खरा तो एकची


काणे गुरुजी वर्गात मन लावून गात होते…
“खरा तो एकची धर्म…”
अचानक बाळु गोखले उठला आणि म्हणाला, “गुरुजी, हे गाणं यापुढे वर्गात चालणार नाही!”
काणे गुरुजी हबकले.त्या हबकल्या स्वरात ते म्हणाले, “बाळ,विद्यार्थ्यांनी असं बोलू नये!”

बाळु गोखलेच्या कानाच्या खालची शिर तडतडू लागली. तो बेंचवर चढून उभा राहिला अन बोलला,
“ए काण्या चूप! हे लिबटार्ड,सिक्युलर लोकांचं गाणं आहे!नोकरी प्यारी असेल तर ते गोली मार भेजेमें सुरू कर”

‘९वी ड’ चा वर्ग अचानक भयंकर तंग झाला. अचानक बाळु गोखले समर्थक मुलांनी “गोली मार”, “गोली मार” अशी नारेबाजी सुरू केली. बाकी मुलं आपापल्या बेंचखाली लपली.

काणे गुरुजींनी आपले प्रयत्न सोडले नाहीत…
“बाळु, तू चांगल्या घरचा मुलगा आहेस. आपण कुठून आलोय आणि काय करतोय याची तूझ्या कोमल मनाला टोचणी लागली पाहिजे… मला हे प्रकरण मुख्याध्यापकांपर्यंत न्यायचं नाहीये… सर्वजण गप्प बसा रे…”

मग बाळुनेच सर्व मुलांना गप्प बसण्याची खूण केली.
“काणे गुरुजी, भलत्याच भ्रमात वावरताय तुम्ही…मोठे गुरुजीपण आमच्याच विचारांचे आहेत!” बाळु एकदम विकट हसला. त्याच्या पाठीराख्या मुलांनी डिजिटल बाण काणे गुरुजींच्या दिशेने भिरकावले!

काणे गुरुजी भयंकर खिन्न झाले अन जाम घाबरलेपण…

इतक्यातच वर्गात मुख्याध्यापक
श्री.देव गुरुजींचे आगमन झाले. श्री.देव गुरुजींनी नजरेनेच वर्गातील स्थिती आकलन केली आणि गाऊ लागले,”गोली मार भेजे में…”बाळु गोखले नि त्याच्या समर्थक मुलांनी दप्तरातले कट्टे काढले.हवेत बार काढत त्यांनी श्री.देव यांना संगीत दिले.

बेंचखाली लपलेली मुलं अंग चोरून अजूनच आत गेली.

अशा रीतीने काणे गुरुजींची नोकरी गेली. ते पवन मिश्रा यांच्या गोठ्यात गाईची देखभाल व दुध काढण्याचे काम करतात.

बेंचखाली लपलेल्या मुलांच्या बॉड्या त्यांच्या आईवडिलांकडे न पाठवता डायरेक्ट त्यांच्या गावाला पाठवण्यात आल्या!

About Raju Parulekar

I am original, everything else is copied.
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a comment