||जातधर्म आणि ईसी टीव्ही||


||जातधर्म आणि ईसी टीव्ही||
मला आठवतं तेव्हापासून आमच्या घरात जात आणि धर्माबद्दल कुणीच काही बोलल्याचं मला आठवत नाही. माझी आई २००६ मध्ये गेली. ती खूप धार्मिक स्त्री होती.पण तिने किंवा माझ्या वडिलांनी मला आजतागायत स्वजात व स्वधर्म असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे बारावीपर्यंत मला माझी ‘लेखी’ जात व धर्म ठाऊक नव्हता! त्यामुळेच मी सर्वच जातीधर्मावर मुक्तपणे टीका करू शकलो. त्यात मला ना कधी अपराधगंड आला ना अस्मितेची वात पेटली!

आमच्या घरात दोन्हीकडच्या आजीआजोबांचा किंवा माझ्या आईवडिलांचा कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक तत्वज्ञानाशी संबंधच नव्हता. त्यामुळे अमुक एका जातीवर वा धर्मावर टीका करून कुणाचीतरी मनं दुखावतात वैगरे याचा मला पत्ता नव्हता. शिवाय या जातीची किंवा या धर्माची अस्मिता आपल्याला आतून ललकारते आहे अशीही भावना माझ्या मनात रुजू शकली नाही.

पुढे प्रचंड वाचन,जनसंपर्क आणि फिरण्यामुळे माझी अशी (भाषिक वगळता) अस्मिता माझ्यात रुजलीच नाही!
जगात मानवी जाती दोनच-स्त्री आणि पुरुष(नर आणि मादी नव्हे!).

मी शाळेत असताना आम्ही मुलंमुलं रस्त्यावर क्रिकेट खेळायचो. तिथे जे बोललं जायचं तेच परत बोलणे ही माझी फॅशन होती.आमच्या गल्लीत शिवसेनेचं प्रस्थ होतं. बाळासाहेब ठाकरेंची भाषणं सत्यनारायण पूजेलाही मंत्रासारखी लावलेली असत. त्या काळात EC कंपनीचे टीव्ही येत असत. त्याव्यतिरिक्त Crown हीच एक कंपनी होती. आमच्याकडे EC कंपनीचा टीव्ही होता. तो एकदा बिघडला.तो दुरुस्त करायला बाबांचे खान नावाचे अतिशय जवळचे मित्र आलेले होते(ते व त्यांचे कुटुंबीय आजही आमचे जवळचे स्नेही आहेत). मी खाली रस्त्यावर क्रिकेट खेळून आलो. टीव्ही दुरुस्त होताना समोर बसलो. बाबांनी खान काकांची ओळख करून दिली. मी खान ऐकल्यावर रस्त्यावरच्या ‘ठाकरी’ संस्कारानुसार चट्कन बोललो,”हे *डे आहेत!” त्यावेळी बाबांनी संणदिशी माझ्या कानशिलात लगावली आणि खान काकांच्या पाया पडायला लावलं. मला तेव्हा बराच काळ कळलच नाही की माझं काय चुकलं ते? बाबा तेव्हाही समजावून देणारे नव्हते आजही नाहीत. बऱ्याच दिवसांनी माझ्या नेमक्या चुकीचा उलगडा कुमार शिंगे या माझ्या मित्राने करून सांगितला.

मी कॉलेज मध्ये असताना मला एका विमुक्त जातीच्या मुलीचं प्रेमपत्र आलं. त्याचं कारण मी तिला आधी तसं पत्र पाठवलं हे होतं. माझ्याच चुकीने ते पत्र आईच्या हातात पडलं. तिने ते बाबांना दाखवलं. बाबांनी मला मजबूत भोसडलं. “तू पूर्ण शिकून पायावर उभा रहा नि मग या किंवा कुठच्याही मुलीशी काहीही कर” हे त्यांचं त्या भोसडपट्टीतलं शेवटचं वाक्य होतं. ते प्रकरण मग इतर ‘लिंक नसलेल्या गोष्टी’सारखं संपलं.ती मुलगी नंतर राजकारणात गेली. तिची घरची तशी पार्श्वभूमी होती. पण त्याला एक जातीय कोन होता हे आमच्या घरात कोणाला किंवा मलाही तेव्हा लक्षात आला नव्हता!

आज टीव्हीच्या बाबतीत आपण EC tv च्या खूप पुढे आलोत पण भोवतीचा समाज म्हणून थेट माध्ययुगीन झालोत असं जाणवतं.

त्याकाळात मला प्रेमपत्र पाठवणाऱ्या त्या मुलीचं कुणाची तरी जातीय अस्मिता जागवणारं लेखन फेसबूकवर अचानक माझ्या वाचनात आलं नि हे सारं आठवलं.

Advertisements

About Raju Parulekar

I am original, everything else is copied...
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s