शरद पवार हे एक वादग्रस्त नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व राहिलेलं आहे, अर्थात ते स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाची कारकीर्दच ५० वर्षांची आहे आणि त्यांचे वय ८० वर्षं! त्यांच्या बाबतीत उतार-चढाव आणि अनेक वाद होणं हे स्वाभाविकच आहे म्हणा.
पवारसाहेबांनी संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या-आघाड्या करून आपलं राजकारण केलं. त्या अर्थाने ते एका खऱ्या भारताचे प्रतिनिधित्व करतात. कारण भारत देश हीच एक मोठी युती आहे. अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक राज्य, अनेक जाती उभ्या-आडव्या पसरलेल्या. या देशात युती आणि आघाडी करण्याचं कसब नसेल तर ते चांगलं नेतृत्व करण्याची क्षमता नाही, असं मानलं जातं. पवारसाहेब एक बलाढ्य नेते ठरण्याची जी अनेक कारणं आहेत, त्यापैकी कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी करण्याची त्यांची क्षमता हे एक महत्त्वाचं कारण. वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी त्यांनी पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग केला आणि ते स्वतः मुख्यमंत्री बनले. ती एक आघाडी होती. (त्याविषयी इतर माहिती मी लिहिणार नाही, कारण ती इतरत्र उपलब्ध आहे.) त्यानंतर पवारसाहेबांच्या आयुष्यात अनेकदा अशी आघाड्या करण्याच्या वेळा आल्या, तेव्हा त्यांनी त्या सहजपणे केल्या. याचं कारण म्हणजे अतिशय तरुण वयात स्वतःच्या बळावर अशी आघाडी करण्याचं कसब त्यांनी आत्मसात करून घेतलं, हेच होतं.
तिशीत असल्यापासून आत्ता म्हणजे ऐंशी वर्षांचे होईपर्यंत आपल्याहून वयाने मोठ्या किंवा लहान नेत्यांशी किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तींशी संवाद साधायला, दोस्ती करायला पवारसाहेबांना अवघड जात नाही. फक्त अशी दोस्ती करताना तिचं नेतृत्व आपल्याकडे राहील, याची योग्य ती काळजी ते घेतात. एकदा त्यांचे अत्यंत जवळचे स्नेही विठ्ठल मणियार यांच्याशी बोलत असताना विठ्ठलकाकांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “आम्ही पवारसाहेबांचे मित्र असलो तरी स. पा. कॉलेजमधल्या निवडणुकीतसुद्धा भिंतीला खळ लावून पोस्टर चिटकवण्याचे काम आमचे असायचे आणि त्यावर देखरेख करण्याचे काम पवारसाहेबांचे असायचे.” यावरून आयुष्यात आपली भूमिका काय असली पाहिजे, याचं ज्ञान पवारसाहेबांना तरुण वयापासूनच होतं, ते दिसून येतं.
पवारसाहेबांवर मी यापूर्वी दोन लेख लिहिले होते. पैकी एक लेख हा तत्कालिक होता, तर दुसरा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होता. परंतु, त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला न्याय द्यायचा झाला तर त्यांच्या कारकिर्दीचा भाष्यकार व्हायला लागेल, जे इतकं सोपं अजिबातच नाही. त्यामुळे मीही ते करू शकलेलो नाही. पवारसाहेबांच्या कारकिर्दीवर लिहिताना त्यांच्यावर माझ्याकडून काही प्रमाणात अन्यायच झाला. त्याचं कारण म्हणजे एखादी लिहिणारी व्यक्ती राजकीय काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल त्याच्या कृतीची फक्त ५० टक्के कारणमीमांसा करू शकतो. त्या त्या राजकीय व्यक्तीने जगलेल्या घटनांचा इतिहास म्हणून उलगडा एका वेगळ्या प्रकारे होतो.तो लेखकाला आधी करताच येत नाही. आज मागे वळून पाहताना पवारसाहेबांचा ८० वा वाढदिवस आणि त्यांच्या कारकिर्दीची ५० वर्षं पूर्ण झाल्यावर असं दिसतं, की पवारसाहेब हे खरेखुरे लोकशाहीवादी आणि काँग्रेसी आयुष्य जगलेत. इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लादली होती, तेव्हा पवारसाहेबांच्या कारकिर्दीचा दुसरा टप्पा नुकताच सुरुवात होत होता. त्यात जनता पक्षाचं सरकार आल्यावर तर पवारसाहेबांनी थेट ‘पुलोद आघाडी’ची स्थापना करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्या काळानंतर अगदी आत्तापर्यंत पवारसाहेबांवर सत्तालोलुप, संधीसाधू, पाठीत खंजीर खुपसणारे वगैरे वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप वेळोवेळी झाले. परंतु त्यांनी आरोपांपासून पळ न काढता किंवा आरोपांवर मौन न बाळगता प्रत्येक आरोपावर उत्तर दिले, भले कुणाला ती उत्तरे पटोत न पटोत. सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांची देशावर चालणारी हुकूमशाही पाहताना पवारांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीतली लोकशाही पद्धत आपल्याला जाणवते आणि पटते. त्यांच्यावर लिहिताना महाराष्ट्रात लेखकांनी अन्यायच केला असं वाटतं.लोकशाही पवार साहेबांच्या अंगात इतकी भिनलेली आहे की अगदी आत्ता ज्या निवडणुकीत ‘पवार पॅटर्न’ संपला, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि अर्ध्याहून जास्त राष्ट्रवादीचे नेते फोडून भारतीय जनता पक्षात पळवून नेले होते, तेव्हासुद्धा पवारसाहेब पत्रकार परिषदेत आपल्याला विचारल्या गेलेल्या अत्यंत ज्युनिअर पत्रकाराच्याही प्रश्नांना शांतपणे उत्तर देत होते. एका ज्युनिअर आणि भाजपप्रेमी पत्रकाराने विचारले की, “तुमचे नातेवाईक पक्ष सोडून जाताहेत?” तेव्हा फक्त पवारसाहेबांचा राग अनावर झाला. ते म्हणाले, “नातेवाइकांचा काय संबंध? राजकीय माणसं पक्ष सोडून गेली, त्याबद्दल प्रश्न विचारा”. पण यावेळीही त्यांनी सुसंस्कृतता न सोडता प्रश्नांची उत्तरं नीट दिली. २०१४ पासून २०२० च्या सुरुवातीपर्यंत एकाही पत्रकाराच्या प्रश्नाला एकही उत्तर न देणाऱ्या उठवळ अशा भाजपप्रणित फॅसिस्ट राजवटीत हे किती महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला कोणताही ‘सेन्सिबल’ पत्रकार किंवा लेखकच सांगू शकेल. जनतेला आपले मार्ग पटोत न पटोत पण आपण जनतेला उत्तरदायी आहोत, याचा विसर पवारसाहेबांना गेल्या ५० वर्षांत कधीही पडलेला नाही. ‘खो-खो’पासून कबड्डी, कुस्ती, साहित्य, शास्त्र, मनोरंजन,
कला, सहकार, कृषी या सगळ्या क्षेत्रांमध्ये एकेक ग्रंथ लिहिता येईल एवढी भरीव कामगिरी पवारसाहेबांनी गेल्या ५० वर्षांत करून ठेवलेली आहे. या क्षेत्रातल्या छोट्या माणसांसाठीही त्यांनी अनेक संस्थादेखील उभारल्या. यात मी कुस्तीचा उल्लेख वेगळा केलेला नाही. (खरं तर कुस्तीमध्येही मग ती मॅटवरची असो किंवा मातीतली; पवारसाहेबांनी यासाठीही भरपूर मोठे योगदान दिलेले आहे.कुस्ती मातीतुन गादीवर त्यांनीच आणली.)शिवाय आत्ताच माजी मुख्यमंत्र्यांनी पवारसाहेबांना कुस्तीचे आव्हान दिल्यावर परिस्थिती काय झाली, हे आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे.
पवारसाहेबांची काम करण्याची पद्धत अतिशय गुंतागुंतीची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्याला प्रचंड बौद्धिक व्यायाम देणारी आहे. त्यांच्या भूमिकेचा आणि डावपेचांचा अंदाज सहजासहजी कोणाला येत नाही. अगदी त्यांचे गुरू माननीय यशवंतरावजी चव्हाण ते काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यापर्यंत सर्वांना त्यांच्या डावपेचांचा अंदाज कधीच आलेला नाही. परंतु, याचा अर्थ त्यांच्यासोबत काम करण्याची मजा कमी होते, असा नाही. किंबहुना केंद्र सरकारमध्ये स्थापित असलेल्या फॅसिस्ट राजवटीविरूद्ध लढण्याची वेळ आली, तेव्हा संपूर्ण देशात ती लढाई फक्त पवारसाहेबांच्या या गुंतागुंतीच्या बौद्धिक व्यायामाच्या पद्धतीनेच महाराष्ट्रात यशस्वी करणं सोपं झालं.
शरद पवारांचे डावपेच हे अनेक तुकड्यांत विखुरलेले असतात. ते एका तुकड्याचा दुसऱ्या तुकड्याशी शेवटपर्यंत संबंध येऊ देत नाहीत. स्वतंत्रपणे त्या सर्व तुकड्यांची कामं पूर्ण झाली की, हळूहळू मन लावून त्यांची जुळणी ते स्वतः करतात. ही जुळणी कशी करायची, कधी करायची हे त्यांनी आधीच ठरवलेलं असतं, पण सोबत बसलेल्या माणसाच्याही ते अजिबात लक्षात येत नाही. राजकारणातले अर्धे लोक त्यांच्यासोबत काम करताना थकून जातात, उरलेले अर्धे विस्मयचकीत होतात. हा खेळ पवारसाहेबांना अतिशय आवडतो.तो ते संयमाने आणि चिकाटीने खेळतात. वयाच्या ३० व्या वर्षापासून ते वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत पन्नास वर्षे अव्याहतपणे ते हा खेळ खेळत आलेले आहेत.परत फक्त राजकारणातच पवारसाहेब हा खेळ खेळतात असे नव्हे, तर त्यांनी ज्या-ज्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला त्या त्या क्षेत्रात त्यांनी या प्रकारेच मार्गक्रमणा केलेली आहे. क्रिकेट, खो-खो, कबड्डी, कुस्ती असे खेळच काय, तर साहित्यिकांचे वेगवेगळे गट असो, सहकार क्षेत्र असो, कृषी क्षेत्र असो किंवा माणसाला शहाणं करून सोडणारं कोणतंही क्षेत्र असो पवारसाहेबांनी बौद्धिक व्यायामाच्या जोरावर त्या-त्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला नाही असं कधीच झालं नाही.तरीही पवारसाहेबांना सत्तेच्या राजकारणात अत्याधिक रुची आहे हे मान्य करावंच लागेल,आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सत्तेपर्यंत पोहोचताना जो प्रवास आहे मग ते क्षेत्र कोणतंही असो; त्यात पवारसाहेब आपली ही बौद्धिक व्यायामाची पद्धत नेहमीच वापरताना दिसतात. एक उदाहरण म्हणून क्रिकेटच्या क्षेत्रामधील त्यांची वाटचाल आपण काढून पाहा. तुम्हाला वर मी जे म्हणतोय, त्याचा प्रत्यय नक्की येईल.
आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ‘राष्ट्रवादी काँग्रेस संपली’, ‘पवार पॅटर्न बाद झाला’ यावर अनेकांनी विश्वास ठेवलेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांचा पक्ष अर्ध्याहून जास्त फोडून भाजपाने स्वतःच्या पक्षात विलीन केला होता. तरीही पवारसाहेबांनी आपल्या चित्ताची शांती ढळू दिली नाही. ईडीसारख्या एजन्सीपासून भर पावसापर्यंत ते लढत राहिले. एवढंच नव्हे, तर आपल्या लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी लढण्याची प्रेरणा दिली. परिणामतः राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभी राहिली. शून्यात जाऊन परत उभं राहण्याची पवारसाहेबांची ही पहिलीच वेळ अजिबात नव्हे. पन्नास वर्षांच्या राजकारणात अनेक वेळा त्यांना शून्यात जावं लागलं आणि तरीही ते जिद्दीने पुन्हा उभे राहिले. एवढंच नाही, तर त्यांनी शत्रूंना आडवे केले. विरोधकांना मित्र बनवून पंखाखाली घेतले.ते स्वतः गुणी आहेतच शिवाय (विरोधकांचे पण) गुणग्राहक आहेत.
आयुष्यात संघर्षात गुण दाखवण्याची वेळ त्यांच्यावर अनेकदा आलीय. पहिल्यांदा काँग्रेस सोडून समाजवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा, परत समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन केली तेव्हा, परत काँग्रेस मोडून राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली तेव्हा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस उभी केल्यावर परत काँग्रेसशी युती केली तेव्हाही पवारसाहेबांनी प्रचंड मोठी जोखीम घेतली होती. आपल्या कारकिर्दीत अशा प्रकारे अनेकदा त्यांनी प्रचंड जोखीम पत्करून शून्यातून सारं काही उभं केलेलं आहे. केवळ राजकारणच नव्हे, तर पवारसाहेबांना जेव्हा कॅन्सर झाला आणि संपूर्ण तोंडाचा आणि जिभेचा एक भाग आतून वेगळा करावा लागला तेव्हा प्रचंड वेदनेत असतानाआणि तोंडात रक्ताळलेल्या जखमा घेऊन पवारसाहेबांनी निवडणुकीचा प्रचार केला होता. शेकडो भाषणं केलीत.तेव्हाही त्यांच्या विरोधकांना आणि शत्रूंना असं वाटलं होतं, की पवारसाहेबांवर या आजारामुळे नि सर्जरीमुळे खूप मर्यादा येतील. परंतु पवारसाहेब कायमच ‘On My Terms’ म्हणत लढत राहिले. नुसते लढत राहिले नाही, तर त्यांनी या लढाईत पुन्हापुन्हा विजयही मिळवलेला आहे. पवारसाहेबांना असाधरण स्मरणशक्तीची देणगी लाभलेली आहे. ते आयुष्यात काहीच विसरत नाही, सन्मान असो किंवा अपमानही! ते क्वचित सूडही घेतात. तो ही उंदीर-मांजर पद्धतीने..
पवारसाहेबांनी जर मी काही विसरलो असं सांगितलं, तर असं निश्चित समजा की तो त्यांचा राजकीय डाव आहे. पवारांच्या बौद्धिक व्यायामाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ते विसरण्याचा अभिनय करू शकतात, पण ते विसरूच शकत नाहीत. कारण त्यांना विसरण्याची देणगीच नियतीने दिलेली नाही.
गेल्या पन्नास वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत पवारसाहेब सत्तेबरोबर राहिले. सत्तेबरोबर राहण्याचा त्यांचा मार्ग हा त्यांचे गुरू माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गापासून फारकत घेणारा होता, असा आरोप बरेचजण त्यांच्यावर करतात. ते सत्यही आहेच.परंतु आता मागे वळून पाहताना वाटतं, की यशवंतराव चव्हाणांचा अखेरचा काळ जेव्हा पवारसाहेबांनी पाहिला तेव्हा त्यांना त्या प्रकारचं मृदू राजकारण भविष्यकाळात टिकणार नाही, याची जाणीव झाली असावी आणि म्हणूनच पवारसाहेबांनी राजकारण करण्याची आपली स्वतंत्र पद्धत व शैली विकसित केली. कल्पना करा, यशवंतराव चव्हाणांच्या मार्गाने आत्ता त्यांना मोदी आणि शहांसारख्या कोणत्याही प्रकारच्या शालिनतेचा स्पर्श न झालेल्या लोकांवर विजय मिळवता आला असता का? महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हयात असताना बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाची आणि पवारांच्या राजकारणाची एक स्पर्धा होती, विशेषतः १९९० सालापासून. बाळासाहेब ठाकरेंचा काही विशिष्ट कारणांमुळे (ज्याविषयी मी अन्यत्र अनेकदा लिहिलेलं आहे.) प्रचंड करिष्मा होता. परंतु पवारसाहेबांच्या राजकारणापुढे त्यांच्या राजकारणाचा कधीच पाड लागला नाही. ठाकरेंचं राजकारण हे पवारसाहेबांनी कायमच स्वतः अंकित करून ठेवलं होतं. याचा अर्थ त्यांची आणि ठाकरे यांची मैत्री नव्हती असंही नाही किंवा त्यांना ठाकरेंबद्दल प्रेम नव्हतं असंही नाही. परंतु पवारसाहेबांची ही मजबुरी आहे, की त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत राजकरण मध्ये घेतल्याशिवाय ते छानपैकी मैत्री एन्जॉय करू शकत नाहीत. याला अपवाद, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंचा आणि त्यांच्या नातवंडांचा असावा. महाराष्ट्रामध्ये राजकारणाची एक पातळी आहे, राजकारणाचा एक दर्जा आहे. महाराष्ट्रात गेली पाच वर्षं वगळता कधीही सूडाचं राजकारण केलं गेलं नाही. याचं कारणही पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातला सुसंस्कृतपणा आहे. कारण पवारसाहेब हे गेली पन्नास वर्षं, निदान चाळीस वर्षं महाराष्ट्रातल्या राजकीय नेतृत्वाचे ‘लघुत्तम साधारण विभाजक’ आहेत. जर त्यांनी ठरवलं असतं, तर महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृत आणि सभ्यपणा ते गुजरात प्रमाणे नष्ट करू शकले असते. परंतु ठरवून पवारसाहेबांनी तो सुसंस्कृतपणा नष्ट होऊ दिला नाही. हेही पवारसाहेबांचे त्यांनी या राज्यावर केलेले उपकारच आहेत.
इतर कोणत्याही मोठ्या माणसाप्रमाणे पवारसाहेबांना त्यांची स्तुती आवडते आणि निंदा आवडत नाही. त्यांच्यावर टीका केली तर ते रागावतात, बऱ्याचदा संवाद बंदच करतात. पण लगेच हातात सत्ता आहे म्हणून त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांच्या, त्यांच्याविरूद्ध बोलणाऱ्यांच्या, त्यांच्याविरूद्ध लिहिणाऱ्यांच्या घरी कधीही पोलीस, इन्कम टॅक्स,ईडी किंवा सीबीआय पाठवत नाहीत. पवारसाहेबांच्या हातात सत्ता असताना किंवा ते तरुण असतानाही अशा संस्थांचा आपल्या विरोधकांना दबवण्याकरिता (क्वचित एखादा दुसराअपवाद वगळता) त्यांनी वापर केल्याचं मला आठवत नाही. विरोधकाला आपल्याबरोबर घेण्याची हातोटी आणि विरोध पचवण्याची ताकद हे पवारांचे असाधारण गुण आहेत. त्यांच्यावर लोकांनी जगभरचे आरोप लावले. अनेक प्रकारच्या माफियांशी त्यांचे संबंध आहेत असंही लिहीले आणि बोलले गेले. परंतु ते लिहीणारी आणि बोलणारी सर्व माणसं आजही हयात आहेत आणि उत्तम जगताहेत, मॉर्निंग वॉकला जात आहेत.पवारांकडे प्रचंड सत्ता असतानाही. पवारांनी अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं. वेळ पडली तेव्हा उत्तरं दिली आणि संधी आली तर त्यांना पंखाखालीही घेतलं.
एकेकाळी म्हणजे ७० च्या दशकापासून ते २००० पर्यंत म्हणजे साधारण ३० वर्षं शिवसेनेच्या ‘मारो-काटो’च्या राजकारणाचा मुंबईवर फार मोठा प्रभाव होता. त्या राजकारणामुळे एका मोठ्या गटाचे बाळासाहेब ठाकरे हे राजकीय स्टाईल स्टेटमेंट बनले होते. परंतु या गोष्टीचा पवारसाहेबांच्या राजकारणावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी मुळचे काँग्रेसी पद्धतीचे राजकारण महाराष्ट्रात रूजवले आणि पुढे नेले. उजव्या शक्तींचे फॅसिस्ट राजकारण ज्यामध्ये साहित्य, कला, शास्त्र आणि विज्ञान याला काहीही महत्त्व नाही. त्याच्या विरोधात पवारांनी या साऱ्या क्षेत्रांमध्ये ५० वर्षांच्या काळात भरीव योगदान दिलेलं आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून ते महाराष्ट्रात स्त्रियांना राजकारणात आरक्षण मिळण्यापर्यंत सर्व बाबींमध्ये पवारांनी स्वतःच्या सत्तेचा वापर करून भरीव योगदान दिलेलं आहे. राज्य महिला आयोग स्थापना,स्थानिक स्वराज्य
संस्थात स्त्रियांना 50% आरक्षण, जमीन,घर खरेदी विक्रीत पत्नीचे नाव लावण्याचा निर्णय असे असंख्य पुरोगामी निर्णय पवारसाहेबांच्या नावावर आहेत.
वेगवेगळ्या काळामध्ये तत्कालिक घटनांच्या अनुषंगाने पवारांच्या नेतृत्वावर अनेक प्रकारची टीका केली गेली. परंतु त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीचं सिंहावलोकन केलं, तर शरद पवार हे निखळ पुरोगामी नेते आहेत, हेच लक्षात येतं. असं असतानाही आजवर पवारसाहेब भारताचे पंतप्रधान होऊ शकलेले नाहीत. याचं मुख्य कारण महाराष्ट्र एकदिलाने पवारसाहेबांच्या पाठीशी उभा राहिला नाही, हेच आहे. या व्यतिरिक्त काँग्रेसचं अंतर्गत राजकारण आणि पवारसाहेबांना काँग्रेसच्या तत्वज्ञानाबद्दल असलेलं आकर्षण (जे योग्यच आहे.) आणि शिवसेनेच्या वेगळ्याच आंदोलनाचा महाराष्ट्रात झालेला उदय. या सर्व गोष्टी पवारसाहेबांच्या पंतप्रधानपदाच्या मार्गातील वेळोवेळी अडचणी ठरल्या. काँग्रेस च्या हातापलीकडे पवारसाहेब पोहोचले. पण त्या हातापासून देश मुक्त होऊ नये यासाठी त्यांनी स्वतःचा हात कित्येकदा दूर ठेवला.पवारसाहेबांमध्येअसाधारण गुणवत्ता असूनही भारतातले फार थोडे नेते असे असतील,जे पवारांवर विश्वास ठेवतात. याचं मुख्य कारण हे त्यांची कमी विश्वासार्हता हे नसून पवारांची बौद्धिक व्यायाम देण्याची पद्धत न झेपणे हे ही आहेच. परंतु अशा अनेक कारणामुळे पवारसाहेब पंतप्रधानपदापासून दूर राहिलेत.खरं तर हे ही पूर्ण सत्य नाही. कारण तसं असेल तर जेव्हा मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्यावर भारतातले किती नेते विश्वास ठेवत होते? राजकीय वर्तुळामध्ये पवारांची विश्वासार्हता तर मोदींपेक्षा कायमच जास्त होती, परंतु मोदींच्या मागे गुजराती समाज एकदिलाने उभा राहिला. मोदींनी एक नकारात्मक चळवळ उभी करण्याची आणि स्वतःला पंतप्रधानपद मिळवण्याकरिता देशाला त्रासात लोटण्याची तयारी दाखवली, आणि ती अमलातही आणली. पवारसाहेबांनी तसं काही केलं नाही. याचं कारण त्यांच्यावर झालेले काँग्रेसचे खोल संस्कार होते, ज्यामध्ये एकंदरीत जनतेचं हित हे व्यक्तिगत फायद्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे असं पवारसाहेब नेहमीच म्हणत आलेले आहेत.
महाराष्ट्राचं पुरोगामित्व, महाराष्ट्राची सुशिक्षितता आणि एकंदर मराठी संस्कृती ही झुंडी करून किंवा कळपाकडे जाण्याची नाही. समाजसुधारकांची एक मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना आपला माणूस पंतप्रधान व्हावा, यापेक्षा देशातल्या जास्तीत जास्त लोकांचं भलं कसं होईल, याची अधिक चिंता असते. याउलट गुजरात किंवा उत्तर प्रदेशचं राजकारण आहे. पवारसाहेबांना महाराष्ट्र लाभलेला असल्यामुळे त्यांचं पंतप्रधानपद आजवर तरी दुरापास्त होतं. आता मोट बांधण्यात वाकबगार असलेले पवारसाहेब अजूनही जर मोट बांधू शकतील, तर पंतप्रधान होऊ शकतील. कारण राजकारणात उशीरा आणि लवकर असं काही नसतं. इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खोमोनी ८० व्या वर्षी फ्रान्समधून परागंदा अवस्थेतून इराणला परत आले आणि इराणचे सर्वोच्च नेते बनले, आणि ९० व्या वर्षापर्यंत त्यांनी इराणवर राज्य केलं. त्यामुळे राजकारणात अशक्य काहीच नसते आणि ८० हे वय अजिबात जास्त नाही.
पवारसाहेब आत्ता आयुष्याच्या त्या टप्प्यावर उभे आहेत, जिथे ते काका, बाबा, आजोबा आणि नेते या चारही भूमिका एकाच वेळी वठवताहेत. ते स्वतःच आताच प्रचारात म्हणाले होते की, “मी काय म्हातारा आहे का? अजून बऱ्याच लोकांना घरी बसवायचं आहे.” तर त्याचं उत्तर ‘नाही ‘ असं आहे. त्या उत्तराला जोडून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना इतिहासाचं एक आव्हान स्वीकारायची मी विनंती करतो. पवारसाहेब, तुम्ही अजिबात म्हातारे झालेले नाहीत. घरी बसवायचा मुद्दाच असेल, तर लोकशाही भारत देशातल्या फॅसिस्ट नेतृत्वाला घरी बसवणं ही काळाची गरज आहे. तेवढं हे एक देशाचं आवाहन मान्य करा, आणि नेतृत्व म्हणून हे इतिहासाचं आव्हान स्वीकारा. ह्या फॅसिस्ट नेत्यांना महाराष्ट्राप्रमाणे भारतात आपण जर घरी बसवलंत तर आज जितका महाराष्ट्राचा इतिहास आपला ऋणी आहे, तितकाच भारताचा इतिहास आपला ऋणी होईल.
तेवढं एक देशातल्या फॅसिझमला वणक्कम कराच!
तेव्हढा एक पवारांचा हात आज देशाला मिळू द्या!
आपल्या वयाच्या दिमाखदार शतकाच्या वेळी मग मी पुस्तकच लिहीन.
– राजू परूळेकर
raju.parulekar@gmail.com
१२ डिसेंबर २०१९
सर,
प्रतीक्षा केली आणि सार्थक झालं..
अप्रतिम…
Lekh ekdm best hota,pn sahebanche aatil kahi kisse ale aste tr ajun maja ali asti.deshach net
Very nice
सद्य घडीला लेख छानच आहे .पण पवार साहेब पंत प्रधान होऊ न शकलेचे कारण आम महाराष्ट्र जनतेच्या माथ्यावर फोडणे योग्य नाही . राष्ट्रीय उच्च स्तरावर काम करत असताना गावच्या ग्राम पंचायत निवडणूकीत लक्ष घालण्याची त्यांची सवय माणसे तोडत गेली .
अप्रतिम लेख.. शेवटचा पॕरेग्राफ अत्यंत उत्कृष्ट
Great Speech. 10 out of 10..
Fast sumaar lekh jhala aahe. Apeksha mothya hotya tumchya kadun.
खूपच छान न सविस्तर वर्णन आपण मांडलं न वास्तव समोर आले हार्दिक शुभेच्छा असेच लेख तुमच्या हातून लिहीत राहावं अशी पांडुरंग चरणी प्रार्थना
खूपच मस्त लेख…👌👍
इतक्याश्या शब्दांत साहेबांचा प्रवास बसवणं अशक्यच आहे पण राजू , hats off ! फारच सुंदर मीमांसा आणि मनोगत पण 🤘👌
Superb…..👌👌👌
लेख प्रकाराच्या आवाक्यात राहून खूपच समग्र लिहीता त्याप्रमाणेच हा लेख थेट आणि संपूर्ण झाला आहे. तथाकथित फॅसिस्ट शक्तींचं बुजगावणं करुन त्यावर आपलं साम्राज्य कसं उभं करायचं याचा त्यांनी नुकताच घालून दिलेला धडा त्यांच्या नक्षेकदम वर चालू इच्छिणाऱ्या राजकारण्यांना उद्बोधक ठरावा.
बौद्धिक व्यायाम देणारं राजकारण हे पवारांचं मर्मस्थान. ते करणं पुढच्या राजकारण्यांपैकी कुणाला झेपेल? झटपट आणि गुन्हेगारी कडे वळलेल्या राजकारणी प्रवाहात त्याची काही जागा उरेल?
तुम्ही नुकतंच एका नेत्याबद्दल लिहिलंय. पवारांसारखा न्हवे पण लोकशाही पद्धतीने आघाड्या बांधून नको त्या शक्तींना खीळ घालणं कुणाला झेपेल? असे काही प्रश्नं आता मनात सुरु झाले आहेत.. 😊
खूप छान सर ,तरुण पिडि ला पवार साहेब हे चलते बोलते विद्यापीठ स्मजवुन्ं सान्गीत्लया बदल
Well done sir ,thanks for introducing pawar saheb in a simple and accurate way
👌👌👌
मस्त लिहिलंय परुळेकर साहेब…
Much impressesd by PawarSaheb after this elections and got inspired to read more about him.
Was already in search of such article and got this one.
I hope PawarSaheb will accept the challenge, that would be so fantastic to see how he handles Modi and Shah face to face.
I’ve also read your article on Mr Sanjay Raut and got to know other side of him through you.
Thanks for sharing your views.
जबरदस्त…. व्यक्तिविशेष लेखन अप्रतिम
भारी. लेखाचा शेवट तर सुंदरच!👍
आवर्जून वाचावा असा सुंदर लेख !
अप्रतिम लिखाण थँक्यू साहेब आम्हाला पवार साहेब समजून सांगितल्या बद्दल मी आपला आभारी आहे अशा लिखाणाची आणि वाचनाची माणसाच्या तरुणाला नितांत गरज आहे.