सांगली इंडियन मेडिकल असोसिएशन येथे घेतलेली माझी मुलाखत !!!

Posted in Uncategorized | Leave a comment

माझी जात

​लेखकाला दुःखाचे मळे पिकवता आले पाहिजेत. लेखणीच्या एका फटकाऱ्यात रक्ताचे सडे घालण्याचे सामर्थ्य त्याच्यात असायला हवे. आपल्या लेखनातून वाचकाना हसवताना त्यांच्या पोटातल्या दुखा:चं भान राखता आलं पाहिजे. कवितेची कळ त्याच्या बेंबित जायला हवी…तिथुन वाचकाच्या नसेत..

“जगात सर्वांचं सुख सारखंच असतं, पण प्रत्येकाच्या दुःखाची जातकुळी वेगळी असते” असं टॉलस्टॉय म्हणाला होताच. 

हेमिंग्वे ” खरा लेखक हा कधीही सुखी होत नाही” म्हणाला ते त्यामुळेच…

हातात पेन असो, ब्रश असो वा पियानोची बटणं असोत ती या दुःखाच्या रसात वाजुन वाजुन झिजत जायला हवीत….

नाहीतर साक्षर खुप आहेत! ते लिहितात,छापतात, छापुन आणतात, कॅन्हवासवर रंग फासून त्याला चित्र म्हणुन खपवतात…

जगण्याचं उद्दिष्ट संपलं की खरा लेखक , कवि,चित्रकार, पियानिस्ट मरून जातो…

फक्त साक्षरच असतो तो फक्त  जिवंतच रहातो…

अमर होणं हे मेल्यावर सिद्ध होतं. आधी नाही.

बाकी उरतं ते आतलं जनावर…

Posted in Uncategorized | Leave a comment

‘जी.ए’ नवसाला पावतात की…

wp-1468143324306.jpg

“युधिष्ठीर एवढा  मृदु होता कि दुर्योधनाला तो सुयोधन म्हणत असे. आजच्या काळात जर तो असता तर त्याने Badminton ला Goodminton म्हंटले असते”, अश्या काहीशा वाक्यांची संततधार आणि त्यातून निर्माण होणारा, तत्वज्ञान सांगणारा, अभिजात विनोद, जी. ए. कुलकर्णींच्या ‘माणसे अरभाट आणि चिल्लर’ ह्या पुस्तकात मी जेव्हा वाचला तेव्हा मला मराठीमध्ये फक्त कोटीबाज विनोदच होतात असे नाही ह्याचं खरं  समाधान मला लाभलं.

GA

 

जी. ए नी आयुष्यावर गारुड केल्याचा एक मोठा काळ त्यांच्या चाहत्यांच्या आयुष्यात येतोच. 

‘सांजशकुन’, ‘काजळमाया’, ‘रमलखुणा’, ‘हिरवे रावे’, ‘रक्तचन्दन’, ‘कुसुमगुंजा’, ‘इस्किलार’ ह्या आणि अश्या इतर पुस्तकातून जी. ए नी मला नियती, आयुष्यातील अपरिहार्यता, जगण्यातली निरर्थकता आणि तत्वज्ञाचा विराटपणा ह्याचं भान  त्यांच्या लेखनातून दिलं.

rakt

व्यक्तिगत आयुष्यात जी.ए कुलकर्णी हे महान लेखक असले तरी ते एखाद्या बंद कुलपा सारखे होते. त्यावर स्वतंत्रपणे वाचण्यासारखं एक गोड पुस्तक जी. एं च्या मठाच्या आतपर्यंत पोहचू शकणाऱ्या, फार थोड्यांपैकी एक असलेल्या चित्रकार सुभाष अवचट ह्यांनी लिहिलेलं आहे. जी.ए हे जेवढ गूढ लिहित असत ते तेवढच स्वत: गूढ जगत असत. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटना आपल्याला स्तिमित करून सोडतात.

hirave
ते एखाद्या अंधाऱ्या गुहेतून थोडे, थोडे समजत आहेत अस वाटत राहतं. ते थोडं थोडं समजण हे शक्य झालं ते विदुषी सुनिता देशपांडे ह्यांच्याशी झालेला त्यांचा पत्रव्यवहार आणि सुभाष अवचट ह्यांनी लिहिलेले पुस्तक आणि आपल्यापर्यंत  पोहचवलेली माहिती नि असंच आणखी काही…

खर तर वैयक्तिक आयुष्यात जी. ए अतिशय साधे होते.

धारवाडमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्यापलीकडे ते फक्त कला व लेखन प्रपंच करत असत. त्यांना चिकटू पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या हाताला ते लागत नसत. त्यांना माणसांची घृणा आहे कि काय असं वाटावं इतके ते एकलकोंडे, एकांतप्रिय आणि गूढ जगत असत.

त्यांच्या जीवनाचा त्यांच्या लेखनावर खोल ठसा उमटलेला कायम जाणवत राहतो. पाश्चात्य व पौरात्य तत्वज्ञान, इंग्रजी भाषा, चित्रकला, अंतरराष्ट्रीय वाङ्गमय आणि ह्या साऱ्या पलीकडे असलेली आयुष्याची निरर्थकता ह्या साऱ्यात त्यांनी अटलांटिक समुद्राच्या तळाएवढी खोली गाठली होती.

सुनिताबाईंना त्यांनी लिहिलेली पत्र ज्या ओघवत्या शैली मध्ये ते लिहितात आणि ज्या सहजपणे वैश्विक साहित्य, शास्त्र, कला, तत्वज्ञान आणि अभिजातपणा ह्याचा ओघवता प्रवाह मांडतात ते आपल्याला थक्क करून सोडतं.

kajalmaya

‘काजळमाया’ ह्या त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे त्यांनी स्वत: केलेलं पेंटिंग होत. पण हे खरं कि खोट ह्याचं गूढ त्यांनी कायम ठेवलं.

नोबेल पारितोषिक विजेता विल्यम गोल्डिंग ह्याचं पुस्तक ‘Lord of the flies’ ह्या नोबेल विजेत्या पुस्तकांचं मराठी भाषांतर जी.ए कुलकर्णी ह्यांनी केलंय.

Lord
त्याच्या प्रकाशनाला खुद्द विल्यम गोल्डिंग उपस्थित होते, पण जी. ए. मात्र उपस्थित राहिले नाहीत.

William-Golding-001

जणू काही भाषांतर झाल्यानंतर त्यांचं काम लेखक आणि माणूस म्हणून संपल अस त्यांनी दाखवून दिलं. 

त्यांच्या लेखनाला राष्टीय पुरस्कार मिळाल्याची आनंददायी घटना, त्यांनी त्यांच्या त्या पुरस्कारबद्दल, हल्ली फेसबुक वर येतात तश्याच एका अडाणी, नकारात्मक प्रतिक्रियेमुळे तत्काळ पुरस्कार परत करून ‘साजरी’ केली.
अश्या एक ना अनेक गोष्टी!

kusum

 

पण एक हळवे जी.ए. पण होते.
त्यांची बहीण नंदाताई आणि भाच्या ह्यांच्यावर त्यांचा अपार जीव होता.
हा हळवा कोपरा त्यांच्या पुस्तकाच्या पहिल्या पानांमधून हळूच डोकावतो…

पूर्वआयुष्यातल्या अनुभवांनी माणूस एवढा झपाटून जातो, आयुष्याचा तळ शोधून काढतो आणि समृद्धपणे हे लिहून ठेवतो जे आपोआप नंतर वाचकांपर्यंत पोहचत. हे एका महालेखकाच उदाहरण आहे. कदाचित अर्नेस्ट हेमिंग्वे सारखं…

पोरसवद्या वयात म्हणजे शाळेत असताना मी जी.ए. यांचा ‘सांजशकुन’ हा कथासंग्रह प्रथम वाचला आणि मग झपाटून गेलो.

sanjshakun-400x400-imada4zpgzvfnwvf

मग जी.ए. नि जे जे लिहिलं ते वाचत गेलो.

त्यांचा ‘इस्किलार’ वाचताना ‘इस्किलार अल सेरिपी एली’ हा मंत्र म्हंटल्यावर जी.ए प्रगट होतात असे बरेच काळ मला वाटत राह्यचं.

आयुष्य ही एक संधी नसून आपला जन्म हे एक आपल्यावर केलेलं कोणीतरी चेटूक आहे हे ‘रमलखुणा’ वाचल्यावर मला वाटत राहिलं. किंबहुना आजही मला तेच वाटत….

ramal

माझ्या आयुष्यात एक काळ असा आला कि जी.ए. यांच्या  अनेक कथा वाचून वाचून मला मुखोद्गत झाल्या. जी.एं च्या ख़ास अस्तित्ववादी शैलीत मी न्ह्याऊन निघालो.

त्या काळात मला पोच नव्हती, आत्मविश्वास नव्हता, मला जी.एं पर्यंत प्रत्यक्ष पोहचून भेटण्याचा मार्ग माहित नव्हता आणि माझं वयही नव्हत.
मला असं वाटायचं कि जी.एं सारखं लिहिता आलं पाहिजे.

 मला माझा मी सापडत नव्हतो तेव्हा जी.एं नी आपल्या लेखनाच्या निर्विकार आणि निर्विकल्प समाधी मध्ये मला खेचून घेतलं, यथेच्छ बुडवलं. 

मराठीतल्या अनेक महालेखकांना आणि महाकवींना त्यांनी आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये लेखन केलं असत तर त्यांना सर्व आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पारितोषिकं प्राप्त झाली असती. अश्यांमध्ये जी.ए. कुलकर्णी ह्याचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल.

जी.ए कुलकर्णी किंवा ह्यांच्या ताकदीचे लेखक किंवा ग्रेस ह्यांच्या सारखे कवी ह्यांचे इंग्रजी भाषेवर असाधारण प्रभुत्व होते तरीही आईच्या दुधाला जागून त्यांनी मराठीत लिहिलं.
आणि आपणा सर्वाना त्यांनी उपकाराच्या ओझ्याखाली ठेवलं! 

जी.ए. अखेरच्या आजारपणामध्ये सुद्धा कुणालाही न कळवता इस्पितळात दाखल झाले.
अर्थात सुनिताबाई आणि पु.ल. देशपांडे ह्यांना ह्याचा पत्ता लागला आणि त्यांनी त्यांच्या नात्यातली स्नेह आणि प्रेम वापरण्याचा प्रयत्न केला पण त्याही वेळी जी. एं. नी आपला संकोच व स्वत:बद्दलची आलिप्तता कायमच ठेवली.

अखेर जी.ए गेले…. 

ज्या दिवशी जी.ए गेले त्या दिवशी मी त्यांच्या पुस्तकातील पाठ असलेली पानं स्वत:शीच म्हणत राहिलो.

Graveyardमध्ये Funeral साठी आलेल्या Priest सारखा!

 नंतर मला अनेकदा अस वाटायचं कि आपण ‘इस्किलार अल सेरेपी एली’ म्हणावं आणि जी.ए. प्रगट होतील.

पण तसं काही झालं नाही. तस काही होत नाही हीच नियती असते असंच तर जी.ए. नी लिहून ठेवलं होतं न…

पण नियतीचा योगायोग म्हणजे २०१० मध्ये लेखक विलास साळुंखे यानी जी.ए कुलकर्णी ह्याचं ‘इस्किलार’ आणि इतर कथांच’  ‘A Journey Forever’ ह्या नावाने अप्रतिम भाषांतर केलं.

wp-1468143361692.jpg

प्रकाशकांनी Oxford मधील त्या पुस्तक प्रकाशन समारंभात Guest of honour म्हणून पुस्तक प्रकाशन करण्यासाठी आणि इस्किलार आणि इतर कथांवर बोलण्यासाठी मला आमंत्रित केलं.
हा निव्वळ व निव्वळ योगायोग होता…

wp-1468143350833.jpg

जी. एं च्या  इस्किलार’च्या इंग्रजी प्रकाशनाच्या वेळी Oxford मध्ये बोलताना माझ्या मनात राहून राहून एकच वाटत होत, 

‘अरेच्च्या जी.ए नवसाला पावतात की!’

जी. एं च्या ‘सांजशकुन’ ह्या कथा संग्रहात समुद्र नावाची कथा आहे.

त्यातील शेवटची ओळ माझ्या बाबतीत घडून आली.

              ‘समुद्र आता शांत आहे!’ 

जी.ए. ना माझं खूप खूप प्रेम आणि वाढदिवसाचा केक.    

            GAK          

raju.parulekar@gmail.com

Posted in Uncategorized | 2 Comments

माया

​मायेचा त्याग ही बोधकथा आहे.  हे ज्ञान अस्तित्वगत नाही. म्हणुन मुलभुत सत्यही नाही. कुणी सांगितलं की ही माया आहे म्हणून? कुणीतरी दुसऱ्याने ना? जन्मासोबत हे ज्ञान नव्हतं तुम्हाला!
महर्षि व्यासानी कृष्ण या नायकाच्या तोंडून सांगितलेल्या परस्परविरोधी बोधकथा म्हणजे गीता…. तो धर्मग्रंथ नव्हे. किंबहुना या जगात कुठेही, कुठचेही पुस्तक हे धर्मग्रंथ नाहीत.

आज कसे जगावे हे सांगायला कोणताही प्रेषित हा “नवनीत” गाइड लिहुन गेलेला नाही! तुमचे तुम्ही! भीती व असुरक्षितातेपोटी तुम्ही पुस्तक कुरवाळा, मंत्र म्हणा, नमाज पढ़ा,घंटा वाजवा, मासला जा किंवा बुवा-बाई गाठा.

सत्य हे आहे की तुम्हाला एकटेपणाच्या स्वातंत्र्याचे भय नि आतला अंधार जगु देतं नाही आहे!

Posted in Uncategorized | 3 Comments

कट

​कोणतीही योजनाबद्ध गोष्ट ही conspiracy (कट) असते.
आयुष्य योजनाबद्ध नसते.
ते तसे बनवण्याचा प्रयत्न आपण करतो.
त्यामागे भविष्याची चिंता, भिती व तजवीज असते.
तिथुनच आयुष्य हे एक कट (conspiracy) बनते.
आपण कटवाले( conspirators).
मग आपल्याला वर्तमानापेक्षा नॉस्टालजिया रम्य वाटतो.
हे भासमान जग असते.
ते परत कधीच येत नाही.
आपणही आयुष्य आयुष्यावर सोडून देतं नाही.
वर्तमान मग दुःखं देतं.
आपल्या conspiracies कधी छोट्या असतात,कधी मोठ्या.
कधी सकारात्मक वाटतात पण त्या निसर्गविरोधी असल्याने त्यातुन दुःखाचे विष झिरपत रहाते.
सुख ही एक कल्पना उरते.
पश्चाताप हा एक बिचारा उपाय असतो.
तो खोटा असतो कारण तो नपुंसक असतो.
तो कश्यालाच भिडत नाही.
आपण खोटे आहोत हे आपल्याला कळते.
मग आपण पुनर्रजन्माची वाट पाहतो.
तो नसतो.
एका कटाचा शेवट एका भ्रमात होतो.
आयुष्य तेव्हढे जगायचे राहुन जाते.
जे जगणे सर्वात सोपे असते.
Choice is yours…

Posted in Uncategorized | Leave a comment

स्वातंत्र्य व संघटन

​सर्व राजकीय व धार्मिक संघटना ढोंगी असतात…
फक्त मात्रा बदलते…
सर्व व्यक्ति ढोंगातुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतात…
असुरक्षितता व भय त्यांना थाबंवते…
हा संघर्ष आयुष्यभर चालु रहातो…
तो यशस्वी होत नाही…
ही शोकांतिका व्यक्तीच्या दुःखाचं मुळ कारण बनते..
मग व्यक्ति एक नायक शोधतात…
तो नायक त्यांच्यातच लपलेला/लपलेली असते…
भय व असुरक्षितता हे मान्य करू देतं नाहीत…
स्वतंत्र माणूस असा अनुयायी बनतो…
यावर उपाय नाही…
प्रेषिताना हा उपाय सापडला असावा असे मानले जात आहे…
परंतु हे ज्ञान परावर्तित होउच शकत नाही…
हा स्वतंत्र माणूस या कलेचा अंत असतो…
अज्ञान ही भूल देणारी नशा आहे…
तो उपाय केमोथेरेपी सारखा आहे…
Choice is not yours…

Posted in Uncategorized | Leave a comment

पु.ल. भक्त आणि वास्तवाची जाणीव…

पु.ल. भक्त आणि वास्तवाची जाणीव…
– राजू परूळेकर
……………………….
पु.ल. देशपांडे यांच्या भक्तांना मागच्या आठवड्यात पु.लं.च्या स्मरणार्थ मी लिहिलेलं एवढे बोचले की, त्यांनी फक्त माझा शारीरिक खून करण्याचे बाकी ठेवले. यात डॉक्टर होते, वकील होते, इंजिनिअर होते, संजय मोने यांच्यासारखे कलाकार होते. वास्तवामध्ये मला स्वतःला परत माझी पोस्ट वाचताना मी काय चुकीचे लिहिले होते हे कळले नाही. व्यक्तिश: पु.लं.विषयी व्यक्तिगत चुकीचे असे मी काही लिहिले नव्हते. त्यांच्या लेखनाविषयी ते कालबाह्य झाले आहे, हे मी लिहिले. त्यांची प्रवासवर्णने भूक्कड आणि कोटीबाज होती हे मी लिहिले. या मताशी आजही मी प्रामाणिक आहे. याव्यतिरिक्त पु.लं.नी आणीबाणी वगळता एकदाही टोकदार राजकीय, सामाजिक भूमिका घेतली नाही असं मी म्हटलं होतं. यात अक्षरशः काहीही असत्य नाही. ज्या काळात पु.लं.चा उदय झाला त्या काळात सरकार नियंत्रित आणि सरकार केंद्रित माध्यमे उपलब्ध होती. त्या काळात पु.लं.ना भारत सरकारने जवळजवळ वर्षभर बीबीसीमध्ये डेप्युटेशनवर पाठवले होते. भारत सरकारने दूरदर्शन सुरू केल्यावर पु.ल. देशपांडे हे पहिले होते ज्यांनी दूरदर्शनवर जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत घेतली. या गोष्टी सरकारच्या मर्जीत असल्याशिवाय होतात का? याच काळात पु.ल. पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी, फ्रांस वगेरे देशात फिरले. यावरून त्यांनी नंतर ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ वगैरे प्रवासवर्णने लिहिली आहेत. वास्तवामध्ये त्या काळात शीतयुद्ध सुरू होते. पूर्व युरोपात लेखक, कवी, विचारवंत, शास्त्रज्ञ यांचा अमानुष छळ सुरू होता. त्याचे पडसाद पश्चिम जर्मनी, फ्रान्स इथेही पडत होते. आता पूर्व युरोपात त्या छळ छावण्यांची museums झाली आहेत, मी स्वतः ती पाहिली आहेत. जिज्ञासू तिथे जाऊन पाहू शकतात. हंगेरीतील बुडापेस्ट येथील असेच एक museum मी जेव्हा पाहिले आणि त्याचे फोटो घेतले तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. तेव्हाच्या झेकोस्लावियामध्ये (आता झेक आणि स्लोवाकिया असे दोन स्वतंत्र देश झाले आहेत.) वाक्लाव हावेल आणि त्यांच्यासारखे इतर अनेक लेखक, कवी, विचारवंत लढत होते आणि शिक्षा भोगत होते. त्याच काळात ‘chapter 77’ नावाचा एक जाहीरनामा या सर्वांनी मिळून जाहीर केला. तो काळ होता १९७७ चा. जगाच्या पूर्वेकडे अशांतता, दडपशाहीविरुद्ध आंदोलन आणि अमानुषतेची परिसीमा कमी नव्हती. १९६३ पासून कंबोडियासारख्या देशात पॉल पॉट या communist हुकुमशहाने हाहाकार माजवला होता. त्याने लाखो माणसे मारून कवट्यांचा डोंगर उभा केला होता. हा खरा ‘पूर्वरंग’ होता, ज्याची ‘अपूर्वाई’ पु.लं.ना कधी वाटली नाही. कारण, या सर्व देशांशी भारत सरकारचे चांगले संबंध होते. त्यामुळे भारतातून जाणारे ‘लेखक’, ‘कवी’, ‘विचारवंत’ हे असेच निवडले जात जे गोड, सुखावह आणि भारतातील लोकांना आनंददायक असे जगाचे वर्णन करतील. अशा वेळेला पु.लं.सारख्या चतुरस्त्र लेखकाकडून खरे जाणण्याची अपेक्षा करायची नाही तर कुणाकडून करायची, असा माझा सवाल होता. मी रक्तबंबाळ हा शब्द त्या संदर्भात वापरला होता. अनेकांनी मला पु.लं.ची तुलना समकालीन ‘जिनिअस’ लेखक, कवी आणि विचारवंतांशी केली म्हणून दुषणे दिली आहेत. आता लेखकाची तुलना समकालीन लेखकांशी करायची नाही, तर काय समकालीन गवंडयांशी करायची?
खऱ्या लेखकाने प्रवासवर्णने लिहिताना तिथल्या मानवी दुःखाची बाजू प्रथम घ्यावी अशी अपेक्षा असते. आपल्या इथले सरकारच्या मेहरबानीने परदेशात जाणारे लेखक तिथला सरकारी पाहुणचार, ऑम्लेट, निसर्गसौंदर्य आणि सरकारी ओदार्य यांचे रसभरीत वर्णन करत असत. पु.ल. देशपांडे यांनी या वर्णनाला त्यांच्या उपजत हजरजबाबीपणाचा वापर करत विनोदाची जोड दिली. परंतु तो humour हा black humour नव्हता, ‘personal is political’ या तत्वाला नाकारणारा सर्वाना आवडेल असा टवाळखोर विनोद होता. पु.ल. यांनी लेखक म्हणून जगभरच्या आपल्या जातकुळीच्या सर्व लेखक, विचारवंतांशी केलेला हा बोटचेपेपणा होता.
पण त्यामुळे ९०च्या दशकात ऐतिहासिक सत्य जसजसे समोर आले तसतसे पु.ल.च्या प्रवास वर्णनातील भूक्कडपणा, बुद्धिमान कोटीबाजपणा आणि सरकारी कल मला जाणवला. मी तसे लिहीले. वर उल्लेख केलेले वाक्लाव हावेल यांना पुढे साहित्याचे नोबेल मिळाले. एवढेच नव्हे, तर झेक आणि स्लोवाकिया वेगवेगळे झाल्यावर ते झेक रिपब्लिकचे अध्यक्ष झाले. वाक्लाव हावेल यांच्यासारखे अनेक होते, पण त्यांचे एकच उदाहरण अशासाठी दिले की, त्यांच्या उदाहरणावरून या चळवळी बरोबर होत्या आणि नैतिकसुद्धा होत्या हे सगळ्यांना समजावे.
त्या काळात भारत सरकारच्या परवानगीशिवाय आणि मर्जीशिवाय लेखकांना असे फिरायला मिळत नसे. त्यामुळे इथल्या जनतेला बाहेरचे जग प्रतीकात्मक रुपात तरी पु.लं.सारख्या लेखकाकडून समजायला हवे होते अशी अपेक्षा मी केली तर त्यात काय चूक?
१९९६ मध्ये सेना-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (ठाकरेंनी नव्हे!) आणि पाच लाख रुपये परितोषिक म्हणून पु.लं. यांना प्रदान केले. पु.ल. नंतर एकदा भाषणात सहज म्हणून गेले की, गुंडही निवडूणुकीद्वारे सत्तेत येतात. हे एक ऐतिहासिक सत्य होते. मात्र ठाकरे यांनी याला व्यक्तिगत केले आणि ‘झक मारली’ आणि यांना ‘महाराष्ट्र भूषण’ केले असे उद्गार जाहीर सभेत काढले. बाळासाहेब ठाकरे यांच्या या विधानानंतर पु.ल. यांनी तो पुरस्कार त्याच्या रकमेसह परत करावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. कवी नारायण सुर्वे यांच्यापासून कवी वसंत बापट यांच्यासह (तेव्हा ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते) अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली. याउलट पु.लं.नी ना पुरस्कार परत केला ना बाळासाहेब ठाकरेंवर कोणतीही टीकेची प्रतिक्रीया दिली वा नापसंती व्यक्त केली. वास्तविक पु.ल. यांच्या दातृत्वाने मी स्वतः प्रभावित आहे, ज्याबद्दल मी माझ्या मूळ पोस्टमध्ये कृतज्ञताही व्यक्त केली आहे. पु.ल. देशपांडे यांचं स्थान महाराष्ट्राच्या मनात युती सरकार आणि ‘महाराष्ट्र भूषण’पेक्षा कितीतरी जास्त वरचं होतं. त्यांच्या एका कृतीने किंवा प्रतिक्रियेने समाजात वैचारिक चैतन्य पसरू शकले असते जे त्यांनी केले नाही. उलट, त्यांनंतर काही काळाने सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पुण्याच्या घरी जाऊन भेटले असता दोघांची अगदी सोहार्दपूर्ण, प्रेमळ गुरुशिष्य (बाळासाहेब ठाकरे यांच्या शैक्षणिक जीवनात पु.ल. देशपांडे त्यांचे गुरू होते) भेट झाली. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य! याला बोटचेपेपणा म्हणत नाहीत तर दुसरा शब्द सुचवा.
राहिला मुद्दा पु.लंचा विनोद कालबाह्य झाल्याचा. जागतिक कीर्तीचे प्रख्यात लेखक, कवी आणि विचारवंत दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी हेच मुद्दे वस्तुनिष्ठपणे आपल्या एका प्रदीर्घ लेखातून मांडले आहेत. त्यांची पुनरोक्ती मी टाळतो. माझी पोस्ट वाचून मेघनाद कुलकर्णी यांनी या गोष्टीची मला आठवण करून दिली. आठवण अशासाठी की, दिलीप चित्रे यांचे वडील पुरुषोत्तम चित्रे ‘अभिरुची’ हा अंक काढत असत. पु.लंनी आपल्या लेखनाची सुरुवात जिथून केली त्यात ‘अभिरुची’चे नाव अग्रक्रमाने येते. पु.लंच्या विनोदावरील दिलीप चित्रे यांचा हा वस्तुनिष्ठ चिरफाड करणारा लेख प्रसिध्द झाल्यावर पु.ल. मनातून खवळले आणि अनुल्लेखाने ‘अभिरुची’ अंकाचा deserved उल्लेख त्यांनी आयुष्यभर टाळला.
व्यक्तिश: माझी पुरुषोत्तम चित्रे यांच्याशी त्यांच्या अखेरच्या काळात भेट झाली. ते मला पत्रेही (postcard) लिहित. माझा सहावा लेख मी त्यांच्या ‘अभिरुची’ या अंकासाठी लिहिला होता, हे मला नीट आठवते. तो अंक आणि त्यांची पत्रे आजही माझ्याकडे आहेत. त्याच्यातील विजीगिषु वृत्ती मला आजही थक्क करते. कारण तेव्हा मी विशीत होतो आणि ते त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात आणि तरीही ते माझ्याकडून आग्रहाने पाठी लागून लेखन करून घेत असत.
हा सारा लेखाजोखा मी एखाद्या पुस्तकाएवढा वाढवू शकतो. पण समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व करणाऱ्यांनी माझा ज्या पद्धतीने उद्धार केला की, पु.लं आणि त्यांच्या भक्तांविरुद्ध असा काय गुन्हा मी केला होता हा प्रश्न मला पडतो. उलट “पु.ल. देशपांडे हे अतिशय विद्वान्,चतुरस्र, हजरजबाबी लेखक होते.
त्यांना भारतीय संगीताची अद्भुत समज होती. ज्यामुळे अनेक थोर गायक त्यानी प्रसिद्धिला आणले. त्यांचे एक लोकप्रियतेचे व दातृत्वाचे युग होते ज्याचे महाराष्ट्रावर अपार ऋण आहेत…त्याला नमन… त्यांचे स्मरण आहेच. त्यांना प्रेमाचा प्रणाम… ” असे मी माझ्या पु.ल. देशपांडे यांच्यावरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. यात अनादराचा प्रश्न येतोच कुठे?
याउलट शेकडो पु.ल. भक्तांनी माझ्या कामाविषयी, माझ्यावर, माझ्या पुस्तकांची, माझ्या लेखनाची, मी जे काही करतो याची कोणतीही माहिती नसताना अत्यंत शुद्र शेरेबाजी केली (काही अपवाद वगळता). या शेरेबाजीचे सार व बहुसंख्य महाराष्ट्राचे मन संजय मोने नावाचे कलावंत का कोणीतरी आहेत त्यांनी दोनच ओळीत समर्पक रीतीने व्यक्त केलेले आहे. त्या दोन ओळी संजय उवाच अशा लिहून मी आपला या विषयापुरता निरोप घेत आहे. याउप्पर आपण काय प्रतिक्रिया देता याने माझ्या विचारांच्या ठामपणाला काहीही फरक पडत नाही.
संजय (मोने) उवाच : परुळेकरांनी लिहिलेले कालबाह्य व्हायला हवे असेल तर लगेच ही चर्चा खुडून टाका..
raju.parulekar@gmail.com
Blog: rajuparulekar.wordpress.com

Posted in Uncategorized | 5 Comments