बाबांचं नाव विजय तेंडुलकर!


तेंडुलकर नावाचं बोट

सचिन तेंडुलकर खूप प्रसिद्ध होईस्तोवर तेंडुलकरप्रेमींना त्यांचं नामकरण  हे खूप सोयीचं होतं. तेंडुलकरप्रेमी असा सरळ अर्थ त्यातून निघत असे. सचिन तेंडुलकरचा उदय झाल्यावर अर्थाची फोड करावी लागायला लागली. तशी प्रियासुद्धा अख्ख्या देशभर खूप लोकप्रिय होती. पण तेंडुलकरप्रेमी असं नामाभिधान धारण करणारं भक्तमंडळ तिच्याही नशिबी आलं नाही. तेंडुलकरांचे चाहते आणि विरोधक हे फॅनॅटिक चाहते आणि विरोधक आहेत.

गिरगावठाकूरद्वार परिसरात डॉ. तेंडुलकर नावाचे विजय तेंडुलकरांचे एक डॉक्टर मित्र राहत असत. तेंडुलकरांची आणि माझी भेट त्यांच्याच घरी झाली. दिनकर गांगलांनी ती भेट घडवून आणली होती. म्हणजे थोडक्यात, गांगलांनी त्यांच्या बाजूने मला तेंडुलकरांच्या पायावर घातलं होतं! आता त्या भेटीतली एक गोष्ट मला प्रकर्षाने आठवते. डॉ. तेंडुलकरांची छोटी नात तिथे खेळत होती. मी तिचं नाव  विचारलं तर डॉ. तेंडुलकरांनी तिचं नाव समानता असल्याचं सांगितलं. त्यावर मी समानता म्हणजे त्याचं स्पेलिंग करताना टीए असं करता की टीएचए असं करता असं विचारलं. तर ती छोटी चटकन टीएचए असं म्हणाली. त्या काळात समान्था फॉक्सची खूप क्रझ होती. या साऱ्या संभाषणाला त्याचा संदर्भ होता. या तिच्या उत्तरावर तेंडुलकर खुदकन हसले होते. वर वर पाहता निरस्थक वाटणारं हे सारं संभाषण मी इतक्या विस्तारानं लिहिलं आणि आजही ते इतक्या प्रकर्षाने माझ्या लक्षात राहिलं याचं कारण म्हणजे तेंडुलकरांना भेटण्याचं आणि त्यांच्याशी बोलण्याचं मला प्रचंड दडपण होतं. अनेक राजकीय नेते, उद्योगपती किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या अनेक कर्तृत्ववान माणसांना मी सतत भेटत आलोय. मला कधीच कुणाला भेटण्याअगोदर  दडपण आलेलं नाही. फक्त तेंडुलकरांचा अपवाद. तर तेंडुलकरांच्या या भेटीतलं ते दडपण समान्था नावाच्या त्या छोट्या मुलीनं घालवून टाकलं. त्या काळात मी दोन्ही खांद्यावर लोंबकळणारी काळ्या रंगाची हॅवरसॅक लावून देशभर भटकत असे. त्यातून मला पुढे मनदुखी निर्माण होईल तेव्हा मी ते टाळावं असं ेंडुलकरांनी आवर्जून त्या पहिल्या भेटीत सांगितलं होतं. 

तेंडुलकरांची प्रत्यक्ष ओळख व्हायच्या अगोदर त्यांचं सगळं लिखाण वाचून त्याची जवळजवळ पारायणं मी केलेली होती. त्यांच्या नाटकांतली काही मी बघितलेली होती. काही राहून गेली होती. तेंडुलकरांचं कोणतंच नाटक मी मूळ संचात बघितलेलं नव्हतं. कारण माझी समज तयार होईस्तोवर त्या मूळ संचांच उदयास्त होऊन गेलेला होता. तेंडुलकरांचं लेखन आणि त्यांचे इतर सामाजिक पैलू हे इतके चतुरस्त्र आणि वैविध्यपूर्ण आहेत की त्या काळात ज्याला थोडं कळतं त्याला तेंडुलकर नावाचं प्रचंड दडपण यायचं. मी काही अपवाद नव्हतो. सगळं जग बदलणं, सगळ्या समस्या, प्रेमात पडणं, प्रेमातून बाहेर पडणं, तत्त्वज्ञानातला रोमँटिकपणाला तत्त्वाचा मुलामा देणं हे सगळं खूप खूप सोपं वाटतं अशा वयात मी होतो. त्या काळात मी तेंडुलकरांवर एक अटळ माणूस नावाचा लेखही लिहिलेला होता (१९९६). तो तेंडुलकरांनी वाचला होता किंवा नाही याची मला कल्पना नाही. कारण तेव्हा मी तेंडुलकरांना ओळखत नव्हतो. नंतरही मी कधी त्याबद्दल त्यांना विचारलं नाही. त्यांच्या लेखनाबद्दल माझी मतं आजही फारशी बदललेली नाहीत. त्यांनी लेखनात जे प्रयोग केले किंवा लिहिण्याच्या संपूर्ण प्रक्रियेकडे ज्या सूक्ष्मपणे पाहिलं त्या पद्धतीने मराठीत त्या अगोदर कुणीही केलेलं नव्हतं. नाटककार तेंडुलकरांनी लिहिलेलीं नाटकं वाचली आणि पाहिली की, मराठीतलेच काय तर देशातलेही अनेक बडे नाटककार अतिशय पपलू वाटतात!तेंडुलकर कुठच्याही वास्तवाकडे अगदी वेगळ्याच पैलूने पाहतात. त्यांना भव्यतेचं अजिबात आकर्षण वाटत नाही. त्यांच्या इतक्या काळच्या प्रदीर्घ सहवासाने माझ्या लक्षात आलंय ते हे की, तेंडुलकर अगदी छोट्या, सूक्ष्म आणि कुणालाही अत्यंत बिनमहत्त्वाच्या वाटणाऱ्या घटनेत आपली कहाणी शोधतात. म्हणजे अगदी शोधतात असंही नाही, तर अशा घटनांवर त्यांचं मन रेंगाळत राहतं. त्यातून मग ते मानवी आयुष्याचे वेगळेच पदर उलगडत नेतात. त्यांच्यासोबत काही चित्रपटांच्या कथापटकथांवर मी काम केलं. दुर्दैवाने ते चित्रपट पडद्यावर आले नाहीत. परंतु काम करत असताना त्यांची कामाची पद्धत नव्याने माझ्या लक्षात आली. ती संपूर्णपणे माझ्या लक्षात आली असा माझा दावा नाही ; परंतु काही गोष्टी तरी नक्कीच लक्षात आल्या. तेंडुलकर अंशमात्र तरी समजावून घ्यायचे असतील तर त्यांची ही मनोभूमिका समजून घ्यायला हवी असं मला वाटतं. 

उदाहरणच घ्यायचं झालं तर शिवसेनेचं घेऊ या. शिवसेनेचं उदाहरण घेण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे. त्याला एक व्यापक सामाजिक संदर्भ आहे. तेंडुलकरांच्या लेखनाचाही त्याला संदर्भ आहे. शिवसेना वरवर जशी दिसते तशी तिला तेंडुलकर पाहत नाहीत. तिचा मानवी भाग त्यांना महत्त्वाचा वाटतो. विशिष्ट परिस्थितीत माणसं अशी का वागतात याचे संदर्भ त्यांना महत्त्वाचे वाटतात. त्यांना त्या वागण्याची राजकीय बाजू महत्त्वाची वाटतेच असं नाही. निदान लेखक म्हणून विचार करताना त्यांना या राजकीय बाजूपेक्षा मानवी बाजूचा मोह जास्त पडतो. मार्मिकच्या सुरूवातीच्या काळात तेंडुलकरांनी मार्मिक मध्ये काम केलंय. लेखक म्हणून मानवी बाजूचे कप्पे धुंडाळताना त्यांचे राजकीय आडाखे चुकतात. एकदा मी त्यांना विचारलं, शिवसेना पुढे एवढा मोठा राजकीय पक्ष होईल याचा तुम्हाला अंदाज होता का? ते म्हणाले, नाही अजिबात नाही.

तेंडुलकरांच्या नाट्यलेखनाच्या सुरूवातीच्या काळापासून संघ, शिवसेना या संघटनांपासून ते नानासाहेब गोरे ते ॉम्रेड डांग्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्या लेखनाचा खूप विरोध केला. 

वास्तविक सुरूवातीच्या काळात तेंडुलकर ज्या पद्धतीचं लिहीत होते ते नेमकं काय आहे ते लोकांच्या लक्षात यायला बराच वेळ लागला. त्या काळातल्या नाट्यस्पर्धांचे निकाल पाहिले की दिसतं ते हेच की, तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांना एक तर द्वितीय, उत्तेजनार्थ किंवा बक्षीस अजिबातच नाही, अशी परिस्थिती होती. माणसाचं अगदी विक्राळ आणि उघडंनागडं स्वरूप तेंडुलकरांनी जगासमोर आणायला सुरूवात केली होती. त्या काळात तेंडुलकर दाढीधारी नव्हते. त्या काळातले त्यांचे फोटो बघितले तर या माणसाच्या पोटात असा काही ज्वालामुखी दडलेला असेल यावर अजिबात विश्वास बसत नाही!

तेंडुलकरांना भेटण्याअगोदर मी तेंडुलकरांबद्दल काय काय ऐकलं होतं. ते अतिशय डिप्लोमॅटिक आहेत पासून ते माणसांपासून चे प्रचंड अलिप्त राहतात इथपर्यंत सर्व काही मी ऐकलं होतं. प्रत्यक्षात अगदीच वेगळं वास्तव माझ्यासमोर उलगडत गेलं. पार्ल्याच्या घरामधली तेंडुलकरांची खोली ही थोडीशी गूढ आणि बरीचशी बंद बंद होती. तिथे गेल्यावर सुरूवातीला माझ्यावर खूप दडपण येत असे. त्या काळात काही कारणांनी माझी मनःस्थितीही चांगली नव्हती. तेंडुलकर शांतपणे माझी बडबड ऐकुन घेत. त्यावर एखादंच वाक्य बोलत, पण ते वाक्य प्रश्नाचा मुळापासून वेध घेणारं असे. उदाहरणार्थ : पश्चात्ताप आणि स्वप्नरंजन हे दोन्हीही व्यर्थ. दोन्हीमध्ये वेळ जातो. हाताला काहीह लागत नाही असं ते एकदा म्हणाले. आपल्या आयुष्यातल्या अनेक समस्यांचं मूळ त्यांच्या या वाक्यात होतं. मी सुरूवातीच्या काळात तेंडुलकरांकडे जात असे तो बहुतेक वेळा सकाळच्या प्रहरी. मग अख्खा दिवस कधी कधी मी त्यांच्यासोबत असे. वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी माणसं त्यांच्याकडे येतजात असत. त्यांना मला न्याहाळता येत असे. राम गोपाल वर्मांपासून ते फिरोज नाडियादवालापर्यंत अनेकांना मी तेंडुलकरांच्या त्याच खोलीत भेटलोय. समोरचा माणूस कुणीही असो तेंडुलकर त्याला पूर्ण बोलू देतात. आपलं काही त्याला ऐकवण्याची त्यांना घाई अजिबात नसते. कित्येकदा ते समोरचा बोलत असताना डोळे बंद  करून डोकं मागे टेकवून बसतात. झोपल्यासारखे. समोरचा माणूस नवा असेल तर तो यामुळे हादरू शकतो, पण तेंडुलकर शांतपणे समोरच्याचं म्हणणं ऐकण्याची प्रक्रिया चालू ठेवतात, पण बऱ्याचदा याला स्टाइल मानून तेंडुलकरांना डिप्लोमॅटिक मानलं जातं ते अगदीच भंपकपणाचं आहे. तेंडुलकरांना डावपेच अजिबातच जमत नाहीत. अगदी जगायला आवश्यक तेवढे किमान डावपेचही त्यांना जमत नाहीत. त्यातलं सगळ्यात भयंकर म्हणजे ते समोरच्याने विचारलं असेल त्याचं खरं खरं उत्तर त्याच्या तोंडावर देतात. मग तो समोरचा कुणीही असो. या एकाच गुणामुळे त्यांचं अपरिमित आर्थिक आणि व्यावहारिक नुकसान झालंय. त्यातलं नुकसान होताना कित्येकदा मी स्वतःच बघितलंय. काही वेळा तर मी त्यात भागीदारही होतो. तेंडुलकरांच्या सहवासाने आणि प्रभावाने मीसुद्धा काही काळ त्यांच्यासारखाच लोकांच्या तोंडोवर खरी मते द्यायला सुरूवात केलेली होती. नंतर यातून मला प्रियाने (प्रिया तेंडुलकर ) सावध करून बाहेर आणलन्. तेंडुलकरांच्या मते आय़ुष्यात जे आपण काम करतो त्याचीच शुद्धता आणि नशा (हा त्यांचा शब्द नाही) अशी असली पाहिजे की, डावपेच वगैरेसारख्या गोष्टींसाठी आपल्यापाशी काही महत्त्वच उरता कामा नये. 

तेंडुलकरांनी बोलताना अनेकदा आपण आयुष्यात डावपेच वगैरे कोणतीही साधनं आपणापाशी नसताना आपण कसे पास झालो याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. अनेकांना खरं वाटणार नाही, पण हितसंबंध वगैरे गोष्टींचा विचार करता तेंडुलकर थेट आणि खरं बोलतात. बऱ्याचदा त्यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्यांनीही यासाठी त्यांच्यावर मजबूत खुन्नस ठेवला, पण त्यांना त्याचं काही नाही. तेंडुलकरांना भेटण्याअगोदर मला त्यांचं वैशिष्टय म्हणून एक गोष्ट ऐकिवात आलेली होती ती म्हणजे लेखक म्हणून लेखनसाधना वगैरे करण्यासाठी ते माणसांपासून आपल्या गढीत अलिप्त असे राहतात. हे तर साफ खोटं निघालं. अगदी लिहित असतानाही त्यांना कुणी भेटायला आलं तर वेळ मोडून ते त्याला भेटतातच. काही माणसं अगदी पिळूअसतात. त्यांना कटवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यात अनुभवाने मीही आता तरबेज होत आलेलो आहे, परंतु तेंडुलकरांसोबत मी खूप काळ असे, त्या काळात सातत्याने मी हेच पाह्यलंय की, त्यांनी वेड्या किंवा पिळू माणसांनाही कधी आयुष्यात व्यत्यय आणला म्हणून कटवलेलं नाही. उलट शक्य तितकी मदतच केलेली आहे. माणसं महत्त्वाची. लेखन त्यानंतर येतं हे त्यांचं यावरचं म्हणणं. आपल्या लेखनात तेंडुलकरांनी माणसांचे असंख्य प्रकार त्यांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म पैलूंसहित व्यक्त केले. कॅरॅक्टरायझेशनच्या बाबतीत तेंडुलकरांचा हात धरणारा लेखक संपूर्ण अशियाई उपखंडात विरळा, परंतु असे तेंडुलकर प्रत्यक्षात माणसांवर चटकन विश्वास ठेवतात. माणसामधली नकारात्मकता इतक्या विलक्षण झगमगीतपणे जगासमोर आणणारा हा वर्णविलक्षण लेखक प्रत्यक्षात मात्र माणूस चांगलाच असतो. यावर विश्वास ठेवणारा आहे. या विश्वासापायी त्यांनी स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना अनेकदा प्रचंड मनःस्तापाच्या ज्वालामुखीच्या तोंडावर नेऊन ठेवलेलं आहे. प्रिया हयात असताना असंख्य वेळा प्रिया आणि मी यावर तासनतास बोलत असू. तेंडुलकरांच्या गोतावळ्यातली काही मंडळी तेंडुलकरांचा गैरफायदा घेताना दिसत असत. पण तेंडुलकरांचा आपल्याजवळच्या माणसांवर इतका अंधविश्वास की ते त्यांच्याबद्दल एक शब्दही ऐकून घेत नसत. यामुळे प्रियाला प्रचंड मनःस्ताप होत असे. खरं तर हा साराच प्रकार एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तेंडुलकरांना माणसांनी आपलं स्वरूप समाजवादी, गरिबांच्या कळवळ्याचं तत्त्वज्ञान सांगणारं, दलितपददलित आणि अल्पसंख्याकांबद्दल अनुकंपा असणारं असं दाखवलं की,  तेंडुलकर त्यांना आपलं मानतात. वास्तवात बहुसंख्य समाजवाद्यांची शोरूम आणि गोडाऊन वेगळी असते. वरवर गरिबांच्या अनुकंपेची असली तरी वास्तवात दीर्घद्वेषीपणा आणि हाती आसेल्या मानगुटीला उद्ध्वस्त करण्याची खोड असलेला एक वर्ग आहे. या माणसांनी तेंडुलकरांना वास्तवात प्रचंड त्रास दिलेला आहे. खरंतर बऱ्याचदा माणसं जशी दिसतात तशी ती सुसंस्कृत नसतात, त्यांच्यात गिधाडं लपलेली असतात, हे तेंडुलकरांनी जगाला दाखवून दिलं. परंतु स्वतःच्याच अस्तनीत लपलेल्या गिधाडांना झटकून  टाकण्याऐवजी त्यांचं ते पोषण करत का राहिले याचं मला नेहमीच कोडं वाटतं. विचारलं तर, राहू दे रे. त्यांच्यासारखे ते वागले आपण आपल्यासारखं वागू हे त्यांचं ठरलेलं उत्तर. याचा त्यांना स्वतःला आणि प्रियाला अतोनात त्रास झालाय. प्रियाही तेंडुलकरांच्या प्रभावळीतल्या या प्रत्येकाला अंतर्बाह्य ओळखायची. त्यातल्या एकाने तर प्रिया गेल्यावर तिच्या एकाकी मृत्यूविषयी आणि स्वतः केलेल्या मदतीविषयी मदत करत होतो असं सांगून प्रियासारख्या आत्मसन्मान असलेल्या व्यक्तीची मृत्यूनंतर आपरिमित अवहेलना केली आणि प्रियाने त्याचं खरं स्वरूप ओळखल्याचा तिच्या मृत्यूनंतर सूड घेतला! अशा या गुन्हेगारांपुढे मोदींविषयीची तेंडुलकरांची भूमिका गृहीत धरूनही मोदी मला सरळ माणूस  वाटतात आणि तेंडुलकरांना या साऱ्याचा त्रास होऊनही परत परत ते या साऱ्यांच्या उपकारासाठी सज्ज का असतात, याचं आश्चर्य वाटतं. खरं लिहायचं झालं तर तेंडुलकरांनी प्रेमाने जवळ करून स्वतःचा प्रकाश दिलेल्या आणि बदल्यात तेंडुलकर आणि त्यांच्या कुटुंबियांना विषारी दंश करणाऱ्या माणसांवर एक जाडजूड पुस्तक लिहिता येईल!

पण या साऱ्या वादळांचा लेखक तेंडुलकरां वर काही फार परिणाम होत नाही. आयुष्यातली असंख्य वादळं, असंख्य आघात, अत्यंत प्रिय व्यक्तींचे मृत्यू, अनासक्त व्हायला लावणारं आयुष्य या साऱ्याने घेतले गेलेले असताना तेंडुलकर नेहमीच लेखक म्हणून विजय राहिले. अनेकदा अख्ख्या दिवसात तेंडुलकरांना आयुष्याशी जोडून ठेवणारा धागा फक्त लेखनाचा राहिलेला आहे. माणूस म्हणून तुमच्याशी बोलणारे तेंडुलकर लिहायला बसले की तुमचे असत नाहीत. त्यांच्या पात्रांना ते स्वतःच्या किंवा  स्वतःच्या प्रिय व्यक्तींच्या आयुष्याचे तर्क लावत नाहीत. स्वतःचे तर्क आणि स्वतःला आवडणारी तत्त्वं किंवा स्वतःला आवडणारे विचार हे तेंडुलकर आपल्या पात्रांवर लादत नाहीत. कन्यादान सारख्या नाटकाने त्यांच्यावर केवढे आरोप झाले. त्यांच्या पुरोगामित्त्वावरही त्यांच्या विरोधकांनी प्रश्नचिन्ह लावलं. पण तेंडुलकरांनी आपल्या पात्रांना त्यांचं स्वातंत्र्य बहाल केलं. त्यांच्यावर आपली मतं लादली नाहीत. आपल्या अवतीभोवतीच्या छोट्यामोठ्या घटनेत त्यांना एकदा गोष्टींचं बीज सापडलं, की मग त्यांनी त्याचं सोनं केलं. कमला सारखं नाटक घ्या. तेंडुलकरांचं आपल्या लोखनाबाबत जे धोरण आहे तेच धोरण त्यांनी वडील म्हणून अंगीकारलं. आयुष्यातल्या अनेक भूमिकांमधली मला त्यांची ही सर्वात आवडणारी भूमिका वडिलांची. 

मी तेंडुलकरांना बाबा म्हणतो. माझ्या आयुष्यात ही भूमिका त्यांनी सख्ख्या वडिलांएवढीच वकुबाने बजावली. सुषमा (ताई), प्रिया, तनुजा आणि राजू ही चार मुलं वाढवताना तेंडुलकरांनी त्यांच्यावर आपली मतं लादली नाहीत. तेंडुलकरांना याबाबतीत त्यांच्या मुलांनी फार कमी समजून घेतलं. ताईशी माझा फार संबंध आला नाही. पण प्रिया, तनुजा आणि राजू माझ्या आयुष्याचा भागच आहेत. प्रियाला आणि तनुजाला तेंडुलकरांच्या वडीलकीमधली महानता इंटेलेक्चुअली आकळली. पण भावनिकदृष्ट्या पसंत पडली नसावी. राजूने तर तेंडुलकरांच्या वडीलकीमधील स्वातंत्र्य या मूल्यावरची श्रद्धा बैद्धिक आणि भावनिकदृष्ट्या फेटाळली. राजूचं आणि तेंडुलकरांचं नातं वडील आणि मुलगा म्हणून फार गोड होतं. राजूची तेंडुलकरांवर श्रद्धा होती. आपल्या पित्याचं मोठेपण त्याला समजलं होतं आणि मान्यही होतं. पण त्याच्यात तेंडुलकरांना अतिप्रिय असणाऱ्या स्वातंत्र्याचं भय होतं. एखादा धोकादायक किंवा गुंतागुंतीचा निर्णय घ्यायची वेळ आली की तेंडुलकरांनी ठाम भूमिका घेऊन तो स्वीकारावा वा फेटाळावा असं मुलांना वाटत असे, पण तेंडुलकर बहुधा असं करत नसत. ते वस्तुस्थितीच्या जेवढ्या बाजू आहेत त्या मुलांसमोर ठेवत असत. त्यातली योग्य ती निवडा असं सांगत. आजही ते तसंच करतात. या स्वातंत्र्याच्या कल्पनेत त्यांची जबाबदारी टाळण्याची भूमिका नसे. कारण अनेकदा मुलांनी निवडलेल्या पर्यायाचा सर्व त्रास मूकपणे तेंडुलकरांन सोसलाय. यात व्यक्तिस्वातंत्र्य आणि मुलांच्याही आत्मसन्मानाला जपण्याची पराकाष्ठा असे. पण राजूला हे फारसं मान्य नसायचं. राजूला वाईल्डलाईफ आणि मुक्या प्राण्यांविषयी फार प्रेम होतं. जिम कार्बेट हा त्याचा अतिशय आवडता लेखक. त्याच्या सर्व लेखनाचे खंड तेंडुलकरांनी राजूला भेट दिलेले होते. तेंडुलकरांशी भांडण झालं की, राजू अबोला धरायचा आणि जिम कार्बेटचे सर्व खंड बाबांना परत करायचा. भांडण संपलं की, ते जिम कार्बेटचे खंड परत न्यायला तेंडुलकरांच्या खोलीच्या दरवाजावर उभा राहायचा. ते परत देताना तेंडुलकर मला जगातले सर्वत गोड बाबा वाटायचे. जगातल्या सर्व नातेसंबंधातले सर्व शुभंकर आणि भयंकर ते सारं काही उलगडून दाखवणारा प्रतापी लेखक विजय धोंडोपंत तेंडुलकर ते हेच यावर क्षणभर विश्वास बसायचा नाही. 

मी जेव्हा तेंडुलकरांकडे यायलाजायला लागलो तेव्हा माझी स्वातंत्र्य मुल्याविषयीची आस्था आणि कळकळ त्यांनी काहीही बोलता ओळखली. मला वाटतं, माझी आई टेलिफोनवर एकदा माझ्या बंडखोर स्वभावाविषयी आणि त्यामुळे घरात आणि माझ्या आयुष्यात असलेल्या तणावांविषयी त्यांच्याशी बोलली. (हे नंतर तिनेच मला सांगितलन्) तेंडुलकरांनी त्यानंतर आजतागायत पाचव्या मुलासारखं मला सांभाळून घेतलं. लिहिताना आणि जगताना येणाऱ्या अनेक समस्यांविषयी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मूल्याविषयी मी त्यांच्यशी मोकळेपणाने बोलू शकतो. बोट धरून नेताना बापाने बोट कधी सोडून दिलं हे पोराला अजिबात कळता कामा नये आणि बापाने ते तोंडाने कधीच सांगता कामा नये. शिवाय बोट सोडून जगाच्या जत्रेत शिरलेल्या पोराबद्दल पूर्ण आत्मविश्वासाने चिंता अजिबात करता कामा नये. माझ्या दृष्टीने ही आदर्श बापाची व्याख्या आहे. तेंडुलकर हे माझ्या आयुष्यात पाहिलेले अतिशय आदर्श बाबा आहेत. 

तेंडुलकरांसोबत काही चित्रपटांच्या पटकथा विकसित करण्यासाठी मदतनीस म्हणून मी काम केलं. तेंडुलकर त्यांच्याबरोबर (मदत करण्याकरिताही) काम करणाऱ्या कुणाचीही इतक कुणाशी ओळख माझे सहकारी अशीच करून देतात. सोबतच्या माणसांचे पैसे आधी आणि नीट मिळावे असा त्यांचा आग्रह असतो. हे त्यांनी आयुष्यभर पाळलंय. त्यासाठी त्यांना अनेकदा स्वतः प्रोजेक्ट सोडून द्यावा लागलाय. स्वतःसोबत कामात असलेल्या प्रत्येक माणसाचा आत्मसन्मान जपण्याचा तेंडुलकर पराकोटीचा आग्रह धरतात. त्यात ते कसलीही तडजोड करत नाहीत. जे माणसांच्या बाबतीत तेच कामाच्या बाबतीत. काम करीत असताना कामाच्या दर्जाबाबत आणि त्यातल्या छोट्यातल्या छोट्या बारकाव्यांबाबत तेंडुलकर खूप आग्रही असतात. कांद्याच्या पाती सोलत जाव्या त्याप्रमाणे ते कोणत्याही पात्राच्या तळाचा वेध घेत जातात. मग ते नाटक असो, कथा असो, पटकथा असो की कादंबरी असो तेंडुलकर त्यातल्या सर्व शक्यतांचा वेध घेत जातात. पटकथेच्या शक्यतांचा विचार करताना विशिष्ट पात्र एखाद्या परिस्थितीत किती प्रकारे वागेल याचा ते वेध घेत जातात. सर्वात शेवटी तर्क हळूच दूर सोडून अंतःस्पूर्ती आणि मनाच्या कौलाप्रमाणे निर्णय घेत जातात. आयुष्य तर्काने जात नाही. तर्क आपण नंतर चिकटवतो. आपल्या चुका, आपलं सामर्थ्य जे काही आहे त्याला तर्क आपण नंतर लावतो. आयुष्य अतर्क्य बनूनच आपल्यासमोर येतं. उलगडतानाही ते अतर्क्य असतं. जसं शांतता, कोर्ट चालू आहे मधल्या बेणारेबाई बाहेर पडण्याअगोदर अचानक कडी लावतात त्याप्रमाणे. चित्रपट लिहिताना तेंडुलकरांचा विचारप्रवास उलगडत गेला आणि मला कळला हो हा असा. 

तेंडुलकरांबाबत मला अनेकदा असं वाटतं की, ते आपल्या एवढे जवळ  असल्यामुळे आपण त्यांना समजू शकत नाही की काय? तेंडुलकरांना जेव्हा नेहरू फेलोशिप मिळाली तेव्हा ते भारतभर हिंडले. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यापासून तऱ्हेतऱ्हेच्या माणसांना ते भेटले. त्यांच्यातली जाणून घेण्याची आग, लिहिण्याची आग आणि सर्व विपरीत परिस्थितीत लिहीत राहणं हे किती कठीण आहे. त्यांच्यानंतर आलेल्या आणि त्यांच्या अगोदरच्या फार थोड्यांना हे जमलं. एका गॅरेजमध्ये मधून नाला वाहत असताना चार मुलांसहितचा संसार सांभाळत इतकं अस्सल लिहिणं हे एखाद्या यक्षालाच शक्य आहे!

हातून लिखाण होण्याचे आज जेव्हा माझ्यासारखा कुणी अनेक बहाणे सांगतो तेव्हा तेंडुलकर गालातल्या गालात हसतात. त्या हसण्यात मिस्कीलपणा असतो. मध्य प्रदाशचे भाजपचे तेव्हाचे मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा कालिदास सन्मान घ्यायला गेलेल्या तेंडुलकरांशी ते चित्रकार आहेत, असं समजून  बोलले होते. तेव्हाही तेंडुलकर असेच मिस्किल हसले असतील. अज्ञानामुळेच त्या मुख्यमंत्र्यांना पुढे बोलण्याचं धैर्य येत गेलं. आपलंही तसंच होतं. आपण पुढे बोलत राहतो. तेंडुलकर मात्र यक्षाच्या तटस्थतेने आपलं शहाणपणाचं पापपुण्य तोलत असतात. 

लिहिण्यासारखं असं बरंच आहे, पण यक्ष पकडायला गेलं की हाताला लागत नाही! तो अदृश्य राहतो आणि जाणवतोही. 

तेंडुलकर गेले त्याअगोदर म्हणजे मागच्या दिवाळीत मी माझ्या आईवर  मी, आई आणि मृत्यू हा लेख अक्षर च्या दिवाळी अंकात लिहिला होता. माझी आई ऑगस्ट २००६ ला गेली. २००७ च्या दिवाळीत लेख प्रसिद्ध झाला. तेंडुलकर तेव्हा डॉ. प्रयागांच्या हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ होते. तो त्यांच्या प्रदीर्घ आजारपणाचा पहिला टप्पा होता. दुसऱ्या टप्प्यात तेंडुलकर गेले. 

 

मायस्थेनिया ग्रॅव्हिस आणि इतर अनेक गुंतागुंतीच्या आजारात कंटाळून गेलेल्या तेंडुलकरांनी अशक्तपणातही तो लेख विद्याताई आपटेंना मोठअयाने वाचायला लावला. वाचून तेंडुलकरांनी तत्काळ मेसेज पाठवला, तुझा आईवरचा लेख आत्ताच वाचला. अप्रतिम. मला तुझा हेवा वाटतो त्यानंतर दोनच दिवसांनी तोच लेख त्यांनी विद्याताईंना पुन्हा वाचायला लावला. नंतर एसएमएसद्वारे परत मेसेज पाठवला, तुझा आईवरचा लेख पुन्हा विद्याकडून वाचून घेतला, पुन्हा आवडला.

तेंडुलकरांच्या आणि माझ्या सरता वर्षांच्या संवादातलं ते लेखनवातनासंबंधी शेवटचं संभाषण होतं. तेही मोबाईल एसएमएसद्वारे आणि तेही तेंडुलकर स्वतः मृत्यूच्या छायेत असताना. डॉ. प्रयागांच्या हॉस्पिटलमध्ये असताना तेंडुलकरांना भेटायला मी फार तर दोनतीन वेळाच गेलो असेन. एकदा तर त्यांनी दोनतीन दिवस मला इथे तू हवाच आहेस असं कळवलं होतं. तेव्हाही त्या तारखा मी ऍडजस्ट करून शकलो नाही. त्यांनीही हट्ट लावून धरला नाही. 

तेंडुलकर डॉ. प्रयागांच्या इस्पितळात असताना सतत मृत्यूच्याच छायेत असताना मला दिसत. ते मला आतून पिळवटणारं होतं. ते सारं ज्या अशोककाका कुलकर्णी आणि विद्याताई आपटेंनी ज्या हिमतीने आणि अर्थपूर्ण प्रेमाने निभावलं, त्याच्यापुढे मी तर एक पळपुटा बिंदूसुद्धा नाही. 

वास्तविक तेंडुलकरांनी मला आयुष्यात अशी अनेक दालनं खुली करून दिली ज्याची कल्पनाही अनेकजण कशू शकत नाहीत. पण  मी जे लिहिणार आहे ते त्याबद्दल नाही तर तेंडुलकर आणि माझ्यात एक करार झाला होता, त्याविषयी मी आज लिहिणार आहे. प्रिया तेंडुलकर जेव्हा गेली तेव्हा मी तिच्या आणि राजू तेंडुलकरच्या अचानक जाण्यावर एक प्रिया आणि राजू हा लेख लिहिला होता. तो लेख लिहून झाल्यावर मी तेंडुलकरांना वाचून दाखवला, तेव्हा ते म्हणाले, जवळून पाह्यल्याने मी नसतो असं लिहू शकलो. त्यांचे डोळे तेव्हा भरून आलेले होते. 

प्रिया आणि राजू हे लेखाचं नावही त्यांनीच सुचवलेलं. तो लेख जिथे संपला, तिथे प्रत्यक्षात तो संपत नव्हता. तो खूप मोठा लेख होता. माझ्या आयुष्यात प्रियाच्या मैत्रीचं एक विशेष स्थान आहे. तिच्याही आयुष्यात ते होतंच. पण प्रत्यक्षात तो लेख जिथे थांबलाय, तिथे तो तेंडुलकरांनी थांबवला.

ते चटकन म्हणाले, इथे थांब. पुढचं पुढे कधीतरी लिही. म्हणजे मी नसताना. कदाचित मी पुढचं ऐकू (आणि वाचू) शकणार नाही.

तोवर राजू आणि प्रियाचे मृत्यू होऊन गेलेले होते. 

जे लिहिलं नाही आणि झालं ते असं होतं. म्हणजे मी पाहिलं ते असं पाहिलं. 

तेंडुलकरांच्या पूर्वायुष्यात त्यांनी मोठ्या भावाच्या प्रतिभेचं मातेरं घेऊन त्याचा करूण अंत पाहिला होता. पण उत्तरायुष्यात म्हणजे मी तेंडुलकर कुटूंबाचा घटक झाल्यावर त्यांच्या घरात मृत्यूने ठसा उमटवायला सुरूवात केली त्याचा पहिला साक्षीदार आणि श्रोता मी होतो. तनुलाही ते नंतर कळलं. 

तेव्हा प्रिया पवईला जलवायुविहार मध्ये राहत असे. या घटनेच्या साधारणतः वर्षदीड वर्ष आधी प्रिया तेंडुलकर टॉक शो मध्ये मी पॅनलवर लेखक म्हणून गेलो होतो. एण्ड ऑफ आयडिऑलॉजी हा विषय होता. तो शो झाल्यावर प्रिया हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. तिच्या पोटात ट्युमर होता. तो डॉ. सोनावाल यांनी शस्त्रक्रिया करून काढला. त्याची वेदना सहन करत (पोटात ट्युमर असताना) प्रियाने ते शूटिंग केलं होतं. तो ट्युमर बिनाइन म्हणजो नॉनकॅन्सरस आहे असं डॉक्टरचं म्हणणं पडलं. 

त्याची प्रियाने एक पार्टी जलवायुविहारमध्ये तिच्या घरी सेलिब्रेट केली होती. त्यात मी घरातला नवा, संकोची घटक असल्यासारखा होतो. तेंडुलकर आणि माझा स्नेह आता जुना झालेला असता करी मी प्रियाला तेवढा सरावलो नसतो. वर्षभरात आप की अदालत या तिच्या कार्यक्रमाचं संशोधन करता करता मी तिला सरावलो. 

तिच्या या पहिल्या शस्त्रक्रियेनंतर वर्षसव्वा वर्षाने तिने मला एका रात्री  तिच्या जलवायुविहारच्या घरी बोलावलं. खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून. तोपर्यंत मी तिचा सख्खा मित्र झालेलो होतो.  रात्री साडेनऊचा सुमार असेल. तसं तर आम्ही दुसऱ्या दिवशीच्या शूटिंगसाठी रात्री दीडदीडदोनदोन वाजेपर्यंत जागून अभ्यास करत असायचो. पण त्या दिवशी प्रियाचा मूड वेगळा होता. ती ठाम आणि निश्चल होती. 

राजू एक गोष्ट आहे. ती परवाचं शूटिंग होऊन जाईस्तोवर तू बाबांनासुद्धा सांगू नकोस प्रिया म्हणाली. माझ्या पोटात पूर्ण आकाराचा ट्युमर पुन्हा वाढलाय. मला वाटत नाही या वेळी नॉनकॅन्सरस असण्याएवढी मी सुदैवी असेन.

पुढे तिचं म्हणणं आठवड्यातच खरं ठरलं. 

तिला कॅन्सर असल्याचा रिपोर्ट आला. तेंडुलकरांनी मला बोलावून घेतलं म्हणाले, मला तू हवा आहेस.

मी बद्रिधाममध्ये तेंडुलकरांच्या घरी गेलो. तिथे राजू तेंडुलकर येरझाऱ्या घालत होता. तो फार भावुक आणि डिस्टर्ब्ड होता. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. राजू तेंडुलकरएवढा निरागस आणि भोळा माणूस मी क्वचित कुणी पाह्यलाय. 

तेंडुलकर आपल्या खोलीत बसून प्रियावर असलेल्या जबाबदाऱ्या आणि ताण हलके कसे करावे याची आखणी करत होते. मधून मधून मला त्यांनी, 

तुला काय वाटतं? असं विचारलं तेवढंच.

बाकी त्यांनी प्रिया आता कधी तरी नसणार आहे हे स्वीकारलेलं होतं. जे त्यांना स्वीकारणं अशक्य होतं. कारण इतर कोणत्याही मुलापेक्षा प्रिया ही तेंडुलकरांची अधिक छायाप्रतिमा होती. 

प्रिया इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरच्या पहिल्या झडपेतून बाहेर आली जिम्मेदार कौन हा नवा कार्यक्रमही तिने करायला घेतला. त्याचं संशोधनही मीच करायचो. तेंडुलकर, प्रिया आणि मी यांच्यात सतत संपर्क असायचा. मृत्यूची एक अतिशय हलकी सावली असलेलं ते एक उत्कट नातं होतं. बाबा (म्हणजे तेंडुलकर) आणि प्रिया यांच्यापैकी कुणीही एक आपल्या आयुष्यात नसणार ही कल्पना जरी मनाशी आली तरी त्या काळात माझे पाय थरथरत. 

माणूस म्हणून माझं व्यक्तिगत आयुष्य कधी सुरक्षित, शांत सुव्यवस्थित गेलेलं नाही. 

त्यामुळे तेंडुलकर, मी आणि प्रिया यांच्यात एक कम्फर्ट झोनहोता. त्या कम्फर्ट झोन वर सतत यमराजांची पहारेदारी होती.

प्रियावर मृत्यूची छाया पसरलेली असताना लिव्हर सिरोसिसने राजू अचानक आजारी पडला. त्यातही  प्रियाने अथक प्रयत्न करून त्याला बरा केला. मृत्यूच्य़ा दाढेतून बाहेर काढला. पण काही कारणाने त्याची जीवनेच्छाच संपत गेली. 

त्याला पुन्हा नानावटी हॉस्पीटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. प्रियाच्या सांगण्यावरून मी तेंडुलकरांना भेटायला गेलो. तर त्यांनी मला नानावटीत जाऊन राजूचं काही बरंवाईट झालं तर (ते होणार हे इतःपर स्पष्ट झालेलं होतं) परस्पर हॉस्पिटलमधूनच स्मशानभूमीत त्याला न्यायचा प्रियाला निरोप दिला. तिचं त्याबद्दल (म्हणजे राजूला परत घरी आणण्याबद्दल) मन वळवण्याची जबाबदारी तेंडुलकरांनी माझ्यावर टाकली. हे किती अवघड?कारण मृत्यूच्या दारात असला तरी जिवंत होता! तरी मी प्रियाशी बोललो.

त्या काळात मी लिहिलेली आरंभ नावाची मालिका टीव्हीवर चालू होती. त्यात प्रिया होती. परिस्थितीविषयी अज्ञानात असणाऱ्या एका बाईने त्यातच मध्ये येऊन प्रियाचं तिच्या अभिनयाबद्दल कौतुक केलं. प्रिया मला म्हणाली,राजूच्या रूममध्ये एकदा जाऊन त्याला हाक मार. ओळखीच्या कुणी हाक मारली तर ब्लड  – प्रेशर वर जातं…… ही वेड्या बहिणीची वेडी आशा होती. 

मी आत गेलो तर राजूचं ब्लडप्रेशर श्यून्याकडे झेपावत होतं. पायाला कंप सुटल्या अवस्थेत मी राजूकडे बघत राहिलो. त्याच्या डोळ्यातून रक्त पाझरू नये म्हणून (रक्त गोठवण्याची यकृताची क्षमती संपली होती) डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या होत्या. 

कॅमेऱ्याच्या लेन्सेसमधून उत्कृष्ट तेच पकडणारा विजय तेंडुलतकरांचा लाडका कॅमेरामन मुलगा राजू तेंडुलकर अखेरच्या प्रवासाला निघाला होता. यानंतर तो आपल्या बाबांशी तुम्ही त्या राजू परूळेकरचे फार लाड करता म्हणून भांडणार नव्हता की, रागाने त्यांनी दिलेल्या भेटीही त्यांना परत करणार नव्हता. 

राजू गेल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याच नानावटीच्या स्टुडिओत आम्ही जिम्मेदार कौन चे चार एपिसोड तेंडुलकरांच्या दिग्दर्शनाखाली शूट केले. 

तेंडुलकर आणि प्रिया दुःख गिळून उभे राहिले. 

प्रियाच्या डोक्यावरची केमोथेरपी आणि कॅन्सरची टांगती तलवार खाली खाली येत होती. तिच्या मृत्यूअगोदर सात महिने मी तिच्याशी बोललो नाही. अपवाद तिच्या एका आलेल्या फोनचा. त्याव्यतिरिक्त तिची तिव्र आठवण येऊन मी तिला फोन केला. जो तिने उचलला नाही. माझ्याबाबतीत तिने पूर्ण आयुष्यात असं फक्त एकदाच केलं. 

मी शेवटचे सात महिने तिच्याशी बोललो नाही. त्याचं कारणही तेंडुलकरच होते. अर्थात अप्रत्यक्षपणे. एके दिवशी प्रियाचा मला भडकून फोन आला. कॅन्सर आणि केमोथेरपीने ती खूप जर्जर झालेली होती. तिला झालेला आजार कुणा नवीन व्यक्तीला कळलेलं तिला आवडत नसे. तिला कुणीतरी फोन करून तिच्या आजाराबाबत सहानुभूती व्यक्त केली. तिचं त्यामुळे डोकंच गेलं.

 ाणसांना बाबा (म्हणजे तेंडुलकर) माहिती देतात.

असं नसावं बहुधा. शिवाय  तेंडुलकरांना वाटायचं की, यात लपवण्यासारखं काय? हेही खरंच. पण यातून मी बोध हा घेतला की, आता हे काही लपणार नाही. नंतर एके दिवशी प्रियाला माझा संशय वाटणार. आयुष्यातले इतके अनमोल आणि दर्जेदार क्षण जिच्यासोबत आपण घालवलेत, तिने आपल्याबद्दल असं मानणं हे दुःखद आणि वेदनादायीच. यात माझी थोडी अपरिपक्वताच होती असं (आता ) मला वाटतं. पण मला जे वाटलं ते तेंडुलकरांना मी सांगितलं नि प्रियाशी संभाषण थांबवलं. 

बरोबर सात महिन्यांनी प्रिया गेली. 

त्या रात्री मी तेंडुलकरांच्या घरी त्यांना भेटायला गेलो. घरातली माणसं होतीच. तेंडुलकरही होते. विषण्ण. पण सावरून घेत. ते त्यातून कसे गेले असतील हे त्यांचं त्यांना ठाऊक. 

मिसेस तेंडुलकरांना नंतर बराच काळ काही कळायचं नाही. त्या गेल्या त्या नेमक्या २६२७ जुलै २००५ च्या पुराच्या वेळी. कुणीच कुणाशी संपर्कात नाही. अचानक तेंडुलकांचा भाचा सचिन आला म्हणून मिसेस तेंडुलकरांची अखेरची व्यवस्था तरी झाली. 

या मृत्यूच्या तांडवातून पार पाडून तेंडुलकर मग अमेरिकेला गेले. तिथून त्यांचं मला रोज एक मेल यायचं. त्यात मला नाही जगायचं आता अशी एक डिप्रेशनची भावना असायची.

तेव्हा मी दहिसरला राहायचो. माझ्या घरी कॉम्प्युटर नव्हता. मी संध्याकाळ होऊन सायबर कॅफेत जायची वाट पाहायचो. धावत जाऊन तेंडुलकरांचं मेल चेक करायचो. त्यांना अनेक शपथा घालायचो. महान नातेसंबंधांची आण द्यायचो. ते अगदी लहान मुलासारखे सारे हट्ट पुरवून घ्यायचे.

माझ्या आयुष्यातलं एक अख्खं युग त्यांनी माझे अनेक आचरट हट्ट असेच पुरवले होते. तासनतास माझ्याबरोबर बसून माझ्या प्रत्येक शंकेचं नि प्रश्नाचं उत्तर ते पुऱ्या शक्तीने द्यायचे. माझ्या मित्रांशी मैत्री करायचे. माझ्या शत्रूंशी संबंध तोडायचे. माझ्या आईवडिलांनीही हे माझ्यासाठी कधी केलं नाही.

मृत्यूअगोदर काही महिने डॉ. प्रयागांच्या हॉस्पिटलमध्ये माझा हात घट्ट हातात धरून ठेवला नि म्हणाले, “माझ्या बंटीकडे (आदित्य तेंडुलकर) लक्ष दे. माझ्या साऱ्या आशा त्याच्यावर केंद्रित झालेल्या आहेत. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. 

मी नवीन घर घेतलं ते त्यांना खूप आवडलं. ते इथे खूप दिवस राहायला येणार होते. आम्ही खूप वाद घालणार होतो. ते माझ्याबद्दल माझ्या वडिलांशी बोलणार होते. शिवय मला अनेक सल्ले त्यांना द्यायचे होते. त्यातला एक तर त्यांनी दिलाच राजकारणी माणूस कितीही जवळचा माणूस वाटला तरी लेखकाने त्याच्या फार जवळ जाऊ नये. नुकसान होतं दोघांचंही. हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर पाळलं.  

मला त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी पटायच्या नाहीत. त्यांची वाट घालण्याची एक विशिष्ट पद्धत होती. ती ते फॉलो करत. 

मेधा पाटकर हा आमच्या वादाचा एक प्रमुख मुद्दा असायचा. मेधा ही त्यांच्या कल्पनेतली (त्यांची) आदर्श मुलगी होती. तिच्या काहीही आणि कितीही चुका झाल्या तरी तिला सांभाळून घ्यावं असं त्यांना वाटे. 

प्रिया तिच्या करिअरच्या ऐन भरात होती तेव्हा अनेक राजकीय पक्षांना ती आपल्या पक्षात यावी असं वाटे. प्रियालाही सत्ता या तत्त्वाचं आकर्षण होतं. पण तेंडुलकरांना काय वाटेल? या एका मोठ्या प्रश्नापायी ती मन मारून गप्प राहायची. 

मला वाटतं, तेंडुलकरांची ही एक थोडीशी त्रासदायक बाजू होती. म्हणजे ते स्वतः नैतिक  अनैतिक यापलीकडचं   नैतिक पाहू शकायचे. ते किंबहूना नैतिकतेचे (amoral) समर्थकच होते, पण त्यांच्या भूमिकांचा त्यांच्या हृहयस्थांवर दडपण आणणारा एका परिणाम होत असे. या अमक्यातमक्या मुद्द्यावर तेंडुलकर काय म्हणतील या विचाराने जीव कासावीस व्हायचा. अर्थात मुलं बंड करायची नाही असं नाही, पण मग तेंडुलकर ओरडायचे नाहीत. मौनाने नाराजी दर्शवायचे. 

सकाळी सकाळी त्यांचा LUV  किंवा For a change : LUV असा मेसेज आला तर त्यांचा मूड चांगला आहे असं कळायचं. पण हे सगळं अलीकडचं. त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस आहे असं कळल्यावरचं. शरीरातली एकेक गोष्ट मंद होत जातेय असं त्यांना वाटे.

त्यांतही त्यांनना स्वतंत्र्योत्तर काळातला इतिहास आपल्या आत्मचरित्राच्या संदर्भात लिहायचा होता. मला ते त्या संदर्भात योग्य वाटतील नि वाचून आवडतील ती पुस्तकं आणून दे असं सांगायचे. कारण त्यांच्या हालचाळींवर बरेच निर्बंध आलेले होते. शिवाय ही पुस्तकं नेऊन दिल्यावर मी हे सारं लिहायला जिवंत राहीन असं वर म्हणायचे. त्यांना त्यांचा मृत्यू कळला होता. पण आत खोलवर त्यांची जगण्याची इच्छा आणि जिज्ञासा प्रबळ होती. ती इच्छाच त्यांचं आयुष्य इतका काळ खेचू शकली. नाहीतर तेंडुलकरांच्या जागी इतर कुणी लेचापेचा (माझ्यासाखा) असता तर पहिल्या आघातासरशी कोसळायचा. 

तेंडुलकरांनी मरणयातना सोसल्या, पण देवाला हात जोडले नाहीत किंवा सामर्थशाली मोठ्या माणसाशी जवळीत साधण्याचा अगदी सहजशक्य असूनही प्रयत्न केला नाही. 

गजबजलेल्या आणि अगदी उत्साहाने भारलेल्या अशा तेंडुलकरांच्या घरात मी जात असे. स्वतः तेंडुलकर, मिसेस तेंडुलकर, ताई (सुषमा), प्रिया, बंटी (आदित्य, राजू तेंडुलकरांचा मुलगा), सीमा (राजूची पत्नी) सगळीजणं उत्साहाने भारलेली असत. त्यात तनु आणि झुमु ( अनुष्का, तेंडुलकरांच्या तनुजा मोहिते या मुलीची जावई राजीव मोहिते यांची मुलगी) येऊन  जाऊन असत. 

तेंडुलकरांसोबत मी काही चिंत्रपटांवर काम करत होतो. त्याच वेळी स्वतंत्रपणे सीरिअल्सही लिहित असे. एखाद्या संहितेवर विचार करायची वेळ आली की मी आणि तेंडुलकर बद्रीधामच्या गच्चीवर येरझाऱ्या मारायचो. अशा आमच्या येरझाऱ्यांचे राजूने कित्येक फोटो काढलेले होते. 

तो एखाद्या लहान निरागस मुलासारखा होता. त्याला मी आवडायचोही नि त्याला माझा रागही यायचा. तेंडुलकर मला जास्त वेळ देतात, अशी खंत त्याला वाटायची, जी तो मलाच बऱ्याचदा बोलून दाखवायचा. 

दिल्लीत आमचं आप की अदालत चं शूटिंग असलं (इगल स्टुडिओ, नॉयडा) की रात्री हॉटेलमधल्या माझ्या रूमवर येऊन तासनतास तो बोलायचा. त्यातलं बरंचसं तेंडुलकरांबद्दलच असायचं. तेंडुलकर वडील म्हणून त्याला आवडायचेही अन् नावडायचेही. त्यावर त्याला माझं मत हवं असायचं. मी ते द्यायचो नाही. त्याचं कारण पूर्णतः वेगळं होतं. पण तो जे त्याचं कारण समजायचा ते सगळं वेगळं असायचं. 

मला माझ्या बाजूने राजू तेंडुलकरच्या बुटात पाय घालून विचार करताच यायचा नाही. 

एकतर मला माझ्या म्हणून बऱ्याच अस्वस्थता होत्या. शिवाय मी त्याच्यासारखा विचार करण्याच्या टाइप मधला नव्हतो. मग तो मला चतुर आणि राजकारणी मानायचा. 

हे सारं तेंडुलकरांपर्यंत जायचं. तेव्हा ते डोळे बंद करून शांतपणे आपल्या आमरामखुर्चीतच पडून राहायचे. बऱ्याचदा माझ्या खांद्यावर हात ठेवायचे. हळुवारपणे तिथे दाबल्यासारखं करायचे. 

डॉ. प्रयागांच्या इस्पितळात पूर्ण शुद्धीत असताना (पहिल्या टप्प्यात) मी त्यांना भेटलो. तेव्हा विद्याताई कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. काही मिनिटं मी, तेंडुलकर आणि शांतता एवढेच होतो. तेव्हा तेंडुलकरांना बोलायची क्षमता नव्हती. (त्यांच्या गळ्यात ऑपरेशनने नळी टाकलेली होती) तेव्हा तेंडुलकरांच्या पायांना मी चोळल्यासारखं केलं. त्यांनी मला जवळ बोलावलं. माझ्या खांद्यावर तसाच हात दाबला. मग आपल्या दोन हातात माझे हात घेऊन खूप वेळ ते तसेच घट्ट धरून राहिले. 

मला जणू जाणवत होतं की, त्यांच्यापाशी जे जे मला देण्यासारखं होतं ते ते त्यांनी मला आयुष्यभर दिलं. त्यातलं हे शेवटचं!

जवळजवळ तीन  एक मिनिटं त्यांनी हात घट्ट धरून ठेवले. इतके घट्ट की काही कळावं.

पण ती माझी आणि तेंडुलकरांची काही शेवटची भेट नव्हे. नंतर अगदी शेवटी ड़ॉ. प्रयागांच्या इस्पितळात नेण्याअगोदर त्यांना त्यांच्या हिल्टन टॉवर च्या घरात दोनदा मी भेटलो. ते मांडीमागच्या बेडसोरनी अत्यंत चिडचिडे झालेले होते. 

त्यांनी खाणंपिणं, औषधें, गोळ्या साऱ्याचा त्याग करायचा निर्णय घेतला होता. तरीही माझ्या आग्रहाखातर सूप प्यायले. त्यांना आपलं इतरांना करावं लागतं याचा तीव्र राग येत होता. क्षणाक्षणाला तो ते व्यक्त करत. विद्याताई त्यांची समजूत काढत राहत. 

डॉ. प्रयागांच्या इस्पितळात दुसऱ्यांदा जाण्याआधी मी हिल्टन टॉवर मध्येच त्यांना शेवटचं भेटलो. ते मनाने तेंडुलकर उरले नव्हते. विद्याताईंना ते तसं म्हणतही. हा मी तो नव्हे वगैरे.

त्या दिवशी पहिल्यांदा मी त्यांच्या कपाळपट्टीवरून हात फिरवत राहिलो. मला वाटलं, जणू मी त्यांचं आयुष्याचं प्रारब्ध चाचपतोय. 

यश आणि सुख यांचा परस्परांशी कधीच, काहीच संबंध नसतो, हे मला पहिल्यांदा तेंडुलकरांकडे कळलं. म्हणजे ते आपल्याला कळतही असतं पण निःसंदिग्धता नसते. ती मला तेंडुलकरांनी दिली. 

त्या अर्थानं तेंडुलकर हे युगंधरच होते. बहरलेलं अख्खं घर मृत्यू पाठलाग करून एकेकाला गाठतो. घर पाहाता पाहता अदृश्य होतं. हा महानायक ते सगळं पचवत राहतो नि सर्वात शेवटी स्वतः मृत्यूला सामोरा जातो. हे युगंधरालाच शक्य आहे. 

शेवटी स्वतः अन्न, औषध, पाणी वगैरे घेता मृत्यूला सामोरा जाण्याचा निर्णय तेंडुलकरांचा स्वतःचा होता. डॉक्टरांनी त्यांच्या इच्छेचा मान राखला. मी तेंडुलकरांचं अंत्यदर्शन घेतलं नाही. ते असलं काही मानणारे नव्हते. ते गेल्याची बातमी कोणत्याही क्षणी येणारच होती. ती आली. 

नाटक, सिनेमा, राजकारण, सांस्कृतिक, सामाजिक या अर्थाने त्यांचा प्रचंड परिवार होता. तो हळहळला, रडला, दुःखी झाला. स्वाभाविकच आहे. असा महान लेखक नि महान माणूस जन्माला यायला हजारो वर्षे लागतात. नंतर तो या जगात घडत जायला पन्नास वर्षेतरी जातात. त्यानतंर त्यातला काही तो आपल्या वाट्याला येतो. 

माझ्यासाठी तेंडुलकर हे बाबा होते, कन्फेशन बॉक्स होते, अपराध करायला परवानगी देणारेय यक्ष होते. तो केल्यावर मानवी स्खलनशीलतेला विवेकाचं कुंपण असायला हवं हे खरं असलं तरी ते बऱ्याचदा नसणं हे सुद्धा मानवीच आहे हे समजुतीने सांगणारे गुरू होते. आपण हे केलं तर तेंडुलकरांना काय वाटेल? असा एक प्रश्न मनाच्या चौकटीत रूतत असे. कोणतीही भूमिका घेताना ही चौकट माझी पाठ सोडत नसे. तेंडुलकरांनी मरून ती चौकट मला रिकामी करून दिली. 

जणू या जगाच्या जत्रेत माझं बोट हळूच सोडून मला आता गर्दीत सोडून दिलं किंवा सायकल शिकवताना कॅरियर सोडून दिलं. आता पॅडल मारायच्या आणि बॅलन्स सांभाळायचा. 

राज  ठाकरेने शिवसेना सोडली त्याअगोदर मी त्याला तेंडुलकरांकडे घेऊन गेलो होतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यावरही त्याला बाळासाहेबांची खूप आठवण येत असे. (कदाचित रडूही येत असे) मी त्याला पुन्हा तेंडुलकरांकडे भेटण्याचं सुटवलं. तेंडुलकरांनी त्याला जेवायला बोलावलं. त्या दिवशी तेंडुलकर वृद्धापकाळ , बाळासाहेब, शिवसेना, नवा पक्ष, भावना आणि राजकारण यावर जे बोलले त्याचा मी साक्षी होतो. 

माणसाला म्हातारपणी जे रडू येतं ते एका विशिष्ट गोष्टीचं असतं असं नाही. अख्खं आयुष्य बसल्या जागी त्याच्या मनाशी दाटलेलं  असतं. त्यातला तुकडा  तुकडा त्याला रडवतो. करण्यासारखं त्याच्यापाशी फारसं काही त्याच्या हातात उरलेलं नसतं. तो फक्त मनाशी पुनःपुन्हा जिगसॉ पझल  वेगवेगळ्या पद्धतीने लावून बघतो. त्याच्या लक्षात येतं