ऍनॉटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली


ऍनॉटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली

राजू परुळेकर

 (हा लेख ग्राहक हित’च्या दिवाळी अंकामध्ये छापला जाणार आहे परंतु हा लेख न छापला जाण्याचीही प्रबळ शक्यता आहे.
परंतु ग्राहक हित ने हा लेख छापला किंवा न छापला जे काही असो ते असो हा लेख मी ब्लॉग वर पोस्ट  करत आहे.
नि:संदिग्धपणे ग्राहक हित’ने  खूप आग्रह केल्यामुळेच ग्राहक हित साठीच हा लेख मी लिहिला गेला होता.

त्यांनी तो छापला तर मला आनंदच आहे . 
न  छापला तर कुणाला पर्वा पडली आहे कारण आग्रह त्यांचाच होता. 
लेखक माघार घेत नाहीत…….  कधीच )

ऍनॉटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली 

IMG-20151030-WA0005

तसं बघायला गेलं तर आजच्या राजकीय सख्ख्या आणि चुलत ठाकरे कुटुंबापुढे बाळासाहेब ठाकरे हे सूर्यच होते.

सूर्य याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे सूर्य होते असा जश्याचा तसा नाही. त्याविषयी मी २००३ साली ‘शिवसेना : भासमान आणि वास्तविक’ या लेखात लिहिलेलं आहे. तो लेख माझ्या ‘आयडीयाज आर डेंजरस’ या पुस्तकात समाविष्ट आहे.

हा लेख(अ‍ॅनॉटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली) ठाकरे कुटुंबियांसंबंधी आहे. शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणासंबंधी नाही. त्याअर्थाने हा लेख मर्यादित आहे. त्यामुळे सूर्य असा उल्लेख कुटुंबियांसंदर्भात बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतीत इथे क्रमप्राप्त ठरतो. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संपूर्ण ठाकरे परिवार बाळासाहेब या एका नावाभोवती गोल फिरत राहिलेला आहे. जे काही कर्तुत्व बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलं त्या पुंजीवर संपूर्ण कुटुंब आपल्या आणि आपल्या चकवा लागलेल्या भोवतीच्यांच्या  इच्छा आकांक्षा पूर्ण करीत राहिलेलं आहे.

बाळासाहेबांनी ज्या काळात शिवसेना उभी केली (१९ जून १९६६) त्याकाळात ठाकरे कुटुंबापाशी प्रबोधनकारांची लेखणी, पुरोगामित्व आणि संयुक्त महाराष्ट्राच्या सहा वर्षांपूर्वी संपलेल्या लढ्यात प्रबोधनकारांनी वाहिलेली फुलाची पाकळी हेच काय ते भांडवल होतं.

बाळासाहेब ठाकरे यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात फारसा काही सहभाग नव्हता, तो लढा त्यांनी जवळून पाहिला असे फारतर म्हणता येईल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये डाव्या, समाजवादी, हिंदु महासभा यासारख्या पक्षांचे दिग्गज नेते सामील होते. या लढ्याचे खरे तेजोनिधी सूर्य होते ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. मराठी भाषा, महाराष्ट्र, मुंबई, लेखन, वक्तृत्व, नाटक, चित्रपट, पत्रकारिता आणि बेडरपणा यामध्ये आचार्य अत्र्यांचा उभ्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे हात धरू शकले नाहीतच. एवढेच काय तर अत्र्यांच्या पासंगालाही बाळासाहेब पुरले नाहीत असं म्हटलं तर ती फारशी अतिशयोक्ती अजिबात होणार नाही.

परंतु संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ओसरल्यावर अपघाताने आलेल्या संधीचे बाळासाहेब ठाकरे यांनी सोनं केलं आणि एक असाधारण गुण जो अत्र्यांमध्ये कधीच नव्हता तो दाखविला, तो म्हणजे संघटनाकौशल्य.

शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी असे बिरूद लावून जरी केली असली तरी कोणत्याही प्रकारच्या तत्वज्ञानाचा शिवसेनेला आधार नव्हता.
संधीसाधूपणा हे एकच तत्वज्ञान बाळासाहेबांनी स्वत:च्या माध्यमातून संघटनेत बेमालूमपणे पेरलं आणि संघटना वाढवत, मोठी करत नेली. बेमालूमपणे असा शब्द मी वापरला याचं कारण हा बाळासाहेब ठाकरे यांचा संधिसाधूपणा कळायलाही महाराष्ट्राला ५० वर्षे घालवायला लागली.
तोपर्यंत कधी मराठी, कधी हिंदुत्व, कधी मुस्लीम लीगच्या बरोबर, कधी समाजवाद्यांबरोबर, कधी भाजपाबरोबर शिवसेना नांदत राहिली. अगदी मुस्लीम जात्यंध स्मगलर हाजी मस्तान बरोबर सुद्धा.

असंख्य मराठी तरुणांनी शिवसेनेचा भगवा झेंडा उचलला, नाचवला, सुरे काढले, कोथळे काढले, माणसं मेली-मारली, जेलमध्ये गेले, रक्त ओकते झाले.
अनेकांच्या आयुष्याचा वणवा झाला.
अख्खा गिरणगाव मरून सुकून गेला त्यावर पुन्हा ठाक-यांचीच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भागीदारी असलेले टॉवर उभे राहिले.

IMG-20151030-WA0003

ठाकरे कुटुंबीय (सख्खे आणि चुलत) बाळासाहेबांच्या गुणावर देशातल्या एका धनाढ्य कुटुंबांपैकी एक झाले, तेही कोणताही सांगण्याजोगा अधिकृत व्यवसाय न करता.
पण या सा-यापलीकडे आपण मराठी माणसांनी बाळासाहेब ठाकरेंवरचं प्रेम आणि निष्ठा अभंग ठेवली आणि ‘का?’ असा प्रश्न कधीच विचारला नाही. हे यश बाळासाहेब या माणसाचे.

ठाकरे कुटुंबियांसंदर्भात विचार करताना बाळासाहेब, उद्धव, राज आणि आदित्य एवढीच माणसं मी घेणार आहे, कारण राजकारणापलिकडचे कुटुंब मग ते मित्राचे असो वा शत्रूचे, आपल्यांचे असो वा विरोधकांचे हा त्यांच्या परवानगीशिवाय सामाजिक चर्चेचा विषय होऊ शकत नाही हे तत्व मी नेहमीच पाळतो, मात्र जे राजकारणात आले ते कुटुंबीय स्वतःहून सामाजिक चर्चेसाठी उघड आहेत, उपलब्ध आहेत आणि त्यांच्यावर साधक बाधक चर्चा केली जाऊ शकते, टीका केली जाऊ शकते हा लोकशाहीचा नियम आहे. हा लेख या दृष्टीनेच पुढे जाईल.

बाळासाहेबांनी आपलं कुटुंब, शिवसेना, एकंदरीतच आपले  राजकारण व्यवसायासारखे पिढीजातपणे चालवले जाईल हे सुरुवातीला महाराष्ट्राला वा शिवसैनिकांना अजिबात जाणवू दिलं नाही.
किंबहुना बाळासाहेब आपण राजकारण करत आहोत हे लोकांना कळू नये म्हणून सुरुवातीच्या काळात, ‘२०% राजकारण आणि ८०% समाजकारण हेच आमचे धोरण’ किंवा ‘राजकारण म्हणजे गजकर्ण’ अशा खुबीदार घोषणा बोलत असत. ज्या तद्दन फेक होत्या, त्या भोंदुबाजपणाला आपण मराठी भुलत गेलो.

IMG-20151030-WA0004आज राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसेच्या) माध्यमातून बोलतात एक आणि करतात दुसरेच किंवा संधिसाधूपणापुढे कशाला कशाचा पायपोस ठेवत नाहीत, त्याचे मूळ शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेला सुरुवातीलाच बाळासाहेब नावाच्या ठाकरे कुटुंब सूर्याने घालून ठेवलेले आहे. तेव्हा ते लोकांना कळले नाही एवढेच.

बाळासाहेब ठाकरेंच्या अखेरच्या भाषणामध्ये त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेला किंवा नंतर वेळोवेळी अनुक्रमे मराठी, हिंदू, महाराष्ट्रीय, अस्सल भारतीय, कडवट शिवसैनिक वगैरे वगैरे जनतेविषयी दाखवलेला कळवळा दिसत नाही. उलट  बाळासाहेबांनी विकल अवस्थेत अखेरच्या भाषणात महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले की, ‘माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा’.
मराठी माणसाला, हिंदू माणसाला, महाराष्ट्राला, भारताला सांभाळण्याची मागणी बाळासाहेबांनी केली नाही. अर्थात यात व्यक्तिश: मला अजिबात आश्चर्य वाटले नाही कारण ज्या संधिसाधूपणाचा पाया १९६६ साली शिवसेनेच्या रूपाने बाळासाहेबांनी घातला होता त्याचा हा  कळस होता एवढचं.

ठाकरे कुटुंबियांचा लघुत्तम साधरण विभाजक (ल. सा. वि.) काय? असा प्रश्न मला कोणी केला तर मी ही वाक्ये उचलून दाखविन.

IMG-20151030-WA0006

बाळासाहेबांच्या शेवटच्या भाषणात मुलगा आणि नातू यांना सांभाळून घ्या या आवाहनाला एक मोठीच कौटुंबिक पार्श्वभूमी होती त्या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या शरीरशास्त्राची उकल करणे म्हणजे ठाकरे कुटुंबियांना समजून घेणे होय.

उद्धव ठाकरे हा बाळासाहेबांचा मुलगा. तारुण्यात पदार्पण करताच इतर राजकारण्यांच्या मुलांप्रमाणे ‘राजकारणाच्या व्यवसायात’ पाऊल ठेवणे त्याला जमले नव्हते.
उद्धव हा तसा शांत, संयमी, लाजाळू आणि बराचसा आत्मविश्वासाची कमी असलेला होता.
राजकारण हा त्याचा नैसर्गिक प्रांत नाही याची त्याला त्याकाळी जाण असावी.
वडिलांप्रमाणे आक्रमकतेचा आव आणणे त्याला जमत नसे.
त्याचा ‘मोल्ड’ हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कायस्थ घरातल्या मुलाचा होता.
वक्तृत्व, बुद्धिमत्ता, चलाखपणा, आक्रमकता किंवा लोकाभिमुखता यातलं काहीही त्यावेळेला उध्दवपाशी नव्हतं आणि याची त्याला त्यावेळी जाणिव होती असे आता मागे वळून पाहताना वाटते.

परंतू त्यावेळीची ठाकरे कुटुंबियांची जवळची माणसे असे सांगतात की केवळ बाळासाहेबच नव्हे तर बाळासाहेबांच्या पत्नी आणि उद्धवच्या आई मीनाताई ठाकरे यांची इच्छा होती की बाळासाहेबांच्या राजकारणाचा हा व्यवसाय उद्धवने पुढे सांभाळावा.

दुस-या बाजूला, बाळासाहेबांचे बंधू संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच ‘साप्ताहिक मार्मिक’ आणि शिवसेनेच्या इतर कामांच्या बोजाचा मोठा वाटा स्वतःपाशी उचलला होता. त्यांची भूमिका लक्ष्मणाची होती.

IMG-20151030-WA0010

मात्र त्यांचा मुलगा राज ठाकरे हा बाळासाहेबांसोबत अगदी लहान वयापासून वाढला. तो उद्धवपेक्षा बहिर्मुख, राजकारण आवडणारा, बाळासाहेबांप्रमाणेच संधी अचूक हेरणारा आणि कोणत्याही प्रकारचे तत्वज्ञान न मानता राजकीय तडजोडी करणारा व साध्यसाधन सुचिता न मानणारा होता किंवा बाळासाहेबांच्या सहवासाने तसा घडत गेला असं आपण समजू शकतो.

१९९५ साली शिवसेनेकडे सत्ता येईपर्यंत उद्धवच्या राजकारणासंदर्भातल्या जाणिवा आणि ठाकरे कुटुंबांतर्गतच्या घडामोडी कुणालाच ज्ञात नव्हत्या.
राज ठाकरे हा बाळासाहेबांचा वारसदार असण्याची कल्पना सर्वांनी मनाशी पक्की केली होती कारण बाळासाहेबांसोबत त्यांचा हुबेहूब अभिनय करणारा, त्यांची छोटी प्रतिकृती असल्याचा भास निर्माण करणारा राज सतत त्यांच्या सोबत असे.

वास्तवामध्ये, इंदिरा गांधींच्या घराणेशाही विरोधात बाळासाहेबांनी विनोदी आणि टर उडवणारं जेवढं बोलणं आणि लिखाण केलं तेवढं क्वचितच महाराष्ट्रातल्या इतर कोणी नेत्यांनी केलं असेल, पण आपली वेळ आल्यावर कुटुंब प्रथम या न्यायाने त्यांनी सुरुवातीला पुतण्या मग मुलगा आणि नंतर नातू वगैरे वगैरे हेच आपल्या सत्तेचे केंद्र आणि उत्तराधिकारी बनविले.

IMG-20151030-WA0009

राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाला शिवसेनेमध्ये जेव्हा शिवसेनेची सत्ता आली तेव्हा खरं ग्रहण लागू लागलं. बाळासाहेबांना कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्धवला आपला वारस आणि उत्तराधिकारी बनवायला हवं होतं. राज जवळचा आणि कुटुंबीय असला तरी चुलत होता. शेवटी आपलं रक्त ते आपलं रक्त आणि तेही सख्खच हवं हा भारतीय राजकारणात मुरलेला ढोंगीपणा, ज्याला बाळासाहेब ठाकरे अपवाद ठरले नाहीत.

राज जास्त काळ बाळासाहेबांच्या सहवासात राहिल्यामुळे त्याला सत्तेच्या खाचाखोचा वरवर का होईना थोड्या जास्त माहित होत्या, त्या खाचाखोचा आणि त्यांचे परिणाम याबाबत उध्दव अनभिज्ञ होता, निदान सुरुवातीला तरी तसं वाटलं.

दुर्दैवाने, राजचा उद्धटपणा, इतरांचा अधिक्षेप करण्याची वृत्ती, अरेरावी, नार्सिसिझम (Narcissism, संदर्भ वीकिपिडीया) या गुणांनी धास्तावलेली शिवसेनेतली काही बुजुर्ग मंडळी मनाने उद्धवच्या बाजूने उभी राहिली. या घटनेचे दूरगामी परिणाम शिवसेनेवर झाले.

राज ठाकरे यांनी स्वत:ची संघटना उभी केली. राज ठाकरे यांनी संघटना स्थापन केल्यावर ज्या चुका केल्या, जो आत्मकेंद्रीपणा दाखविला ते सारे दोष बाळासाहेबंमध्येही होते. पण शोकेस म्हणून.

मात्र बाळासाहेब शिवसेनेच्या स्थापनेपासून सत्ता येईपर्यंत (१९६६-१९९५) तरी शिवसैनिकांसमोर मृदू आणि सहज उपलब्ध होते, शिवाय ते पहिल्या पिढीचे नेते होते, संघटना त्यांनी उभी केली होती या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या ज्या राज ठाकरेंकडे नव्हत्या. राज ठाकरेंना हे तत्काळ हवे होते. महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर बाळासाहेबांच्या वर्तनातले शोकेस बदल राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षाच्या सुरुवातीपासूनच अंगिकारले. बाळासाहेब सुरुवातीपासून असे आत्यंतिक अहंमन्य व गर्विष्ठ नव्हते. बाळासाहेबांचा वयाच्या ५०-५५ पर्यंतचा काळ मध्यमवर्गीय म्हणूनच गेला. याउलट राज व उद्धव ठाकरे यांच्याकडे तारुण्यापासूनच मोठ्या प्रमाणावर आर्थिक शक्ती, मनुष्यबळ व इतर संसाधनं उपलब्ध होती.

यातल्या ब-याच संसाधनांचे स्त्रोत हे बेकायदेशीर होते आणि या सा-या ‘ग्रहमालेचे’ सूर्य होते ते बाळासाहेबच.

तरीही राज शिवसेनेतनं बाहेर गेल्यावर काही काळ उद्धवसाठी फार त्रासदायक गेला कारण राज बाळासाहेबांचे प्रतिरूप असल्याप्रमाणे भासमान चित्र निर्माण करण्यात काही काळ यशस्वी ठरला. परंतु पुढे जे संकोचीपण उद्धवच्या बाबतीत उद्धवला त्रासदायक ठरू पाहत होते तेच वेगळेपण आणि संकोचीवृत्ती पुढे त्याची ढाल बनली.

झाले असे की, शिवसेनेकडे जमा झालेल्या सरंजामी नेत्यांचा सत्ताकांक्षी फार मोठा समूह हा उद्धवसोबत राहिला कारण त्यांच्या आकांक्षा अधिक मवाळ नेत्याबरोबर पु-या होणे सोपे आणि सोयीचे होते. याउलट राजच्या एकचालकानुवर्तित्वामध्ये कोणत्याही प्रकारचे नाविन्य आणि नवीन जाणिवा नव्हत्या. कोणत्याही मानवसमूहाला स्वप्न देण्याची ताकद नव्या पक्षामध्ये लागते ती राजकडे नव्हती.

त्यामुळे त्याचा सुरुवातीला भपका आणि चमक जशी वर्षे सरायला लागली तशी ओसरू लागली. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या उभारीच्या काळामध्ये स्वतःची स्थानिक ‘न्यायालये’ स्थापन करून अनेकांना खंडणीचा (extortion) एक पर्यायी (गुन्हेगारी) मार्ग उपलब्ध करून दिला.

राजच्या नव्या पक्षातले नेते पहिल्याच दिवसापासून हे सुरु करू लागले जे लोकांना, समर्थकांना स्वीकारार्ह नव्हते. बाळासाहेबांचा काळ संपूर्णपणे बदलला होता. तरुणांच्या जाणिवा, समज आणि अपेक्षा बदलल्या होत्या. त्यामुळे नवी स्वप्ने आणि जाणिवाविरहीत, उद्धट आणि खंडणीखोर पक्ष अशी प्रतिमा वेगाने राजच्या (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) पक्षाची होऊ लागली.

दुस-या बाजूला त्याची मराठी समाजासंदर्भातली आश्वासने ही बाळासाहेबांच्या काळातल्या जुन्या बाटलीतली नवी दारू होती तिचीही जादू टिकू शकली नाही कारण महाराष्ट्र आणि मराठी माणूस यासाठी नेमकं काय करायचं हे जिथे बाळासाहेबांनाच मुद्दलात कळलं नव्हतं तिथे राज ठाकरेंचा पाड लागणं केवळ अशक्य होतं. जनसमूह बदलला होता. काही काळ भुरळू शकेल पण सावधानता सोडणार नाही असा जनसमूह राजच्या वाट्याला आला होता, जो तरुण होता, उद्यमशील होता, मुख्य म्हणजे सोशल मिडीयाद्वारे अपटूडेट झालेला होता…

दुसरीकडे उद्धव समकालीन जग आणि समकालीन प्रश्न हे बाळासाहेबांच्या काळातील राहिलेले नाहीत यापासून भयंकर अनभिज्ञ होता व आहे (पक्षी: सामना).

समोरच्याला इतिहासात रममाण करून आपल्या कुटुंबियांचे उखळ पांढरे करण्याचा काळ बाळासाहेबांबरोबरच संपला होता कारण सोशल मिडीया नावाचा दैत्य सर्वच राजकारण्यांच्या मानगुटीवर बसला होता.

उद्धवने याचे उत्तर आदित्य या आपल्या थोरल्या मुलामध्ये शोधलं. जटील प्रश्नांचे सोपेकरण करण्याची ठाकरेंची हास्यास्पद परंपरा यामुळे कायम राहिली. बाळासाहेब काश्मीरबाबत म्हणत असत की, ‘घुसवा रणगाडे आणि संपवून टाका समस्या’. अशी समस्या सुटती तर इंदिरा गांधींपासून कोणत्याही नेत्याने रणगाडे घुसविले असते.

जटील प्रश्नांना सोपी उत्तरे नसतात, हे ठाकरे कुटुंबियांना कधीच कळले नाही. बाळासाहेबांमागोमाग उद्धव आणि राज हे असे उत्तर शोधीत निघाले ज्यांना प्रश्नच माहित नव्हते. अशाच एका प्रश्नाचे, जो प्रश्न उद्धवला माहित नव्हता त्याचे उत्तर म्हणून त्याने आदित्यला राजकारणात आणलं.

प्रश्न माहित नसताना उत्तर शोधणारा चौथा ठाकरे एवढीच आदित्यची ओळख आहे आणि त्याहून ती वाढण्याची सुतराम शक्यता नाही.

सख्ख्या आणि चुलत ठाकरे कुटुंबियांचे एकंदरीत गेल्या ५० वर्षांचे राजकारण प्रश्नांपासून प्रश्नांकडे चालले आहे, या प्रश्नांपासून प्रश्नांकडे होणा-या प्रवासामध्ये ठाकरे कुटुंबियांनी पैसा, प्रसिद्धी, सत्ता, मान्यता अमाप कमावली. किंबहुना आपण मराठी माणसांनी त्यांना कमावून दिली. हा पैसा, हि प्रसिद्धी, हि सत्ता आणि हि मान्यता, टाटा, बिर्ला, अमिताभ, तेंडुलकर यांच्याएवढी आहे. विशेष म्हणजे वर उल्लेखिलेल्या महनियांपैकी कोणाहीप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात कसलेही कर्तृत्व न गाजवता.

ज्या मराठी माणसाच्या रक्तमांसाच्या चिखलावर हा पैसा, प्रसिद्धी, सत्ता, मान्यता निर्माण झाली त्याला आजही ठाकरे नावाचे थोडे का होईना कुतूहल आणि आकर्षण वाटते, याचं मुख्य कारण म्हणजे भक्तालाच नेहमी देवाची गरज असते त्यातून देवाची मंदिरं, त्यावर सोन्याच्या चादरी, रत्नांचे मुकुट, फुलांचे हार, आरत्यांनी जयजयकार होत राहतात.

महाराष्ट्र आणि मुंबईतल्या मराठी माणसाला वाटणा-या असुरक्षिततेतून निर्माण झालेला ठाकरे कुटुंबीय नावाचा देव कधीच पावणार नाही याची जाण मराठी माणसाला नाही असे नाही, परंतु लॉ ऑफ प्रोबॅबिलिटीप्रमाणे ‘तुला मुलगा होईल’ असे शंभर भक्तांना सांगितल्यावर चाळीसांना तर हमखास मुलगा होतोच आणि ते चाळीस मग उरलेल्या साठांवर आपल्या देवाच्या वतीने ‘ग्रुप डिक्टॅट’ करतात.

अनेकजण मला विचारतात, २००३ साली तुम्ही शिवसेनेवर लिहिलेला लेख पुढे तंतोतंत खरा ठरला तर आता पुढे सख्ख्या आणि चुलत ठाकरे कुटुंबांचे अनुक्रमे काय होईल?

सर्व प्रश्नांची सोपी आणि सुटसुटीत उत्तरे द्यायला मी काही ठाकरे कुटुंबातील नाही.

ज्या प्रश्नांची उत्तरे जटील आहेत त्यांची सोपी उत्तरे देणे हे लेखकाचे काम नाही.

दोन प्रकारचे प्रवासी असतात. पहिल्या प्रकारचे प्रवासी, प्रवासाला निघतात ते ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता. ते ध्येयापर्यंत पोहोचतात, त्यांचा प्रवास संपतो. दुस-या प्रकारचे प्रवासी असतात ते प्रवासाला निघतात त्यांना ध्येय माहित नसते ते प्रवास करत राहतात आणि त्यांच्या सहका-यांना चकवा लागल्यासारखे त्यांच्यासोबत फिरत बसावे लागते. ठाकरे कुटुंबीय हे ह्या   दुस-या प्रकारातील आहेत. त्यांचा प्रवास चालू होता, चालू आहे आणि चालू राहील!!

त्यांच्या ध्येयाबद्दल विचारलं तर राज, उद्धव, आदित्य आणि येऊ घातलेले कोणीही ठाकरे किंवा अगदी होऊन गेलेले बाळासाहेब यातल्या कुणालाही ध्येय माहित नव्हतं. आपण सर्वांनी मिळून त्यांच्या प्रवासात त्यांना साथ दिली, त्यांचा पाहुणचार केला, त्यांना त-हेत-हेचे भोग दिले, आपले अश्रू, घाम आणि रक्त त्यांच्यासाठी अर्पण केले, हा प्रवास असाच चालू आहे. चार-पाच शब्दांत सख्ख्या आणि चुलत ठाकरे कुटुंबाच्या प्रवासाची गोळाबेरीज लिहायची झाली तर : मर्द, मावळे, कावळे, खंडणी, खंजीर, कोथळा, घोडे, विराट, अतिविराट, वेडे, अचाट, पुचाट. इती अस्तु!

राहता राहिले राज ठाकरे आणि त्यांची तथाकथित लोकप्रियता!

IMG-20151030-WA0008

जी लोकप्रियता आत्मकेंद्री अभिनेत्याची आहे. शिवाय आपल्या कुटुंबातील सूर्य म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिरूप नकलेची पण आहे. किशोर भानुशाली नावाचा माणूस हळूहळू आपल्याला देव आनंद वाटायला लागतो याचे कारण समाजाच्या सामूहिक मेंदूमध्ये जेवढे लपलेले आहे तेवढेच अस्सल दिवे उपलब्ध नसतील तर मेड इन चायना दिवे लागतातच की!

ठाकरे कुटुंबातील राज ठाकरेंची लोकप्रियता प्रतिरूप अभिनेता यापलीकडे नेत्यामध्ये परावर्तीत होणे नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आणि साधेपणा याचे ठाकरे कुटुंबालाच वावडे आहे. राज ठाकरे त्यात आज अग्रभागी आहेत.

ते व त्यांचा पक्ष, मावळे, कावळे, खंजीर, कोथळा, खंडणी, घोडे, विराट, अतिविराट, वेडे, अचाट, पुचाट यात जास्तीत जास्त एकाच कार्यक्रमाची भर घालू शकतात. तो म्हणजे-मराठी भोंडला.

आता या कुटंबियांशी राजकीय दृष्ट्या किती आणि कधी जुळूवुन घ्यावं हे ज्याचे त्याने ठरवावं.

थोडक्यात, महत्त्वाचे, न आलेले- ठाकरे कुटुंबियांमध्ये १९९५ साली शिवसेनेची सत्ता आल्यावर अडीच तीन वर्षे बाळासाहेबांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांचा राजकीय धाक, दबदबा, प्रस्त प्रचंड वाढलेले होते त्यातून महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाची घटनाही घडली, या एपिसोड बद्दल मी या लेखात फारसे काही लिहिले नाही कारण हा एपिसोड राजकीय असला तरी तो अराजकीय होता.

इतिहासात काही सोन्याचे हंडे गूढ रीतीने गुप्त झालेले छान असतात ते शोधण्याकरता जमीन उकरायला गेल्यास महापालिकेची महाजलवाहिनी फुटेल ही जाणिव मनात ठेवून त्याविषयी न लिहिण्याची दक्षता मी घेत आहे. वाचकांनी मला एवढे स्वातंत्र्य द्यावे.

श्रीकृष्णार्पणमस्तु!

राजू परुळेकर

ईमेल:
rajuparulekar1@gmail.com
raju.parulekar@gmail.com
मोबाईल : +९१ ९८२० १२४ ४१९
वेब: www.rajuparulekar.us

PS.

प्रती,
ग्राहकपेठ….

ग्राहकपेठ दिवाळी अंकासाठी माझा लेख पाठवीत आहे.
त्याचे शीर्षक कृपया बदलू नये.

हा लेख चार वेळा सुधारून विचारपूर्वक लिहिलेला आहे जो गोळीबंद आहे.

प्रत्येक शब्द आणि त्याच्या अर्थाची जबाबदारी माझी आहे. गरज वाटल्यास तसे नमूद करावे.

ठाकरे कुटुंबियांशी जवळचा संबंध असूनही हा लेख असा लिहिण्याचे कारण हे मी लिहिले नाही तर कोणीच लिहिणार नाही हे आहे.

बाकी राज, उद्धव, बाळासाहेब आणि इतर कुटुंबीय यांच्याविषयी गोडगुलाबी लेख अनेकांनी लिहिले आहेत, मी स्वत:ही लिहिले आहेत.

एक तर ग्राहकहितच्या दिवाळी अंकातच मी स्वत: लिहिलेला आहे (राज नावाचा राजा) या लेखातल्या विश्लेषणाला लेखक म्हणून मी जबाबदार आहे. या लेखाचे यश संपादकांचे आहे कारण त्यांनी मला हे लिहिण्यास लिहिते केले. संपादकांना गरज वाटल्यास लेखासोबत हे पत्र छापण्याची पूर्व परवानगी मी देत आहे.

मात्र लेखामध्ये, शब्दांमध्ये किंवा रचनेमध्ये बदल करू नयेत अशी मी विनंती करतो कारण मग या लेखाच्या रचनेचा अर्थच बदलून जाईल अर्थात जबाबदारीही.

आपणा सर्वांस दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा.

– राजू परुळेकर

कोणत्याही पत्रव्यवहारासाठी पुढील ईमेल वर संपर्क साधावा.

rajuparulekar1@gmail.com

raju.parulekar@gmail.com

+91 9820124419

 

मोबाईल : +९१ ९८२० १२४ ४१९

वेब: www.rajuparulekar.us

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

30 Responses to ऍनॉटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली

 1. मराठी अंबर says:

  वस्तुनिष्ठ आणि अप्रतिम लेख.आभासी प्रतिमा निर्माण करण्यात नेते कसे यशस्वी होतात ह्याचे सुरेख शब्दांकन .

 2. ashishvilekar says:

  “Anatomy ऑफ ठाकरे फेमिली” हा लेख वाचला मोकळेपणाने लिहिलंत तेही आवडले ! तारतम्याने लिहिलेत तेही आवडले ! मात्र एक गोष्ट निश्चित कळली नाही
  आपण उदघृत केलेल्या ह्या वाक्यात “त्याचा ‘मोल्ड’ हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कायस्थ घरातल्या मुलाचा होता.” हातून नेमके काय ओळखायचे ? सगळ्याच कायस्थ घरातल्या मुलांचा मोल्ड आत्मविश्वासाची कमी असलेला असतो असे आपले निरीक्षण सांगतेय किंवा सुचवतेय का ? कळविल्यास त्यावर काही उपाय योजता येतील ! जमल्यास कळवा ! सस्नेह -आशिष सुदर्शन विळेकर

 3. नितीन कुळकर्णी. says:

  एक अत्यंत सुंदर आणि ओघवत्या शैलीतील परखड लेख. खूप अभ्यासपूर्ण मांडणी.

 4. Krishna Gawade says:

  लेख अप्रतिम
  अचूक संयत शब्दात केलेल तटस्थ विश्लेशण आवडलं

 5. Sunila says:

  The article is written with thorough study …Thank you….But there are skeletons in each ones closet and if all come tumbling down the world would be a graveyard….
  All said and done you need a lot of courage to write about the T family….kudos to you for showing that courage. …looking forward to hearing more after Kalyan Dombivali election results. ….

 6. bvardhekar says:

  मी वर्डप्रेस.कॉम या ब्लॉगवर तुमचा ठाकरे फॅमिलीबद्दलचा लेख वाचला. त्रयस्थपणे लिहिला तर आहेच याबद्दल अभिनंदन! पण सारासार विचार केला तर केवळ तुमचा त्यांच्याबद्दल असणारा सुप्त आकस कोठे ना कोठेतरी डोकावत होता. त्याबद्दल मी आत्ता काही लिहू इच्छित नाही ! सध्याच्या काळात एकूण महाराष्ट्रातील
  ‘तमाम’ विचारवंतांचा वैचारिक सुंता झालाय. सोयीनुसार भूमिका घेणं यात नवे काही नाही. यंदा मात्र रोजच्या जगण्यात दळणवळण माध्यमांच्या आगंतुक शिरकावामुळे लोकांचा ‘अंगार’ लागलीच उफाळून येतो ‘आदेश’ आला की क्षमतो देखील! हा मुद्दा काही इथं महत्त्वाचा नाही कारण इतिहास साक्षीदार आहे की सेनापती जेवढे प्रगल्भ असतात तेवढे कार्यकर्ते असत नाहीत वा होऊ दिले जात नाहीत! क्वचित मोठे होतात पण ‘शेणापती’च राहतात. आपली भूमिका सुसंगत घ्यायची की अनुसरून घ्यायची किंवा आदेशाची वाट पाहून घ्यायची याचा मेळ लागत नाही! कारण ‘विठ्ठल’ नामापुरताच असतो सगला अवडंबर ‘बडव्यांपाशी’ घुटमळत असतो! राहिला प्रश्न तो सोयीच्या राजकरणाचा! तसं महाराष्ट्रातील एकूण राजकीय घडामोडीत चव्हाण, पवार आणि ठाकरे घराण्यांची निर्विवाद मक्तेदारी राहिली आहे. यात कोणाकोणाचे भले झाले हा संशोधनाचा विषय आसे. एकंदरीत महाराष्ट्रातील सगळ्याच साहेबांनी काहींना कामाला लावले, काहींना धंद्याला लावले तर काहींना कामधंद्याला लावले! उर्वरीत महाराष्ट्रात ठणठण गोपाळ! गेल्या पाच दशकात एकाच मराठी माणसाच्या यूएसपीवर उभी आडवी मुंबापुरी दुमदुमत ठेवली आणि एवढं होत असताना एवढे परकीय लोंढे विस्तारत गेले यात सगळ्यांचाच नाकर्तेपणा आहे. केवळ एकाच घराण्याची एनॉटॉमी बद्दल लिहून तुम्हाला थांबून चालणार नाही. एकूणच संपूर्ण देशाची घराणेशाहीमुळे वाट लागलीय आणि विल्हेवाट लावण्यासाठी पुढची पिढी आतुर आहे. दूर्दैव हेच की असं ढळढळीत सत्य समजणारे सूज्ञ लोकांची कमतरता आहे. कोणीतरी सोम्या येईल आमचं कल्याण करेल अशी भोळी आशा बाळगून जनता जगत आली आहे. मात्र सोम्या येतो गोम्याचं कल्याण करतो नंतर गोम्या येतो आणि सोम्याचं कल्याण करतो. तर ह्या सोम्या गोम्यांचा गोतावळा त्रयस्थपणे संकीर्ण महाराष्ट्रातील जनतेला समजेल. तसेच एकूण तुम्ही एकाच चष्म्यातून सगळीकडे पाहताय असे तार्किकपणे म्हणावे लागेल. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच !

 7. vinay says:

  Mastach, Aata tumhi Motilal Nehru gharanyacha kulvrutant, Shaikh Abdulla gharanyacha kulvrutant kiva he far lambche zale tar Sahakar Smarat Patil athava (or) swatahla Janta Raja Mhanavnare athava Malvan Kankavliche subhedar, Satara che 1962 che prati shivaji hyanche kulvrutant asech wachnat yevot hich itccha. Ekhada kulvrutant itaka “sundar” aani “nipakshpati” lihava tar to tumhich mhanun itarhi kulvrutant lihun adyani lokan na dyani karave hi vinanti.

 8. ठाकरे फॅमिली वरील आपला लेख सत्‍य मांडणारा आहे.
  झुंडशाहीला मिळालेली राजकिय मान्‍यता अस म्‍हणता येईल याची आता खात्री पटली आणि म्‍हणूनच असे राजकारणी असूच नये असे तेव्‍हा ही वाटत होत आता निश्चितपणे वाटत.
  धन्‍यवाद.

 9. sunil jog says:

  Gr8 ! Very practical analysis. I am watching Thakare family since 1970-71 onwards when I was young. And as you have rightly pointed out, and also as I have closely observed from my personal point of view (not from the political one), I had the same opinion.coz i was closely associated when the 1st Sena branch which was opened in Sangli and how the corrupt leaders were reappointed in spite of public outrage. At that time Vasantdada told us – I had warned abt this guy but u people did not listen to me. Finally we; around 250 Sainiks left the branch and the corrupt leader became Mayor of Sangli. That is the history. Secondly, we were aghast with his style – One had to bow before him whenever one would go to his home for visit – which we could not digest even then and now.

  Thirdly the most shocking was his support to Emergency ! At midnight it was proclaimed and in the morning Sena supported it. This was certainly selfish approach to save his skin. Same history repeated when Bhujbal decided to arrest him. He was coward enough to get arrested and therefore created an atmosphere to avoid it and I had strongly predicted it with my friends. I wonder still Marathi manoos gets awashed on the waves of emotions like Marathi, Marathi Bana in this virtual world ? When are we going to awake ?

  Thats why they were opposing to release of Sarkar showcasing his black side ! I would call it only one name – a sophisticated, polished and stylish mafia org of one man army followed by blind followers or selfish creatures. Alas in this country people devote such persona – may be Bapu, Baba in Spirituality or Saheb,Dada in political field or Dev Anand, R. Khanna Govind,Suniel Shetty in movie world. This is India. Things/psycho has still not changed even after 1947 or 150 yrs prior to it !

 10. D.P.Bhate says:

  लेखात मायकेल जक्सनचे बरेच फोटो आहेत पण त्यावर काहीच भाष्य नाही असे का?

 11. Nandkumar Deshpande says:

  Lekh uttam ahe. Mi pan shivsena 1970 pasun pahato ahe . Tumhi kelele varnana agdi barobar ahe . Pramanik v spast lihalyabaddal dhanyavad .

 12. Avinash says:

  Kudos to you & your courage !!!
  Thanks for enlighting us by appropriate use of social media . More power to writer in you .
  Expecting or rather requesting equally courageous article on – P family . ( Hope you have keen observation on them ).
  All the best . BTW when you releasing your next book?

 13. Manohar Sapre says:

  Admire your blunt and boldness in express your views!

 14. Arun says:

  farach sunder, satya apan mandale ya baddal dhanyawad. Sarv janatene vachava asa lekh ahe. pakistanat rangade ghusavu mhananare, mumbait surakshit gharat zhopatat.

 15. Nikhil Kulkarni says:

  प्रिय राजू,
  लेख छान आहे. त्यातील शेवटची ‘गूढ हंड्याची’ ओळ तर फारच भेदक आहे! कोणत्याही पारड्यात वजन जास्त न टाकता १००% तटस्थ राहून लिखाण करणं, जे आहे – जसं आहे तसं बघणं, त्याचं अवलोकन करणं हे खरंच अवघड काम आहे. मुळातच वृत्तीवर पडलेल्या सर्व दृश्य-अदृश्य दबावांना झुगारून एक सच्चे लिखाण करणे हे आव्हानात्मक काम तुम्ही छान पार पाडले आहे.

  सहज प्रतिक्रिया वाचत असता, तुम्ही वर नमूद केलेल्या २ लेखांचा संदर्भ दिसला (पवारांचा हात, शरद (सेतू) पवार). ते वाचण्याकरिता आपली वेबसाईट बर्याचदा धुंडाळून पाहिली पण मिळाले नाहीत. कोणत्या विभागात आहेत ते सांगाल का? किंवा डायरेक्ट लिंक दिलीत तर फारच चांगलं होईल.

  आपला,
  निखिल कुलकर्णी

 16. Pingback: Controversy on “Anatomy of Thackeray Family” | Raju Parulekar's Blog

 17. सर खूप छान लिहीलेत. कदाचित हे प्रसिध्द करायला लागणारे धाडस ग्राहक हित कडे नसावे. असो. त्रयस्थपणे विचार केल्यास लेख अतिशय मार्मिक आणि भेदक लिहीला आहे. काळाची जळमटं काढून टाकून स्वच्छ दृष्टी देणारा लेख म्हणता येईल.

 18. indrajit says:

  ही फटाक्यांची माळ कोणीतरी पेटवायला हवी होतीच. तिला आग लावायचं धाडस तुम्ही केलात. सगळीकडे बिकाऊ पत्रकारीता दिसत असताना तुम्ही अभ्यासपुर्ण पत्रकारीतेवचा विश्वास दृढ केलात. धन्यवाद.

 19. Patil says:

  Thanks for very realistic article. Kudos to courage. This will help new generation to think rationally.

 20. Vijay Nirbhavane says:

  ठाकरे कुटुंबियाबाबत खट्ट वाजलं तरी ‘सामना’ उत्तर देतो…. हजेरी घेतो… आता ‘सामना’तून येणाऱ्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे…

 21. Pingback: अनोटोमी आपली आपली | तिसरी बाजू

 22. DTIngole says:

  लेख वाचायला तर घेतला पण शप्पथ सांगतो , वाचायच्या आधीच घाम आला.
  लेख वाचल्यावर शब्दनशब्द पटला. स्वतःची लाज वाटली की आपण तेव्हा किती मूर्ख होतो ते !
  उत्कृष्ट लेखाबद्दल धन्यवाद !

 23. vikas40gaon says:

  राजू सर, हा लेख ग्राहक हित मध्ये प्रसिद्ध झाला की नाही शेवटी? नसणारच बहुदा. तुमच्या कार्यालयावर दगड फेक वगैरे? खळ्ळ खट्याक?

 24. Shrikrishna Balwant Sathe says:

  “Anatomy of Thackrey family ” हा लेख वाचला. व्यक्तिपूजा हा आपल्या सामाजिक जीवनाला मिळालेला एक मोठा शाप आहे जो डोळसपणापासून माणसाला दूर नेतो. भारतात आणि प्रकर्षाने राजकारणात अशी असंख्य उदाहरणे पाहावयास मिळतील. लेख चांगलाच आहे, प्रबोधनात्मक आहे पण त्यामुळे परिस्थितीत कांही सुधारणा होइल असे वाटत नाही. मात्र अशा Eye Openers ची आज गरज आहे हे निर्विवाद!

 25. abhed says:

  Apratim! Your minute study of such politicians, putting in words without being bias, only the truth with no inhebitions, deserves great appreciation

 26. Rajendra says:

  खुपच बेधडक पण तेवढेच वास्तव मांडणारा हा लेख म्हणजे लेखकाच धाडस….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s