा असावा) वाचला होता. त्यावर आता परुळेकर सरांची श्रद्धा राहिली नाही काय?…

  धन्यवाद.

 5. shailesh says:

  Dear Raju ,
  have you stop writing blogs again , since after this blog there is no new blog , last vidhansabha election there was no comment from your end
  infact many ups and down happened during election
  we need your blogs , please continue

 6. भागवत क्षिरसागर says:

  अभ्यासपूर्ण स्टोरी , सर्व देशात लागू होणारी . आभार .

 7. Shripad J lele says:

  राज ठाकऱ्यांचे बोलणे आजकाल “बालिश बहू बायकांत बडबडला” अशा प्रकारचे वाटते, नाशिक महानगरपालिका ही एक संधी मानून त्यांनी काम केले असते तर ते आज संपूर्ण भारतात पोहोचले असते. पण त्यांची ब्लु प्रिंट कोठे हरवली कोणास ठाऊक? बाष्कळ बडबडीशिवाय त्यांनी काय केलाय कोणास ठाऊक? चेष्टा, नकला आणि व्यंगचित्रे ह्याची सनद काय महाराजांकडून मिळाली होती.
  टोल आंदोलनातील गफला लोकांना समजावण्याची आवश्यकता नाही. नाशिकचा गंगा घाट स्वच्छ च करायचा होता तर नव्या मुंबईतील STP चे अनुकरण केले असते तरी दोन वर्षात योजना पूर्ण झाली असती. जगात चांगले काय आणि कोठे आहे, आपल्याला काय हवे आहे ह्याचा अभ्यास केला असता तर नाशिक सहज सुंदर झाले असते.
  ज्या देशातील नागरिक सुप्त आहेत, पत्रकार दिखाऊ आहेत त्या देशातील राजकारणी असेच वागणार!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s