“ग्रेस, सेंट पॅट्रिक चर्च, इमॅजिन आणि न्यूयॉर्क”


vedacha-bharat

मराठीतील महाकवी ग्रेस यांची माझी ओळख आमच्या एका कॉमन मित्राने ग्रेस यांच्या एका मैत्रिणीच्या चित्र स्टुडिओमध्ये करून दिली. त्या चित्रकर्तीच्या अनेक सुंदर पेंटिग्जमध्ये बोलत बसलेले ग्रेस हे मला शॉपेनच्या संगीतासारखे वाटत असत.अर्थात, मी हे त्यांना कधीच सांगितलं नाही. मुळात मी ग्रेस यांची एक मोठी मुलाखत घ्यावी,अशी माझी इच्छा होती. ग्रेस यांनी माझ्या पहिल्या भेटीनंतर मला सातत्याने फोनवर बोलून,मेसेज पाठवून आमची ओळख एका स्नेहबंध मैत्रीमध्ये रुपांतरित केली. सुरुवातीला मी फार संकोची होतो आणि लाजायचोही. कारण, ग्रेस हे फार मनस्वी असल्यामुळे कसेही आणि काहीही बोलू शकतात,असं मी अनेकांकडून ऐकले होते. त्यानंतर ते हयात असताना माझ्या त्यांच्या तीन चार प्रदीर्घ भेटी झाल्या. फोनवर बोलणे तर अनेकदा झाले. माझ्या बाजूने फोन किंवा मेसेज झाला नाही,तरीसुद्धा साधारणत: दिवसाआड एक किंवा दोनदा ‘रेव्हरंड परुळेकर’ असं मला संबोधून ते मला मेसेज पाठवत. ते सगळे एसएमएस होते. त्या काळात सोशल मीडिया किंवा व्हॉट्स अॅप प्रचलित नव्हतं आणि असतं तरी ग्रेस त्यावर आले असते असं मला वाटत नाही. त्यातील काही एसएमएस आजही माझ्याकडे आहेत, तर काही काळाच्या पडद्याआड गेले. केवळ त्यासाठी नोकियाचा तो जुना फोन अजूनही मी जपून ठेवला आहे.ग्रेस यांची मुलाखत मी अनेकदा तारीख वेळ ठरवूनही घेऊ शकलो नाही, याची अनेक दुर्देवी कारणे आहेत. पण त्यांना मला मुलाखत द्यायची होती आणि मला त्यांची मुलाखत घ्यायची होती, याबाबत आमच्या दोघांचंही दुमत नव्हतं. महाकवी ग्रेस कित्येकदा बोलताना पूर्णविराम घ्यायचे नाहीत.मुलाखतीत ब्रेक घेतला जो अपरिहार्य होता, तर ते भडकतील अशी मला उगाचच भिती होती. वास्तविक ते माझ्यावर कधी भडकलेच नाहीत किंवा त्यांच्याबद्दल ते विक्षिप्त असल्याच्या कंड्या पसरवण्यात आलेल्या आहेत, त्यातल्या एकाचाही मला कधी अनुभव आलेला नाही. मी प्रत्येक शेड्यूल ठरवल्यावर ग्रेस यांची मनातल्या मनात मुलाखत घ्यायचो, पण ती ऐनवेळेला रद्द व्हायची. ते मी त्यांना सांगायचो नाही कारण,फार संकोच वाटायचा आणि वाईटही वाटायचे. ते मला ‘रेव्हरंड’ असं का संबोधतात,असं मला अनेकदा त्यांना विचारायचं होतं, पण तेही राहून गेलं. ख्रिस्ताच्या आयुष्य आणि बलिदानाविषयी त्यांना अमूर्त असं आकर्षण होतं. ते त्यांच्या लेखनात बीटविन द लाइन्स दिसतं.

grace

ग्रेस यांची ओळख होण्याच्या काही वर्षं आधी मी नागपूरमध्येच फेलोशिपच्या कामानिमित्त राहत होतो. मी ज्या घरात राहत होतो, त्या घरातून समोरच्या एका घराची खिडकी थेट दिसत असे. ग्रेस नागपूरचे.त्या समोरच्या घरात त्यांच्या कॉलेजमधल्या सहअध्यापिका राहत असत. कधी कधी ग्रेस तिथे कॉफी प्यायला यायचे, थेट त्यांचं दर्शन व्हायचं. अर्थात,त्यांच्या प्रत्यक्ष भेटीएवढं थेट जवळून नाही, पण ते आले की त्यांच्याकडे पाहताना चंद्रमाधवीचा प्रदेश उगवला असं वाटायचं. नंतर त्यांची ओळख झाल्यावर ते माझ्याशी इतके मोकळे होत गेले की, त्यांच्या आयुष्यातल्या उलथापालथी,कलावंत म्हणून जगताना होणारे मूड स्विंग्ज, त्यांचा मुलगा राघवचं आयुष्य याबद्दल ते मोकळेपणाने बोलायचे, मेसेज करायचे. संबोधन मात्र ‘रेव्हरंड परुळेकर’ असंच करायचे. ग्रेस यांची मुलाखत घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला आणि मुलाखत देण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनीही केला. पण तांत्रिक कारणांमुळे आणि काही व्यक्तींमुळे ते जमून आलं नाही,नाहीतर ती एक अजरामर मुलाखत ठरली असती. ग्रेस गेले तेव्हा मी या गोष्टीसाठी मनातल्या मनात मातम केलं. ग्रेस यांचं’रेव्हरंड परुळेकर’ मनात कायम ठसठसत राहिलं. ते गेल्यानंतर मला कुणीही या संबोधनाने हाक मारली नाही किंवा मेसेजही केला नाही. ते स्वाभाविकच होतं,कारण ग्रेस ग्रेस होते. ग्रेस इंग्रजी मेसेज इंग्रजांहून सुंदर लिहायचे.त्यांचा मुलगा राघव याच्याशीही मी फोनवर बोलायचो. ग्रेस यांच्या साहित्याचा दिवाना असणं, ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही, पण ते माणूस म्हणून फार महान होते. मात्र कलावंताला ज्या मूड स्विंग्जमधून जावंच लागतं,त्याचा दोष मूर्ख लोकांनी कवी ग्रेस यांना लावला, हे खास कलाकाराविषयी आपल्या समाजाचं अज्ञान आहे!

एक-दीड वर्षापूर्वी मी न्यूयॉर्कला गेलो. न्यूयॉर्कमध्ये देखणं वास्तुशिल्प म्हणून उभ्या असलेल्या सेंट पॅट्रिक चर्चमध्ये सौंदर्य आणि कलासक्तता यांची आशिकी म्हणून मी मुद्दाम गेलो.आतमध्ये अनेक लोक प्रार्थना करत होते, काही पाद्री घोळदार झगा घालून प्रेअरबाबत लोकांना मार्गदर्शन करत होते. या भव्य आणि कलावैभवाने नटलेल्या वास्तुत प्रचंड शांतता नांदत होती. जे काही बोलणं होतं, ते खुसपुसल्यासारखं. बाकी टाचणी पडली तरी आवाज येईल, एवढी शांतता. शिल्प आणि कलाकुसर केलेल्या काचेचा प्रत्येक भाग कलावैभवाने नटलेला होता.जीसस ख्राईस्ट आणि सेंट पॅट्रिक यांच्या जीवनातले प्रसंग चितारले होते, त्या देखण्या काचा आणि भव्य वास्तु पाहताना डोळे अक्षरश: गारद होत होते. याहून मोठ्या आणि वैभवशाली कलाकृती मी जगभर पाहिलेल्या आहेत, पण प्रत्येकाचं महत्त्व वेगळं.

saintpatrick nyc.jpg

या वास्तुत मी उभा असताना मला अचानक ग्रेस यांची आठवण झाली. ‘रेव्हरंड परुळेकर’ या त्यांच्या संबोधनाचीसुद्धा. तिथे माझ्यासारखे अनेक लोक उभे होते. जगातल्या बहुतेक सर्व वंशाचे. माझ्या मनात अचानक तिथेच प्रश्न उभा राहिला की, ग्रेस मला ‘रेव्हरंड परुळेकर’ का म्हणत असावे बरं? त्याच वेळी अचानक एक पांढरे कपडे घातलेला बिशप माझ्याकडे चालत आला, त्याने स्मितहास्य केलं आणि जिसस ख्राईस्टचं चित्र असलेला चांदीचा क्रॉस त्याच्या चेनसकट माझ्या हातात दिला. इतर कुणाशीही त्याने तसं काही केलं नाही. खांद्यावर दोनदा थोपटून आणि माय बॉय म्हणून तो तिथून निघून गेला.चेनसकट तो क्रॉस मी खिशात ठेवला. सेंट पॅट्रिक चर्च पाहून झाल्यावर मी तिथून बाहेर पडलो आणि बस पकडून थेट बीटल्सच्या जॉन लेननला जिथे गोळी घालून मारण्यात आलं त्याच्या जवळच असलेल्या,त्याच्या पत्नीने बनवलेल्या स्ट्रॉबेरी गार्डन आणि तिथे जवळच असलेल्या इमॅजिन स्क्वेअरमध्ये मी गेलो. स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये फिरलो आणि इमॅजिन स्क्वेअरमध्ये एक लोकल बँड गाणं वाजवत होते,तिथे रस्त्यावर फतकल मारून बसलो.

imagine-square

john-lennon

जॉन लेनन हा माझा अत्यंत आवडता गायक आणि इमॅजिन हे माझं अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक. त्या गाण्यामधील ‘You may say I am a dreamer But I am not the only one’ ही ओळ तर माझी प्राणप्रिय. ती आठवत मी बसलो होतो. समोर जो बँड गाणं गात होता, तो जिप्सी बँड होता. तिथे मला ग्रेस आणि जॉन लेनन या दोघांचीही आठवण आली आणि ग्रेस यांच्या न झालेल्या मुलाखतीसाठी मी तिथे मनसोक्त रडलो. खिशातला क्रॉस काढला आणि सरळ गळ्यात घातला. ग्रेस यांची एक कविता आहे..

‘अशा लाघवी क्षणांना

माझ्या अहंतेचे टोक

शब्द फुटण्याच्या आधी

ऊर दुभंगते हाक’

इमॅजिन स्क्वेअरमधल्या तिन्हीसांजेच्या वेळी जिप्सी बँडने वाजवलेल्या गिटारच्या तारांनी त्या मंद होत जाणाऱ्या प्रकाशात मला ग्रेस यांची हीच कविता का आठवावी? त्या कवितेचं नाव मी इथे लिहिणार नाही. नावातच अर्थ सामावलेला आहे.

तो सेंट पॅट्रिक चर्चमध्ये भेट मिळालेला येशूचा क्रॉस आजही माझ्या गळ्यात आहे. जॉन लेनन,महाकवी ग्रेस यांच्याशी मी आजही एकटाच बोलत राहतो.पण इमॅजिन स्क्वेअरमध्ये घेतलेल्या मनसोक्त रडण्याचा आनंद मला परत मिळाला नाही.जॉन लेननला मी कधीही भेटलो नाही. ते अर्थातच शक्य नव्हतं!ग्रेस यांना मी खूपदा भेटलो. न भेटता फोनवर तर अपार बोललो. यातल्या कशानेही त्यांच्या माझ्या संबंधात असलेल्या एका धाग्याचा फरक पडत नाही. शेवटी सर्वच स्वत:चा क्रॉस स्वत: वाहतात. त्या यातनांच्या प्रवाहात जी निर्मिती होते, त्याचा आनंद निर्माता सोडून इतर सर्वांना मिळावा,अशी एक वैश्विक विराट योजना आहे.

माझेही मूड स्विंग्ज भयानक प्रकारचे होतात. अशा वेळी मी कसा वागतो, हे मला माहीत नाही. मग लोक कंड्या पिकवतात. त्या कंड्यांवर विश्वास ठेवून माणसं मला टाळू लागतात. अशा माणसांनी टाळण्याचाच आनंद अपार असतो, हे आता ‘रेव्हरंड परुळेकरांना’ कळले आहे!महाकवी ग्रेस बोलताना बऱ्याचदा पूर्णविराम का घेत नसत, त्याचं अचूक कारण मला कळलेलं आहे. त्यांना थांबवणं हे विरामांचं काम नव्हे, हे ते सांगत असत बहुदा.

आजही गळ्यातल्या क्रॉसकडे जेव्हा जेव्हा माझा हात जातो,तेव्हा मी असं काहीतरी लिहितो,वेड्यासारखं…

राजू परुळेकर

+91 9820124419
rajuparulekar1@gmail.com
http://www.rajuparulekar.us

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to  “ग्रेस, सेंट पॅट्रिक चर्च, इमॅजिन आणि न्यूयॉर्क”

  1. Yogesh Rajaram Aher says:

    Sir जसे ग्रेस तुमचे आवडते तसेच तुम्ही माझे आवडते आहात जे तुम्ही लिहले तसेच माझ्या मनात आहे तुमच्या बद्द्ल जेव्हां आपली पहिली भेट झाली असेच वाटले मला त्या नंतर massages करने ,फोन वरती बोलणे हे सगळे माझ्या साठी तुम्ही दिलेले life time award आहे असाच तुमचा सहवास लाभू दया , मी एक सामान्य माणूस आहे.मनात खूप आहे परंतु माझ्या कडे लेखनाची कला अवगत नसल्या मुळे जास्त काही लिहता येईना…..मी एक खेड्यात वढ्अलो सल्याने तिथल्या लोकांच्या संकुचित रुतीचा वीट आलाय भाऊबंदकीच्या चक्रात अडकले सगळे मराठी चा तर गंध च नही फक्त भाष्यां मराठी म्हणून मराठी त बोलतात

  2. Kalyani Deshpande says:

    💕💕💕

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s