‘​दिनेश कानजी यांचा त्रिपुराला ‘लाल सलाम’- राजू परुळेकर 


‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा माणिक सरकार’ या पुस्तकाचे लेखक दिनेश कानजी आणि सध्या त्रिपुरामध्ये भाजपचे प्रभारी असणारे सुनील देवधर हे दोघेही माझे चांगले मित्र आहेत. वैयक्तिक स्तरावर आमचे खूप चांगले संबंध आहेत. सुनीलबरोबर झालेल्या चर्चेचं निमित्त घडलं आणि दिनेश यांनी त्रिपुरातील राजकारणावर लेखन करण्याचं ठरवलं. येथील डाव्या आघाडीच्या सरकारचा आणि १९ वर्ष सत्तेत असणार्या माणिक सरकारचा पर्दा फाश करणारं वास्तववादी लेखन दिनेश यांनी आपल्या पुस्तकातून केलं आहे. 

१७ वर्ष पत्रकार म्हणून काम केलेल्या दिनेश यांनी आतापर्यंत विविध विषयांवर लेखन केलं आहे. शोध पत्रकारिता करून अनेक बातम्या त्यांनी ब्रेक केल्या आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक म्हणून त्यांनी आपली नवीन इनिंग्स सुरू केली असून पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आहे. थेट त्रिपुरात जाऊन कम्युनिस्टानाच लाल सलाम ठोकला आहे. याचं कारण म्हणजे पहिलं पुस्तक तेही राजकारणावर आणि त्यातही आपला काही संबंध नसणाऱ्या ईशान्य भारतात जाऊन, तिथे राहून, माहितीचं विश्लेषण करून तिथल्याच सरकारवर टीका करणारं. त्रिपुरातील भीषण वास्तव त्यांनी या पुस्तकाद्वारे  आम जनतेसमोर आणलं आहे. त्रिपुरातील कम्युनिस्टांचे दहशतीचे थैमान न भिता पुस्तकात लिहिणे, ही एकच गोष्ट लेखक म्हणून दिनेश यांना सलाम करावी अशी आहे. 

१९ वर्ष सत्तेत असणार्या माणिक सरकार यांची भ्रष्टचाराने बरबटलेल्या कारकीर्दीची पोलखोल करण्याचा प्रयत्न दिनेश यांनी या पुस्तकाद्वारे केला आहे. गेली अनेक वर्ष नरकयातना भोगणाऱ्या येथील जनतेबाबत सामान्य माणूस अनभिज्ञ आहे. माणिक सरकारचा आणि माकप पक्षाचा दुटप्पीपणा उघड करताना दिनेश यांनी जे वास्तववादी चित्रण केलं आहे, ती माहिती मिळवण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत आणि अभ्यास केला आहे, हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवतं. आपल्या लेखनाद्वारे दिनेश यांनी त्रिपुरातील हे विदारक आणि भीषण वास्तव वाचकांसमोर उघड केले असून यासाठी त्यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तरे, नाशनल क्राईम ब्यूरोचे अहवाल, नीती आयोगाची आकडेवारी, माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीचा आधार घेतला असल्याचे म्हटले आहे. पण तरीही हे संदर्भ संबंधित ठिकाणी पुस्तक वाचताना येण अत्यंत आवश्यक होत. माहितीचा स्रोत कोणता हे त्या- त्या टप्प्यावर वाचकांना कळले तर ते अधिक योग्य ठरते. कारण त्यामुळे वाचकांना अधिक माहिती त्या स्रोताद्वारे मिळवता येते अर्थात, ही उणीव लेखकाची नसून संपादकीय आहे. या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत ही उणीव दूर केली जाईल, अशी अपेक्षा.

देशाच्या एका कोपऱ्यात, ईशान्येला वसलेल्या त्रिपुरा राज्याला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. पण इथल्या जनतेला या निसर्गाचा आनंद लुटण्याच भान नाही. त्यांना चिंता लागून राहिली आहे ती अस्तित्वाची. जीव मुठीत घेऊन येथील लोकांना दर दिवशी आपली अस्तित्वाची लढाई लढावी लागते. गेल्या २४ वर्षांपासून इथे मार्क्सवादी कमुनिस्ट पक्षाची सत्ता आहे. पण या सरकारने ना जनतेसाठी काही केलं ना राज्याच्या विकासासाठी काम केलं. गरिबी, दहशतवाद, गुन्हेगारी आणि ड्रग्स यांचा विळखा येथील जनतेला बसलेला आहे. मुलभूत सोयीसुविधांचाच इथे अभाव आहे, तिथे विकासाची बातच सोडा.

मुलभूत सुविधांचा अभाव, निरक्षरता यांच्याबरोबरच गुन्हेगारीने या राज्याला विळखा घातला आहे. कालपर्यंत केंद्रात सत्तेत असणार्या कॉंग्रेस पक्षानेही सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी डाव्यांच्या या दडपशाहीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं कटू व जळजळीत वास्तव या पुस्तकातून समोर येतं तेव्हा सर्वच नेत्यांच्या राजकारणी वृत्तीची चीड येऊ लागते. गुंडगिरी आणि दहशतवादही इथे चांगलाच पोसला गेला आहे. त्रिपुरा रक्ताने कसा माखला आहे, हे स्पष्ट करताना लेखकाने येथील अनेक लोकांच्या हत्या, माकप नेत्यांना डोकेदुखी होऊ शकणार्या कार्यकर्त्यांच्या हत्या आदी वास्तव परिस्थितीचं विश्लेषण केलं आहे. त्रिपुरामध्ये शेती आणि शेतकरी हा संवेदनशील विषय बनला आहे. हवामान आणि जमीन अनुकूल असूनही येथील सरकार ना शेतकर्यांना कसलंही सहाय्य देत आहे, ना शेतीसाठी योजना जाहीर करत आहे.

लोकशाहीमध्ये दुसरी बाजूही महत्त्वाची असते हे सत्य ना डाव्यांना कळत, ना उजव्यांना याची जाणीव आहे. विरोधी पक्षात बसून सत्ताधीशांवर टीका करनार्याना सत्तेत आल्यावर मात्र अशी टीका सहन होत नाही नि म्हणूनच वास्तवापासून त्यांची फारकत झालेली पाहायला मिळते. गेली अनेक वर्ष सत्तेत असणार्या माकप सरकारने त्रिपुरा राज्याच्या विकासासाठी कोणतेच प्रयत्न केलेले दिसत नाही, उलट दिवसेंदिवस येथील परिस्थिती विदारक बनत असून इथल्या जनतेला अनेक प्रकारचा संघर्ष करावा लागत आहे. सत्तेत असणार्या माकप सरकारचा मुखवटा फाडून येथील जनता आणि एकंदर राज्याच्या विकासाकडे होणाऱ्या भयंकर दुर्लक्शावर लेखकाने जळजळीत टीका करून त्यांच्या राजकारणाची दुसरी बाजू सरकारपुढे आणि पर्यायाने जनतेसमोर आणण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे.

प्रचार तंत्राच्या जोरावर कम्युनिस्ट लोकांची मानसिकता भरकटवू शकतात, याचे भान हे पुस्तक वाचताना येते. पण याचा अर्थ केवळ कम्युनिस्टच  असे करतात, असे नव्हे याचेही भान वाचकांनी ठेवले पाहिजे. कारण माणिक सरकार यांच्या कारकीर्दीत ज्या गोष्टी घडल्या आहेत असे दिनेश यांनी जे लिहिले आहे, त्या गोष्टी इतर राज्यातील वेगवेगळ्या सरकारच्या काळातही घडलेल्या आहेत. यावरून माणिक सरकारही राजकारणाला अपवाद नाही, हे वास्तव पुस्तक वाचताना वाचकांच्या लक्षात येते, हेही तितकेच खरे.

अतिवाद मग तो डावा असो किवा उजवा लोकशाहीला हनिकारच असतो. मध्यममार्गी उदारमतवाद हा नेहमीच लोककल्याणकारी आणि लोकशाहीवादी असतो हे दिनेश यांनी या पुस्तकाद्वारे वाचकांना कळत नकळत जाणवून दिले आहे, हे या पुस्तकाचे मोठे यश म्हणावे लागेल.

त्रिपुराच्या आर्थिक प्रगतीबद्दल दिनेश म्हणतात, “राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. राज्यातील दीड लाख घरांमध्ये आजही विजेविना अंधार आहे. दहशतवादी कारवायांमुळे उध्वस्त झालेल्या ५९४ वस्त्या सरकारी अनास्थेमुळे उजाड पडल्या आहेत. काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांशी  माकप नेत्यांचे प्रेमाचे संबंध असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले आहेत. राज्यातील १०७७ लघु उद्योग बंद पडले आहेत. उद्योग उभारण्यासाठी सरकारने हजारो लोकांना जमिनीचे वाटप केले; परंतु या जमिनी एकतर वापराविना पडून आहेत किवा त्याचा दुरुपयोग होतो आहे. राज्यात रबरनिर्मिती होते; परंतु रबरप्रक्रिया उद्योगांचे अस्तित्व राज्यात नसल्यामुळे ९० टक्के रबर अन्य राज्यांत विकला जातो. बेरोजगारी वाढते आहे. तरुणांना रोजगार देण्यात सरकारला पूर्ण अपयश आले आहे.” या प्रकारची आर्थिक स्थिती आणि डबघाईला आलेली सरकारे भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश सोडून सर्वच राज्यांमध्ये आहे. जीडीपी बघायला गेल्यास ही राज्ये अख्ख्या देशाला पोसतात, असं म्हणायला गेल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. उत्तर पूर्वेकडच्या राज्यांबाबत नेमकं काय चालू आहे, हे आजवर कुणाला ठाऊक नव्हतं. सुनील देवधर यांच्या ‘माय होम इंडिया’ या संस्थेमुळे उत्तर पूर्वेची संस्कृती पहिल्यांदा भारताला नीट कळू लागली आणि आता दिनेश कानजी यांच्या पुस्तकामुळे प्रकाशात आली. 

चंद्रकला प्रकाशनने या प्रकारचे अतिशय सुंदर पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, फक्त पुढच्या आवृत्तीमध्ये विषयाच्या वर्गवारीनुसार संदर्भ सूची देऊन माहितीचे मूल स्रोत उघड केले आणि appendix

बनवला तर पुस्तकाच्या दर्जामध्ये अधिक वैचारिक वजन येईल असे वाटते. ही सूचना महत्त्वाची असली तरी प्रेमळपणे करावीशी वाटते.

पुस्तकामध्ये अखेरच्या भागात ज्या चार मुलाखती दिलेल्या आहेत, त्यापेकी सुनील देवधर जे ‘माय होम इंडिया’ ही संस्था चालवतात आणि ज्यांनी गेली अनेक वर्ष ईशान्य भारतात दधिची ऋषीन्प्रमाणे अक्षरशः तपस्या केलेली आहे त्यांच्या मुलाखतीचे प्रयोजन विषद न करताही कळते. मात्र इतर तीन मुलाखतींचे प्रयोजन लेखकाने इथे नमूद केलेले नाही. मूळ पुस्तकापासून या मुलाखती सुटल्यासारख्या वाटतात. या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत त्यांचं प्रयोजन विषद केले, तर त्या मुलाखातींचा वैचारिक सांधा जोडला जाईल, असे मत मला इथे नोंदवावेसे वाटते. 

दिनेश कानजी यांनी अशीच शोध पत्रकारिता करून अधिकाधिक पुस्तके लिहावीत आणि महाराष्ट्रातील जनतेला माहित नसलेली दुसरी बाजू उघडकीस आणावी, या माझ्या त्यांना शुभेच्छा. कारण लोकशाहीमध्ये शेवटी सत्ताधारी पक्षाच्या विरोधातले ‘Other Side is Important’  हे तत्व या पुस्तकामुळे पुन्हा एकदा चिरंतन झालेले आहे. देशातील प्रत्येक राज्यावर असे एकेक पुस्तक त्यांनी लिहावे जेणेकरून मराठी वाचकांना आपल्या देशातील राज्यांची एकंदरीत  समज येईल, याच माझ्या दिनेश यांना शुभेच्छा.

राजू परुळेकर

raju.parulekar@gmail.com

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s