कौल:एक अद्भुत वेड…


कौल’ : एक अद्भुत वेड!

मराठीत अनेक चित्रपट येतात-जातात. काही चित्रपट मनावर ठसतात आणि काही विसरले जातात. ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे, मल्टीनॅशनल कॉर्पोरेटस् नी मराठी चित्रपटांच मार्केट  काबीज करायला सुरुवात केली. एकटे-दुकटे निर्माते आणि प्रयोगशील मराठी दिग्दर्शक विरळ होऊ लागले. त्यातही काही तग धरून ह्या “बहरलेल्या” प्लास्टिक च्या मराठी चित्रपटांच्या ताटव्या मध्ये आपलं प्रयोगशील, नैसर्गिक अस्तित्व टिकवून राहिलेले आहेत.

अश्या प्रयोगशील, नैसर्गिक, एकांड्या चित्रपटापैकी चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ हा एक चित्रपट. ज्याला १८ आंतरराष्ट्रीय पारीतोषकांसहित भारतातील सर्वोच्च सन्मान राष्ट्रपतीपदक ‘कोर्ट’ चित्रपटाला मिळाले. योग्य कलेचा योग्य सन्मान झाल्याची हि दुर्मिळ घटना. तरी ह्याला गालबोट म्हणून ‘कोर्ट’ ह्या चित्रपटाला लोकाश्रय मिळू शकला नाही.

ह्याच मालिकेतील ना राजाश्रय ना लोकाश्रय मिळालेला एक अद्भुत मराठी चित्रपट माझ्या पाहण्यात आला. तो म्हणजे आदिश केळुसकर दिग्दर्शित ‘कौल’.
‘कोर्ट’ आणि ‘कौल’ ह्यांचा बाज परस्परविरोधी आहे. ‘कोर्ट’ हा सामाजिक black humour ह्या सदरात मोडेल तर ‘कौल’ हा संपुर्णत: आत्मम्ग्नतेवर उभा आहे. “मी” हा त्याचा केंद्रबिंदू आहे आणि अस्तित्वाचा शोध आणि त्यातील हिंसेचं अस्तित्वगत असण या भोवती ‘कौल’ चित्रपट फिरतो.

आदिश केळुसकर ने अस्तित्वाच्या अर्थाला हात घालण्याचं धाडस चित्रपटाच्या भाषेतून केलं. हि एक धाडसी गोष्ट आहे. ‘कौल’ चित्रपटाचं लेखन हे मराठीत बनलेल्या अगोदरच्या कुठच्याही चित्रपटाच्या किंवा फैमेलीभाषेच्या प्रभावाखाली मोडत नाही. तो एका स्वतंत्र भाषेचा शोध घेतो. चित्रपटाचा आरंभ, मध्य आणि अंत हा त्याच क्रमाने यायला हवा हा समज मोडून काढतो आणि त्याच वेळेला तुम्हाला आरंभ, मध्य आणि अंताचा आनंदही मिळवून देतो.

“नॉर्मल” मनाची व्याख्या जगामध्ये कुठेही नाही. कोण ‘वेडा’ आणि कोण ‘शहाणा’ हे कोणत्याही प्रकारच्या शास्त्राने आजही पूर्णत: सिद्ध करता येत नाही. अबोध हिंसा हि मानवाच्या मनाशी अस्तित्वगत आहे, आणि ती अटळ आहे. बऱ्याचदा स्वत:चा आणि अस्तित्वाचा शोध घेताना, हिंसा अपरिहार्य होऊन बसते! ‘कौल’ चित्रपट नेमका ह्यावरच भाष्य करतो. निसर्ग, माणूस, ईश्वर ह्या संकल्पन, अस्तित्वाचा शोध ह्या सर्व गोष्टी ननैतिक आणि तटस्थ आहेत हि गोष्ट ज्याच्या डोक्यात एखाद्या भ्रमाप्रमाणे घुसते तो चित्रपटाचा नायक आपल्या संपूर्ण स्वतंत्र अस्तित्वाचा शोध घेऊ लागतो एखाद्या भ्रमिष्ठासारखा. दुसऱ्या पातळीवर त्याचं निम्नमध्यवर्गीय जीवन, शिक्षकी पेशा, जिच्यावर त्याचं मनोमन प्रेम आहे अशी त्याची आठ महिन्याची गरोदर बायको आणि वर्तमानपत्राचे मथळे हेच जग आणि अस्तित्व आहे असे  मिडीयॉकर सहकारी शिक्षक, ह्या दोन्ही पातळ्या संभाळणे आणि त्याच वेळी अस्तित्वाच्या शोधाची जादू नायकाचा पाठलाग करत आहे आणि तो  त्याचा शोध घेत आहे असा तोल राखणे नायकाला अश्या परिस्थितीतुन जावे लागते. वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून, मौनातून, क्वचित चित्रपटातील संवादातून आणि संपूर्ण वेळ कॅमेरॅच्या भाषेतून नायकाचा दुहेरी जीवघेणा प्रवास आदिश केळुसकर अक्षरश: आपल्या अंगावर आणतो.
आपल्याला आलेल्या अस्तित्वाच्या जादुच्या अनुभूतीला डिकोड करण्याचे नायकाचे सर्व प्रयत्न जवळपास व्यर्थ जातात. वास्तविक जग, त्यातील सुमारपणा, उपजिविकेसाठी करावी लागलेली वणवण, सुमारपणातील भ्रष्टपणा आणि त्याचवेळी दुसरीकडे अस्तित्वाला हात घालण्याचा डिकोडिंगचा प्रयत्न ह्यात नायकाची कुचबंणा होत राहते. ती प्रेक्षकांच्या अंगावर येते.

‘कौल’ चित्रपटच लेखन आणि दिग्दर्शन करताना आदिश केळुसकरने एक अशक्य गोष्ट साध्य केलेली आहे, ती म्हणजे लेखन आणि चित्रपटाची भाषा यातील तोल… ज्यामुळे कोणताही सामान्य मनुष्य नायकाच्या जागी स्वत:ला पाहू शकतो. चित्रपट अवघड विषयाला हात घालूनही स्व-भाषेतून बनवता येतो हे आदिशने दाखवून दिले आहे.

शेवटाला ‘कौल’ हा चित्रपट इतका अंगावर येतो कि हेन्री जेम्स च एक वाक्य आठवतं, “आपण वेडे नाही अस प्रत्येक वेड्याला वाटत.” तो वेडा आपणच आहोत हे त्रासदायक सत्य सांगण्याची कला आदिश केळुसकरने पहिल्याच चित्रपटात प्राप्त केली हे आश्चर्यजनक प्रतिभेच लक्षण आहे.फक्त एडिटिंग टेबलवर कात्री जास्त चालली असती तर मला व्यक्तिश: आवडलं असतं. पण हे subjective आहे.

कौल चित्रपट पहाणाऱ्या प्रेक्षकांना, ‘madness is commom among you, the only problem is you have to de-learn yourself to enjoy your madness.’
हे थेट हृदयातच पोहचत.

मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या चित्रपटात असे प्रयोग करत नाहीत किंबहुना असे प्रयोगशील एकांडे लेखक आणि दिग्दर्शक चिरडून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतोच!

ह्याचं कारण, एक दर्जेदार शहाणा चित्रपट मग तो ‘कोर्ट’ असो, ‘कौल’ असो, काही शहाणे प्रेक्षक तयार करतो ज्यामुळे सिनेमा बनवणाऱ्या कॉर्पोरेट्सच्या “ईस्ट इंडिया कंपन्या” बाजारपेठेतले आपले ग्राहकांचे कळप गमावतात. हिंदी सिरीयल मध्ये एकता कपूर आणि गँग ने जो प्रतिगामी आचरटपणा सुरु केला तो ह्याच शहाण्या प्रेक्षकांना वेडे बनवून त्यांच्यावर लादला. आता मराठी टीव्हीवर तो कॉर्पोरेट्सनी आणला. चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये नेमकी तीच सुरुवात झाली आहे. ‘चित्रपट’ हाच मराठी माणसाने सुरु केलेला उद्योग आहे (दादासाहेब फाळके). मार्केटिंग,लॉबिंग, नेटवर्किंग हे पापड लोणच्यासारखं असलं पाहिजे. ते चित्रपटाचं मुख्य अंग नव्हे. चित्रपट म्हणजे टूथपेस्ट नाही! वेगवेगळ्या नावाने मार्केट मध्ये तेच ब्रांड वेगवेगळ्या नावाने उतरवायचे, लोकाना दात घासण्याचे इतर दूसरे पर्याय क्रुरपणे ठेवायचेच नाहीत!
जेणेकरून बाजारपेठ हा हक्काचा कळप बनेल. वास्तवात चित्रपट हि एक वेगळी भाषा आहे आणि त्याचं स्वत:च एक तत्त्वज्ञान आहे. लेनिन पासून ते हिटलर पर्यंत सर्व हुकुमशहासुद्धा ह्या माध्यमाच्या तत्त्वज्ञानाचं मर्म ओळखुन होते.

ते प्रतिभावंत लेखक दिग्दर्शकाला संसाधन उपलब्ध करून देत असत आणि एका मर्यादेपलिकडे त्यांच्या कामात सहसा हस्तक्षेप करत नसत! ह्याच कारण चित्रपटामध्ये अणुकुचिदार प्रतिभा येत राहणं आवश्यक आहे ज्यायोगे समाज, देश, भाषा, राज्य आणि संस्कृती प्रवाही राहतात आणि समाज Mediocre न बनता समाजातील “जिनियस” जिवंत राहतं.

‘बाहुबलीने’ थक्क करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जोरावर चारशे कोटी रुपये कमावले.

कुठच्या तरी चित्रपटातील गाणं ऐकून नाक्यावरची पिढी तंबाखूची गोळी लावून नाचते.
हि जीनियस  चित्रपटाची उदाहरणे नव्हेत!
कृपा करुन हे पसरवू नका!

‘कोर्ट’ आणि ‘कौल’ सारखे चित्रपट हे मराठी चित्रपटाच्या जीनियस चे कंदील आहेत. त्याची वात टिकवली पाहिजे, आणि कंदिलात रॉकेल भरत राहिले पाहिजे. ‘कोर्ट’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला अठरा अंतरराष्ट्रीय आणि सर्वोच्च चित्रपटाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. परंतु चित्रपटगृहात काही हजार लोकांनी तो पहिला. उच्चवर्णीय अभिजन आणि बहुसंख्य तरुण वर्गाने (ज्याने पाहायलाच हवा होता!) त्यांनी ‘कळत नाही’ असे सांगून त्याच्यावर अघोषित बहिष्कार टाकला. खरं तर प्रत्येकाची खरी कारणं वेगळीच होती!

आदिश केळुसकर च्या ‘कौल’ चित्रपटाची कथा अजूनच वेदनादायी आहे. चित्रपट तयार होऊन काही महिने झाले तरी तो चित्रपट अजूनही चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकलेला नाही. अभिजन विचारवंत जे सत्तापदांवर आहेत ते हा चित्रपट कुठच्या category मध्ये बसवावा ह्याचा अजूनही ‘खल’ करत आहेत!! त्यामुळे तो अजूनही महोत्सवामध्येही फारसा दिसत नाही.

‘कौल’ चित्रपट हा एक सुन्न करणारा अनुभव असला तरी त्याच्या लेखक–दिग्दर्शकाला अश्या प्रकारे सुन्न करणारा असू नये असं मला वाटतं!!

आपल्या सारख्या सर्व भग्न माणसांची चरित्रकथा नि दास्तान थेट काळजात घुसणारी ‘कौल’ मध्ये आदिश केळुसकरने मांडलेली आहे. चित्रपटाचे लोकेशन्स, पार्श्वसंगीत आणि लय पाहणाऱ्याला आतून (चांगल्या कारणाने) अस्वस्थ करते. असे चित्रपट आणि त्याचे लेखक, दिग्दर्शक निर्माण झाले नाहीत तर भाषा पोरकी होते! मराठी समाजाचे प्रयत्न भाषा पोरकी करून उथळ मनोरंजनाची तंबाखू खाण्याकडे आहे. अश्या प्रयोगांना टिकवून वाढवणे हे कोणाच्या हातात आहे हे न लिहिलेले चांगले! कारण त्यावर स्वतंत्र लेख लिहावा लागेल!

‘कौल’ चित्रपट पाहून झाल्यावर आदिशला मी माझ्याकडे असलेल्या Leni Riefenstahl या जर्मन चित्रपट दिग्दर्शिकेच्या चरित्राची एकमेव कॉपी त्याला दिली.Leni हि माझी काही सर्वात आवडती दिग्दर्शिका नव्हे. पण ती एक स्त्री दिग्दर्शिका होती जिने कही अचाट प्रयोग केले होते. तिच्या काळात ती अचाट होती. आदिशला मी जे न बोलता सांगितलं तेच त्या पुस्तकातून पोचलं असेलच असं नव्हे.

परंतु चित्रपटाच्या तत्वज्ञानाच्याबाबतीतही असच होत नाही काय?
ज्याला जे समजतं तेच त्याला ते मिळतं. ‘कौल’ चित्रपट पाहताना मला madness मिळाला.
आदिशला कदाचित शहाणपण द्यायचा होता असेल! कुणास ठाऊक?

-राजू परुळेकर

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s