महाराष्ट्राचा हिमालय: आचार्य प्र.के.अत्रे


महाराष्ट्राचा हिमालय : आचार्य प्र.के.अत्रे
👍
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘मराठा’ हे भूमिकापत्र संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी काढले नसते, तर सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्राचा लढा कितीही प्रयत्न झाले, तरी यशस्वी झाला नसता. आचार्य अत्रे यांच्यासोबत भाई माधवराव बागल, शाहीर अमरशेख, क्रांतिसिंह नाना पाटील, कॉम्रेड डांगे ही व अशी सर्वपक्षीय दिग्गजांची फळीच उभी होती. त्यांच्यात मतभेदही व्हायचे. मग निर्णय काय घ्यावा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ठरवायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे खूप जवळचे संबंध होते. गाडगेमहाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर या सर्वांविषयी अत्रे यांना प्रचंड आदर होता. आचार्य अत्रे यांनी बनवलेल्या महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाला राष्ट्रपतींचे रजत पदक प्राप्त झाले होते. त्याआधी त्यांनी ‘श्यामची आई’ चित्रपट निर्माण केला होता, जो भारतातील राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक मिळवणारा पहिला चित्रपट होता. फुले यांच्यावरील चित्रपटातील पहिल्या दृश्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. पण तरीही मतभेदांच्या वेळी डॉ. आंबेडकर योग्य तीच बाजू घेत. एस. एम. जोशी यांच्या आत्मचरित्रात एक प्रसंग  आहे – एस. एम. आणि अत्रे यांच्यात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात प्रांतिक मंत्रिमंडळात सामील होण्यासंबंधी काहीतरी मतभेद झाले. दोघेही निवाडा करण्यासाठी डॉ. आंबेडकरांकडे गेले. एस. एम. यांचे म्हणणे सत्तेत जाऊ नये असे होते, तर अत्रे यांचे म्हणणे सत्तेत राहून लढाई करणे असे होते. अत्रे आणि बाबासाहेब एकमेकांच्या प्रेमातले. तरीही बाबासाहेबांनी एस. एम. यांच्या बाजूने मत दिले. बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे झाले, तर जे एस. एम. जोशी यांनी ‘मी एस. एम.’ या पुस्तकात नमूद केले आहे. बाबासाहेब म्हणाले, “जर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई हवी असेल, तर सत्तेला आपण काठीनेही स्पर्श करता कामा नये.” बाबासाहेब म्हणाल्यावर अत्र्यांनी त्यांचा निवाडा तात्काळ मान्य केला. नंतर अत्रे एस. एम. यांना म्हणाले जे एस. एम. यांनी नमूद करून ठेवले आहे, “बाबासाहेबांनी म्हणजे बिनपाण्यानेच केली हो आमची.”
बाबासाहेब आणि अत्रे यांचे प्रेम, जिव्हाळा, आदर आणि वात्सल्य बाबासाहेबांच्या अखेरपर्यंत टिकले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्यावरील धनंजय कीर यांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये आढळून येते (पृष्ठ ५३१) –

“१६ डिसेंबर १९५६ या दिवशी त्यांना (बाबासाहेबांना) आपल्या मुंबईतील अनुयायांना दीक्षा द्यायचे कार्य उरकायचे होते. त्यांनंतर त्यांनी आपल्या ग्रंथालयातून मार्क्सचा ‘दास कॅपिटॉल’ हा ग्रंथ घेऊन ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण लिहून टंकलेखनासाठी दिले. मंगळवार ४ डिसेंबर या दिवशी आंबेडकर राज्यसभेत काही वेळ उपस्थित होते. राज्यसभेच्या दिवाणखान्यात काही सभासदांशी त्यांनी औपचारिक चर्चा केली. आंबेडकरांची ही राज्सभेला अखेरची भेट ठरेल, असे कोणालाही वाटले नसेल. सायंकाळी त्यांनी दोन महत्त्वाची पत्रे लिहून घेण्यास सांगितले. एक आचार्य प्र. के. अत्रे नि दुसरे श्री. म. जोशी यांना. हे दोघे कॉंग्रेसच्या विरोधी पक्षातील प्रमुख महाराष्ट्रीय नेते होते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आघाडीवरचे नेते होते. ह्या दोघांनी आंबेडकर काढत असलेल्या रिपब्लिकन पक्षाला येऊन मिळावे, अशी त्यांना आंबेडकरांनी त्या पत्रात विनंती केली होती.”

दुर्दैवाने त्यानंतर डॉ. बाबासाहेब हयात राहिले नाहीत. त्यांच्या कल्पनेतला रिपब्लिकन पक्ष स्थापन होऊ शकला नाही. अत्रेंनी आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरील अग्रलेखांची जी मालिका लिहिली ती वाचताना आजही रडू येते.
प्र. के. अत्रे सक्रीय राजकारणात होते. त्यांनी पक्ष बदलले, भूमिका बदलल्या, ते कायम न-नैतिक राहिले. नैतिक किंवा अनैतिक झाले नाहीत.  सावरकरांविरुद्ध बोलल्यामुळे त्यांना पुण्यामध्ये रक्ताची आंघोळ घातली जाईल एवढा मार पडला, पण तेच सावरकर गेल्यावर अत्रेंनी जे अग्रलेख लिहिले ते सावरकरांवरील अक्षय मृत्यूलेख आहेत. अत्रे काँग्रेसपासून कम्युनिस्टांपर्यंत आणि समाजवाद्यांपासून जनसंघापर्यंत सर्वांशी मैत्री ठेवून होते आणि त्यांच्याशी त्यांनी टोकाचे वादही घातले. अत्रे हे खरेतर शिक्षणतज्ज्ञ. मराठी भाषाविषयक त्यांची शैक्षणिक पुस्तकं आजही वाचली, तर कुणाचीही मराठी भाषा सुधरू शकते. ते बीए, बीटी, टीडी (लंडन) हे शिक्षण पूर्ण करून मराठी भाषेचे शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करू लागले.  त्यांच्या ‘नवयुग वाचनमाले’ची आजही मराठीतील कोणतंही पुस्तक बरोबरी करू शकणार नाही.  मराठी भाषा, मराठी माणूस यांच्यासाठी त्यांनी राजकीय, सामाजिक लढा एकहाती पेलला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. ‘मोरूची मावशी’, ‘तो मी नव्हेच’, ‘लग्नाची बेडी’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘भ्रमाचा भोपळा’ व इतर अनेक नाटके त्यांनी लिहिली. मास्टर विनायक आणि पु. ल. देशपांडे यांनी भूमिका केलेला व अत्रेंनी लिहिलेला ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट कोण विसरेल? समकालीन साहित्यिकांबरोबरचे त्यांचे टोकाचे वाद प्रचंड गाजले. ना. सी. फडके, पु. भा. भावे ही त्याची काही उदाहरणे. परंतु नंतर ज्यांच्याशी वाद घातला, टोकाचे शत्रूत्व केले त्यांच्यांशी हात मिळवणे, निर्विषपणे मैत्री करणे हा त्यांचा स्वभाव होता आणि हा स्वभाव त्यांनी आयुष्यभर जपला.

संयुक्त महराष्ट्र आंदोलनाचे प्र. के. अत्रे हे एक प्रमुख नेते होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी परमोच्च्च बिंदूवर नेलेला हा सर्वोत्कृष्ट राजकीय लढा होता. त्यांच्या अमोघ आणि विनोदी वक्तृत्वाने शिवाजी पार्कवर त्यांनी जवाहरलाल नेहरूंपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत सर्वांना गारद केले. मोरारजी देसाई यांची भिती तर त्यांनी नष्ट केलीच, पण त्यांची एवढी भीषण टवाळी केली की, मोरारजींच्या खूनशीपणाला महाराष्ट्रात आणि मराठी मनात काही जागाच उरली नाही. सेनापती बापट हे त्यांचे अजून एक श्रद्धास्थान. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अत्रेंनी उभे केलेले ‘मराठा’ हे वृत्तपत्र, अत्रेंचे अमोघ वक्तृत्व हे वजा केल्यास संयुक्त महाराष्ट्र झाला नसता आणि मुंबई महाराष्ट्रात आली नसती, हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारणार नाही.

शिवाजी पार्कला ‘शिवतीर्थ’ हे संबोधन त्यांनीच दिले. बऱ्याच जणांचा असा समज आहे की, बाळासाहेब ठाकरे यांनी हे नाव दिलेले आहे. हा समज पूर्णत: खोटा आणि निराधार आहे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र समितीचा भाग होते. बाबूराव अत्रेंबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. मुंबई महाराष्ट्रात आल्यावर आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर काही वर्षांनी ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू झाले आणि त्यानंतर काही वर्षांनी शिवसेनेची स्थापना झाली.

एक व्यंगचित्रकार आणि एक प्रत्यक्षदर्शी याव्यतिरिक्त संयुक्त महाराष्ट्र होण्यात आणि मुंबई महाराष्ट्रात आणण्यात बाळासाहेब ठाकरे यांचे तसे काही योगदान नाही. ही वस्तुस्थिती आहे, जशी शिवाजी पार्कला ‘शिवतीर्थ’ हे नाव देण्यात. एकदा शिवसेनेची स्थापना झाल्यावर आणि हाती तयार झुंडीचे बळ आल्यावर ‘मार्मिक’मधून बाळ ठाकरे यांनी आचार्य अत्रे यांना ‘वरळीचे डुक्कर’ असे संबोधले, त्यांची सभा उधळली! अत्रे तोवर आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर पोचले होते…

लवकरच (१३ जून १९६९मध्ये) अत्रेंचा मृत्यू झाला, तेव्हा हा वाद एका महानायकाच्या मृत्यूनेच संपवला. अत्रेंनी आयुष्यात केलेल्या चुका स्वत:च लिहून मान्य केल्या आहेत. ते पराकोटीच्या टोकाच्या भूमिका घेत आणि त्या १८० अंशांमध्ये बदलतही असत. ते टोकदार आणि ठाम भूमिका घेऊन तडीला नेत असत. आयुष्यात अनेक चढउतार त्यामुळे त्यांना पाहावे लागले. त्यांनी कधीच लोकानुनय केला नाही. लोकांना आवडेल म्हणून नैतिक वागणे वा लोकांना आवडणार नाही म्हणून अनैतिकतेचा पुरस्कार करणे, हे त्यांनी कधीच केले नाही. ते खऱ्या अर्थाने एखाद्या बालकासारखे ‘न-नैतिक’ होते व आयुष्यभर तसेच राहिले.

महान नाटककार आणि लेखक विजय तेंडुलकरांनी अत्रेंच्या वृत्तपत्रात नोकरी केली होती. बाबूराव अत्रेंना जवळून पाहण्याची त्यांना या काळात संधी मिळाली होती. पुढे तेंडुलकरांनी आपण अनुभवलेल्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ बाबूराव अत्रेंवर ‘प्रचंड’ नावाचा एक अनुभूतिपूर्ण लेख लिहिला. ज्याला अत्रे समजून घ्यायचे असतील, त्या व्यासंगी माणसाने हा लेख जरुर वाचलाच पाहिजे. आचार्य अत्रे कधीही बरोबर किंवा चूक नव्हते. अत्रे हे एकमेवद्वितीय होते. मराठी चित्रपटाला पहिला राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळवून देणारा चित्रपट बनवणारा माणूस, फुलेंच्या जीवनावर चित्रपट बनवून राष्ट्रपती रजत पदक मिळवून देणारा माणूस, मुंबई महाराष्ट्राला मिळवून देणारा माणूस, टोकाचे प्रेम आणि टोकाचा द्वेष ज्याने झेलला तो माणूस महाराष्ट्राचा हिमालय होता. असं एखादंच क्षेत्र असेल, जे अत्रेंनी गाजवायचं ठेवलं असेल. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रेम आणि ऋण या दोन्हींची उंची इतर कुणालाच गाठता येणार नाही एवढं आहे.

संयुक्त महाराष्ट्रात मुंबई राजधानी झाली, अनेक शासक आले-गेले, अनेकांची स्मारके उभी राहिली, अत्रेंना ‘वरळीचा डुक्कर’ म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागेचा शोध सुरू आहे. मात्र ज्याने आपल्या हजरजबाबी, उपरोधिक वक्रोक्ती शैलीने आणि विनोदाने शेकडो तास भाषणं करून मराठी माणसाला जागा केला त्यांचे मुंबईत स्मारक तर सोडाच, स्मारकाचा विषयही निघत नाही.

मी भाग्यवान आहे, मला आयुष्यात दोनदा ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार मिळाला. त्यांचे लेखन, त्यांची भाषणं (मुद्रित व रेकॉर्डेड), त्यांचे सिनेमे, त्यांची नाटकं, त्यांनी केलेले वाद, त्यांनी लिहिलेले मृत्यूलेख, ठाम भूमिका घेतल्यामुळे रक्तबंबाळ होईस्तोवर त्यांनी खाल्लेला मार, संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी त्यांनी भोगलेला तुरुंगवास आणि मृत्यूअगोदर स्वत:ला ‘वरळीचा डुक्कर’ अशी पदवी देणाऱ्यांना मुंबईचे ऐश्वर्य देऊन अनंतात विलीन होणारा हा अवलिया माझ्या मनामध्ये एखाद्या स्मारकासारखा उत्तुंगपणे उभा आहे, तो त्याने घेतलेल्या बोटचेप्या, लोकानुनयी भूमिकेमुळे नव्हे, तर त्याने निर्माण केलेल्या प्रतिसृष्टीचा दिवा आणि पणती तो काही केल्या निखळू देत नाही म्हणून.
आचार्य अत्रे कधीही मुंबईतून जाऊन परदेशात स्थायिक झालेल्या आणि मुंबईत परदेशी माणसासारख्या राहणाऱ्या उत्सवी मराठी माणसाचे ‘लाडकं व्यक्तिमत्त्व’ होऊ शकले नाहीत, ही त्यांची अजिबात ढोंगी नसल्याची अखेरची पावती होती!

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ बाबूराव अत्रे यांच्या स्मृतिदिनी तुम्हाला या माझ्यासारख्या ऋणी माणसाचे कायमचं प्रेम आणि प्रणाम.

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

13 Responses to महाराष्ट्राचा हिमालय: आचार्य प्र.के.अत्रे

 1. S.V.Deshpande says:

  Khup Chaan Lekh

 2. krushna gawade says:

  अप्रतिम लेख सर

 3. आनंद says:

  खरोखरच वाचनीय; नेहमी सारखाच!!!

 4. Ranjit Rohidas Borude says:

  खूप माहितीपूर्ण लेख, तुम्ही मला त्यांनी बाबासाहेब आणि सावरकर यांचावर लिहलेल्या लेखांचा संग्रह देऊ शकता का (links kinva pdf)? मी आत्ता जपान ला असल्यामुळे पुस्तक स्वरुपात खरेदी करू शकत नाही.

  I am sorry for it but jidnyasa ahe vachnyachi.

 5. रविंद्र शिंदे says:

  खुप छान लेख सर, पण एक खरं की सत्य सगळ्यांना पचत नाही.

 6. Sushil says:

  apratim likhaan aahe saheb aaple..Manala bhavle Atre…Mala pan बाबासाहेब आणि सावरकर यांचावर लिहलेल्या लेखांचा संग्रह vachayachi iccha aahe..Aabhari aahe aapla

 7. Parth Dilip Gavande says:

  नमस्कार,
  अप्रतिम लेख,विजय तेंडुलकर सरानी आचार्य अत्रे यांच्यावर लिहिलेला “प्रचंड ” हा लेख वाचण्याची इच्छा आहे. तर कृपया हा लेख कुठे वाचावयास मिळेल,हे कळवावे.
  धन्यवाद.

 8. DHIRAJ SANDIP POKHARNA says:

  खूपच छान लेख…!

 9. राजेश जुवारे says:

  दै. मराठा मध्ये आचार्य अत्रे यांचं
  6 डिसेंबर 1956. ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहलेला अग्रलेख कुठं मिळेल( भाषणाची ओरिजिनल काॅपी कुठे मिळेल)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s